ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Thursday, October 27, 2016

माळ_स्त्रीसामर्थ्याची - माळ दहावी

*नमस्कार!!*

रंगांची किमया अवर्णनीयच!!रंगांच्या छटांऐवजी एकच रंग जरी दृश्यमान असला तरी वेगवेगळ्या स्थितीनुसार तो ता भावांना व्यक्त करतो. दोन्ही ठिकाणी वेगळा भासतो. वेगवेगळी चैतन्यरूपे निर्माण करतो आणि स्वतःचे एकाकी असले तरी वेगळेपण सिद्ध करतो.

*🌹आजचा रंग: आकाशी*

विश्वासाचं, प्रामाणिकतेच,खरेपणाचं,जबाबदारपणाचं लक्षण असणारा रंग आहे. देवी भुवनेश्वरीशी संलग्न असणारा हा सात्विकतेचे द्योतक आहे.

🌹 *या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची दहावी माळ गुंफुया!!*

⚡ *दहावी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *डॉ.सौ.अमृता इंदूरकर*⚡

🌹 *परिचय:*

◾शिक्षण-बी.ए,एम.ए.(मराठी-भाषाशास्त्र)
एम.फिल., PHD(आधुनिक मराठी अध्यात्मिक कविता-तांबे,कुसुमाग्रज,मर्ढेकर,मधुकर केचे)

🌹 *व्यवसाय*

१२ वर्षांपासून स्नातक व स्नातकोत्तर विभागात मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत.

🌹 *सामाजिक कार्य*

◾महाविद्यालयीन काळात विवेकानंद केंद्रात कार्यकर्ती

◾सामाजिक विषयांवर पथनाट्य लेखन व अभिनय

◾उन्हाळी शिबिर,कथाकथन व बौद्धिक.

🌹 *सांस्कृतिक कार्य*

◾यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या कार्यकारिणीत

◾विदर्भ साहित्य संघाची सभासद

◾विविध संस्था मध्ये मराठी नाटकातील स्त्रीपात्रातील आधारित नाट्यांशाचे अभिनय सादर

🌹 *प्रकाशित*

◾लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स,तरुण भारत या वर्तमानपत्रातून समीक्षा लेखाची शृंखला- 50 लेख

◾साहित्य समीक्षा-नाट्य समीक्षा,काव्यसमीक्षा,साहित्य समीक्षा,भाषाशास्त्र

◾कवितारती,अक्षरगाथा,शब्दसखा इत्यादी मासिकातून समीक्षात्मक लेख

◾काव्यमीमांसा-डॉ. अक्षयकुमार काळे गौरवग्रंथाचे संपादन

◾आधुनिक अध्यात्मिक कविता हा समिक्षात्मक ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर

◾आजपर्यंत विविध विषयांवर व्याख्याने

◾मराठी कविता लेखन,हिंदी उर्दू नज्म(शायरी)

◾निदा फाजली,अमृता प्रीतम यांवर भाषणे व प्रकाशित लेख

   
◾ *सुचिकांतजी:*
सर्वांना नमस्कार

मी *सुचिकांत*,  *|| ज्ञानभाषा मराठी ||* समूहाच्या *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत *डॉ.अमृता इंदूरकर* यांचे स्वागत करतो.

*अमृताताई:*
नमस्कार मंडळी🙏�धन्यवाद

◾ *सुचिकांतजी:*
🙏 नमस्कार .. ताई,
आधुनिक अध्यात्मिक कविता हा तुमचा समिक्षात्मक ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे या साठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन मी मुलाखतीस सुरुवात करतो💐

पहिला प्रश्न यावरच घेऊया ... आधुनिक अध्यात्मिक कविता म्हणजे काय? आम्हा सामान्य मराठी प्रेमींना सोप्या भाषेत कसे समजाऊन सांगाल?

*अमृताताई:*
मराठी साहित्यात काव्य या वाड्मय प्रकारात कवितेचा आधुनिक काळ १८८५ पासून सुरु होतो.केशवसुतांपासुन.मग पुढे या प्रवाहात जे जे कवी आलेत त्यांना आधुनिक मराठी कवीतांचे कवी म्हणविल्या जाते.या कवींच्या आध्यात्मिक जाणिवेच्या कवितांवर माझे संशोधन आहे .म्हणून वरील शीर्षक आले आहे.

◾ *सुचिकांतजी:*
वा, किती सोप्या भाषेत समजावून सांगितलंत ... केशवसुत पहिले आधुनिक कवी ना ?

*अमृताताई:*
हो आधुनिक मराठी कवितेचे जनक

◾ *सुचिकांतजी:*
अध्यात्मिक जाणीवा, उदा. द्याल?

*अमृताताई ज्ञान:*
आध्यात्मिक जाणीव म्हणजे प्रत्येक कवी आपल्या जीवनात कधी ना कधी ईश्वरी संकल्पना,त्याचे अस्तित्व यांचा विचार, शोध घेतोच घेतो.त्यावर ज्या आधारलेल्या कविता आहेत त्या आध्यात्मिक कविता!!

◾ *सुचिकांतजी:*
ताई, तुम्ही लिहिलेली पहिली कविता कोणती? किती साली लिहिली ?

*अमृताताई:*
माझी मराठी कविता साधारणतः १९९९ साली

◾ *सुचिकांतजी:*
त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?कुठे सादर केली होतीत ?

*अमृताताई:*
लोकांना ती ऐकवलीच नव्हती. कारण मलाच फार बाळबोध वाटली.😀 आजहि माझ्या कविता डायरीच्या बाहेर फार येत नाहीत(मराठी)

◾ *सुचिकांतजी:*
पण आम्हाला वाचायला आवडतील ... नक्की पोस्ट करत जा .. शिक्षण चालू असताना कधी वाटलं आपण, कवियत्री, लेखिका, किंवा साहित्यिक क्षेत्रातच जाणार? अशी कोणती घटना घडली? /एखादी स्पर्धा त्यात तुम्हाला यश मिळालं आणि मग वाटलं की आता हेच क्षेत्र निवडायचं ?

*अमृताताई:*
प्राध्यापिका व्हायचे हे तर १०,११ त मनोमन ठरविले होते.पण लेखिका, समीक्षक याबद्दल म्हणाल तर माझ्या महाविद्यालयीन गुरुंनी मला जाणीव करुन दिली

◾ *सुचिकांतजी:*
नक्की काय घडलं तेव्हा ?

*अमृताताई:*
मग त्याकडे गंभीततेने बघायला लागले.मी बी.ए.ला असताना क्रमिक जे जे नेमले होते त्यावर माझ्या स्वतंत्र नोट्स,आकलनात्मक लेख लिहिले होते.आणि एका नाटकावरून माझ्या मॅडमशी वादविवाद केला. व माझे त्या नाटकाबद्दलचे मत ठासून मांडले होते व मॅडम नि:शब्द झाल्यात तेव्हा त्यांनी हि जाणीव मला करुन दिली. नाटक एकच प्याला होतं

◾ *सुचिकांतजी:*
मराठी विषय घेऊन एम् ए पर्यंत अनेक जण शिकतात व नंतर काहीतरी दुसरीच उपजिविका स्विकारतात. तुम्ही केवळ एम् फिल नाही तर पि एच् डी पण मराठी साहित्य विषयात केली. आवड म्हणून की प्राध्यापिका बनायचं म्हणून? - निवेदिता खांडेकर

*अमृताताई:*
प्राध्यापिका हे तर ध्येय होतेच.पण एम.ए.करीत असताना मला आतून जाणवले की,तु जे शोधते आहेस ते हेच आहे.आणि मग या क्षेत्राला मी सहर्ष शरण गेले.

*सुचिकांतजी:*
खूप छान ..

*अमृताताई:*
एक झपाटलेपणच होत म्हणा ना

◾ *सुचिकांतजी:*
Ph Dसाठी आध्यात्मिक कविता  हा विषय का निवडला? या विषयात विशेष रुची आहे का?
मर्ढेकर,तांबे , केचे हेच कवी का घेतले? - रेखा चवरे

*अमृताताई:*
एम.ए.करीत असताना presentation साठी मला मर्ढेकर कवी दिले होते.तेव्हा मी त्यांच्या काही निवडक आध्यात्मिक कविता निवडून दीर्घ शोधनिबंध सादर केला होता.तेव्हच ठरविले की हाच विषय पक्का करायचा.

*सुचिकांतजी:*
मस्तंच ...

*अमृताताई:*
मूळात संताचे आध्यात्म हेच माहित असते.पण या कवींच्या कवितेतली आध्यात्म उमजतच नाहि म्हणून अधिकच आग्रहाने हा विषय घेतला

*सुचिकांतजी:*
खरंय ... एकतर कवितांचा अर्थ लावणे कठीण काम त्यातून अध्यात्मिक संदेश शोधणे म्हणजे .... भारीच ...

◾ *सुचिकांतजी:*
उर्दूचं formal शिक्षण घेऊन नज्म शायरी इ करता का स्वतः शौकिया शिकून?
- निवेदिता खांडेकर

*अमृताताई:*
प्रशिक्षण अजिबातच नाहि. बस आजपर्यंत जे माझ्यात साचले होते ते उर्दू -हिंदी मधून उत्स्फूर्त व्यक्त झाले.

◾ *सुचिकांतजी:*
हिंदी,उर्दु शायरीकडे कशा वळलांत? - वृषाली गोखले

*अमृताताई ज्ञान:*
अगदी खरे सांगायचे तर वृषालीताई, हा शोध मी पण घेत आहे.🤔

◾ *सुचिकांतजी:*
माझा एक प्रश्न आहे --- मी कुसुमाग्रजांची आगगाडी ही कविता वाचतोय ..तर त्याचा अर्थ कसा लावायचा? मला त्याकरता संदर्भग्रंथ चाळावे लागतील.... नुसत कविता वाचून त्यातून वेगवेगळे अर्थ निघू शकतात. कवीला अपेक्षित अर्थापर्यंत आपण कसे पोहोचायचे?

*अमृताताई:*
त्या कवितेतील प्रतीक प्रतिमांची एक एक उकल करत गेलात तर सहज कवितेचा प्रतिपाद्य विषय कळेल.

*सुचिकांतजी:*
अच्छा .. प्रथमदर्शनी मला काहीच समजले नाही. मग त्यावर शोधल्यानंतर समजले ...

*अमृताताई:*
वापरलेल्या प्रतिकांची संगती लावता आली की कविता सहजच आकळते

*सुचिकांतजी:*
म्हणजे काही संदर्भ वाचल्यावर

*अमृताताई:*
नाही.संदर्भ तर अजिबातच वाचू नये.

◾ *सुचिकांतजी:*
पण एकच रूपक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कवी वापरू शकतात ना .. म्हणून गोंधळ होतो ..

*अमृताताई:*
हा कवितेवर अन्याय होईल.एकदा नाही कळणार. परत परत वाचा मग ती कविता आपल्याशी बोलायला लागते आणि एका क्षणाला कळते

*मृणाल...मृण्मयी:*
अगदी खरं

*अमृताताई:*
हो हे खरे पण कवीच्या नेणिवा प्रत्येक वेळी सारख्या नसतात

◾ *सुचिकांतजी:*
सुनीत हा काव्यप्रकार समीक्षणासाठी कधी आला का? तुम्ही कधी सुनीत रचनेचा प्रयत्न केला का ? - मृणाल पाटोळे

*अमृताताई:*
Sonnet वरून केशवसुतांनी प्रथम सुनीत मराठीत आणले.समीक्षणासाठी असा आला नाहि पण शिकवावा लागतोच.पण मी कधी त्या घाटात लिहिण्याचा प्रयत्न केला नाही.

◾ *सुचिकांतजी:*
सुनीत काव्याची व्याख्या काय कराल ? आम्हाला समजेल अशी ..

*अमृताताई ज्ञान:*
बापरे व्याख्या इथे देणे कठीण!!

◾ *सुचिकांतजी:*
हल्लीची आमची पिढी साहित्य वाचते म्हणता येईल,पण कवितांकडे ओढा कमी दिसतो.मुळात वाचन कमी असल्याने त्याच रसग्रहण करता येईल की नाही ही भीती असावी काय?

(कवितांची पुस्तकं रसग्रहणासहित असावीत म्हणजे ती घेऊन वाचण्याकडे वळतील नववाचक असं मला वाटत.) - स्वप्नील पाटील

*अमृताताई:*
हो काहि अंशी खरे आहे स्वप्निल आपले म्हणणे.पण जातिवंत कवितांची रसग्रहणे प्रत्येक वेळी मिळत गेली तर त्या कवितेतून एखाद्याला प्रतीत होणारा नवनवोन्मेष उलगडणार नाही हि भीती असते. अगदीच नवीन कवितांचा अर्थ कळणे कठीण नसतेच न.बोलल्यासारख्याच त्या लिहिल्याहि जातात😀

*सुचिकांतजी:*
टेरेस वर कपडे वाळत घातले होते वारा आला उडून गेले .... अशा पण कविता असतात .. बापरे .. आहेत हो बी ए च्या प्रथम वर्षाला ..

*अमृताताई:*
म्हणजे झपूर्झा सारख्या कवितेचा मी एक अर्थ सांगितल्यावर सर्वांनी त्या एकाच चौकटीतून त्याकडे बघणे कवितेला अन्यायकारक ठरेल

◾ *सुचिकांतजी:*
शायरी हा प्रकार मराठीत फार कमी आहे असं वाटत का?

(मी तर आजवर फक्त भाऊसाहेब पाटणकर पाहिलेत.अजून असतील तर माझं अज्ञान.) - स्वप्नील पाटील

*अमृताताई:*
भाऊसाहेब पाटणकर मराठीतील गझलकार.अगदी सुरेश भट यांच्या खालोखाल म्हणा हवे तर!!पण हे खरे मराठीत शायरी कमी पण गझलकार आताशी खुप तयार व्हायला लागलेत

◾ *सुचिकांतजी:*
माझा प्रश्न -
शायरी आणि चारोळी यात नेमका फरक काय?
चंगो यांच्या चारोळ्या पाहून हल्ली कोणीही चारोळ्या/शायरी लिहिताना दिसतात. त्या चार ओळींना चारोळी म्हणावं का? - राहुल वेळापुरे

*अमृताताई:*
शायरी आणि चारोळी यात काहि तुलनाच नाहि मुळात.शायरीसाठी जो जाणिवांचा कस लागतो तो चारोळीत नाही. चारोळी हा प्रकार शिघ्रकवींसाठी वरदान म्हणता येईल😀
राजकीय, सामाजिक विषयांची चांगली सोय होते या प्रकारात

◾ *सुचिकांतजी:*
दुसरा प्रश्न -
गुलजार जी यांची काव्यसंपदा मराठीत आणण्याचा उपक्रम प्रशंसनीय होता,  सुमार दर्जाचं अनुवाद करून प्रयत्न फसला. असे उपक्रम वरचेवर व्हावेत आणि दर्जा राखला जावा यासाठी काय करावं लागतं? या घटनेकडे आपण कसे पाहता? - राहुल वेळापुरे

*अमृताताई:*
गुलजार सारख्या कवींच्या कविता अनुवादित करायच्या असतील तर गुलजार पचविता आला पाहिजे.ते एखाद्या कवितेत 'दरीचा,' असा शब्दप्रयोग करीत असतील आणि त्याचा अनुवाद आपण केवळ खिडकी म्हणून केला तर मग काय गुलजार कळला असा प्रश्न पडतो.दरीचे मधले अधुरेपण, अस्वस्थता, बरेच हवे आहे पण वाट्याला फक्त छोटासा दरीचा येतो हे कसे उमजणार -खिडकी या शब्दामधून

◾ *सुचिकांतजी:*
खूप छान उदा. सहित उत्तर ..
मर्ढेकर व कुसुमाग्रज यांच्या प्रतिभाशैलीत कुठे व कसे वेगळेपण आहे? - वृषाली गोखले.

*अमृताताई:*
मर्ढेकर आशयाभिव्यक्तिची खडबडीत जमीन आहेत तर कुसुमाग्रज आशयाभिव्यक्तीची भव्य उदात्तता आहेत. आसमंत आहेत. मर्ढेकरांच्या कवितेत वाचक ठेचकाळतो तर कुसुमाग्रजांच्या कवितेत तो उंच विहार करतो

◾ *सुचिकांतजी:*
उदा. आठवते आहे का आत्ता एखादे ?

*अमृताताई:*
हो
परिस्थितीचे पिऊन ऍसिड
लिबलिबलेली मने
मर्ढेकर👆�
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणु नगरात,
परी करते व्याकूळ आणिक स्मरते मजला,
त्या माजघरातील मंद दिव्याची वात

कुसुमाग्रज

◾ *अमोल शिंपी:*
असे म्हणतात, मर्ढेकरांच्या कविता गुढ असतात, समजायला जरा दुर्बोधच.
उदा. पिंपात मेले ओल्या उंदिर सारखं.
आपल्याला काय वाटतं ताई?

*अमृताताई:*
हो पण तेच त्यामधील प्रतिक प्रथिनांची उकल केली तर त्या सुबोध आहेत.

◾ *सुचिकांतजी:*
खूप छान उदाहरण दिलेत ..
समीक्षण करतांना कोणते निकष लावले जातात.अध्यात्मिक कवितेत जन्म मृत्यू या संकल्पना वेगळ्या रूप घेऊन येतात.त्यात मृत्यु विषयक समीक्षण केले का??? - मृणाल पाटोळे

*अमृताताई:*
हो मी निवडलेल्या कवींच्या मृत्यू विषयक कवितांचे समीक्षण ओघाने या संशोधनात आलेच.पण ईश्वरविषयक जाणिवा मात्र पारंपरिक नाहीतच या कवींच्या.

◾ *सुचिकांतजी:*
समीक्षणावर अजून एक प्रश्न आला आहे ..सर्वच साहित्यप्रकारात आपले समीक्षालेखन आहे. तरीपण कोणता प्रकार आपल्याला अधिक खुणावतो?                        
रेखा चवरे.

*अमृताताई:*
काव्यसमीक्षा,नाट्यसमीक्षा जास्त आवडतो.

◾ *सुचिकांतजी:*
एका विशिष्ट वातावरणात बहुतांश लोक कवी होतात, हे माझं निरीक्षण आहे. प्रत्येकजण आयुष्यात एकतरी कविता रचतो .. कॉलेजमध्ये तर, एक शोधायला गेला की पोत्याने कवी सापडतात. तुमचं निरीक्षण काय सांगतं ? महाविद्यालयात अशी कोणती ताकद आहे कवी निर्माण करण्याची जी इतर ठिकाणी नाही ?😬

*अमृताताई:*
महाविद्यालयात खरे काव्यगत संस्कार झालेत तर भविष्यात एखादा तरी दर्जेदार कवी जन्म घेतो.बाकी मग जे असतात ते कवी वयाच्या उन्मादावस्थेने कवी बनतात 😀 मूळात शुद्ध बीज असले तर फळ रसाळ येणारच

◾ *सुचिकांतजी:*
विदर्भ साहित्य संघाकडून जास्तीत जास्त तरूणांना साहित्याची गोडी लागावी म्हणून काही उपक्रम चालवले जातात काय? - निवेदिता खांडेकर

*अमृताताई:*
हो बी.ए.व एम.ए. ला equivalent क्रमिक पाठ्यक्रमावर आधारीत परीक्षा असतात.हा झाला तांत्रिक ,ठराव भाग.ह्या व्यतिरिक्त सतत विविध वाड्मय प्रकारांवर व्याख्याने देखील असतात

◾ *सुचिकांतजी:*
डॉ. अक्षयकुमार काळे गौरवग्रंथाच्या संपादनातील अनुभव ऐकायला आवडतील. - रेखा चवरे

*अमृता ताई:*
रेखा ताई,गौरव ग्रंथ तयार करण्याची कल्पना होती तिला अक्षयकुमार काळे यांनी विरोध केला होता. कारण त्यांचा विरोध केवळ गौरव ग्रंथाला होता. त्याला उत्सवी स्वरूप न देता तो एक समीक्षेची चांगला दस्तऐवज ठरावा हा उद्देश ठेवून त्यांनी काव्य समीक्षेचा एक दस्तऐवज किंवा एक छोटेखानी कोष तयार होणार असेल तरच हा गौरवग्रंथ तयार केला जाईल अन्यथा त्यांची अनुमती नव्हती.

इथूनच गौरवग्रंथाच्या संघर्षाला सुरुवात झाली. कारण आतापर्यंतचे गौरवग्रंथ हे व्यक्ती कार्य आणि व्यक्तीचा मोठेपणा यावर आधारित होते. पण या गौरव ग्रंथामध्ये पहिलेच हि शक्यता नाकारण्यात आल्याने या ग्रंथाचे मूळ वेगळे झाले.

संपादकांना मेहनत घ्यावी लागली ती अशी-५०%काव्यसमीक्षात्मक उपलब्ध लेख व ५०% त्यानंतर काव्यसमीक्षेत जे नवे वाद/बदल/धारणा आल्या त्या सर्वांचा समावेश करून एक लेख जातिवंत समीक्षकाकडून लिहून घेण्यात आला.

अशा पद्धतीने ७५० पानांचा हा गौरवग्रंथ तयार झाला..बाकी खूप अनुभव आले पण त्या साठी व्याख्यान सांगावे लागेल!!!

*वृषाली ताई:*
खरंच छान!

*सुचिकांतजी:*
खूप छान माहिती देताय ..
एक दिवस वाचनकट्ट्यातच घ्या हा विषय ...

*निवेदिता ताई:*
मला गौरव ग्रंथ इ माहिती होतं, कारण काळे काकांना मी अोळखते. पण त्यामागची कहाणी व ७५० पानांचा आहे हे आजच कळलं.अभिनंदन तुझ्या मेहनती करता अमृता 👏🏻👏🏻

◾ *सुचिकांतजी:*
ताई, तुम्ही मागे म्हटला होता, की तुम्ही चेटकिणीचा आवाज भारी काढता, आम्हाला त्याचा डेमो कधी बघायला मिळेल?

*अमृताताई:*
डेमो बापरे.प्रयत्न करते पण परिणामकारकता किती साधल्या जाईल माहित नाही 😀

*अमृता ताई:*
https://goo.gl/xtZvS4

*सुचिकांतजी:*
हसून हसून पुरेवाट झाली आज ....

*अमृताताई:*
रात्री झोपताना रोज ऐका 😆
सुचिकांतजी: प्रज्ञा ताईंना झोप येणार नाही

*मृणाल...मृण्मयी:*
हो

*वृषाली ताई:*
हसु आवरत नाहीए

*सुचिकांतजी:*
वृषाली ताई, प्रत्येक अमावास्येच्या वाचन कट्ट्याला टाकीन मी ..

*अमृताताई:*
पार्श्वसंगीत

◾ *सुचिकांतजी:*
पुढच्या प्रश्नाकडे वळतो ...
तुम्ही अभिनय देखील केला आहे, जर चित्रपटात काम करायची संधी मिळाली तर करणार का?

*अमृताताई:*
हो नक्कीच करील. विषय चांगला असेल तर

◾ *सुचिकांतजी:*
तुम्ही अभिनय केलेले व्हिडीओ वगैरे आहेत का तुमच्याकडे ?कधी शेयर कराल ?

*अमृताताई:*
व्हिडिओ नाहीत ना.पण एका ठुमरीवरचा नृत्याभिनयाचा व्हिडिओ लॅपटॅापमधे आहे.पण व्यक्तिगत🙈

◾ *सुचिकांतजी:*
तुम्ही सामाजिक विषयांवर पथनाट्य लिहिलीत त्याचे विषय कोणते ? - मृणाल पाटोळे

*वृषाली ताई:*
👍मनातला प्रश्न मृणाल

*अमृताताई:*
पथनाट्य हे पहिले महाविद्यालयीन स्पर्धेच्या निकडीतून लिहिल्या गेलीत.मग त्यात व्यसनमुक्ती,बालमजूर,बलात्कार,इत्यादी विषयांवर लिहिल्या गेलेत

◾ *सुचिकांतजी:*
विवेकानंदांच्या केंद्रात कार्यकर्ती म्हणून वावरताना आलेले विशेष अनुभव सांगाना - मृणाल पाटोळे

*अमृताताई:*
खरे तर मी खुप अशी सेवाव्रती कार्यकर्ती नव्हतीच.पथनाट्यानेच हि द्वारं  उघडल्या गेलीत.पण मग बरीच शिबीरे अनुभवता आली त्यात खारीचा वाटा देता आला व बरीच मदत झाली व्यक्तीमत्व घडायला

◾ *सुचिकांतजी:*
अमृता ,
मराठीभाषा शिक्षणात व्हॉट्सॅपचे योगदान यावर आपल्या समूहाच्या कार्यपद्धती जवळून बघणारी मराठीची प्राध्यापिका म्हणून काय मत आहे ??  - डॉ. प्रज्ञा देशपांडे

*अमृताताई:*
ज्ञानभाषा मराठी हा आपला समूह ज्ञानोपासक आहे. तरुण पिढीकडे बघतांना मला वाटते की आपण सर्व सदस्य कितीतरी ज्ञानलालसा असणारे आहोत. आपली ज्ञानपिपासा सम्पली नाही.आपण चर्चा करतो तेव्हा बऱ्याच नवीन शब्दांची उकल होते. संधी विग्रह त्याचे मुळरूप सर्व कळते जे आपल्याला माहित नाही.

मराठीचे प्राध्यापक,लेखक असूनही कितीतरी गोष्टींचा नवनव्याने उलगडा होतो.मग जेव्हा मी विचार करते तेव्हा नवीन पिढी खूप मागे आहे. आणि या पिढीत भाषेसंदर्भात उत्थापन करण्याची फार गरज आहे.आणि मला वाटते समूहात सुचिकांतजी शालेय पातळीवर जे काही काम करत आहेत ते फारच स्तुत्य आहे आणि हे मुलामुलींपर्यंत पोहोचायला हवं. आणि हि मुलं जेव्हा आपल्या वयाची होतील तेव्हा ते ज्ञानाचे लोणी आपल्याला मिळेल.

◾ *सुचिकांतजी:*
ताई, शेवटचा प्रश्न विचारतो!!तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक मंत्री झालात तर, कोणत्या ठळक योजना आखाल? अंमलात आणाल?

*अमृताताई:*
सांस्कृतिक मंत्री हि एक व्यक्ती असते . आणि कोणतीही एक व्यक्ती सांस्कृतीकतेचे नियम, निकष कसे ठरवणार? मुळात संस्कृती एका व्यक्तीने ठरवण्यासारखी गोष्ट नाही.ती छोट्या छोट्या समूहामधून तेथे रहाणाऱ्या लोकांच्या आचार-विचार-भाषा-वेशभूषा यातून वृद्धिंगत होत असते. मग एक मंत्री म्हणून त्यांचे नियम,कायदे,निकष कसे लागू करणार हा प्रश्न आजपर्यंत मला पडलेला आहे.आणि या सर्व बाबींवर विचार केला पाहिजे. सांस्कृतिक मंत्री एक म्हणवायचा मग एकवाक्यता हवी.भारतीय संस्कृती एकसूरी नाही  इतकी समृद्ध संस्कृती एक व्यक्तीने कशी नियमांच्या खाली अगदी काटेकोर ठेवायची.

*वृषाली ताई:*
"अमृत" चाखलं आहे कुणी पृथ्वितलावर?
पण,"अमृत" वर्षाव झालाय मात्र ज्ञान भाषा समुहावर!

*स्वप्नील पाटील:*
सौ कोस से बा-जबान-ए-कलाम बाते किया करो ।
और हिज्र मे विलास के मजे लिया करो ।
कोशीश करता हूं कि कुछ ऐसी बात लिखू ।
जो कोई पढे और खुश हो जाये ।
कालच गालिबच्या या ओळी वाचल्या.आपला समूह अगदी असाच आहे.प्रत्येक मुलाखत एक ठेवा आहे.आजवर जी व्यक्ती माहित होती ती आता उलगडत आहे.आम्हाला समृद्ध करत आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

◾ *सुचिकांतजी:*

*#माळ_स्त्रीसामर्थ्याची*

आज आपण आपल्या उपक्रमांतर्गत, अमृता इंदुरकर यांच्याशी संवाद साधला. लेखिका, प्राध्यापिका, कवियत्री, समीक्षक, अभिनेत्री, असे त्यांचे विविध पैलू, त्यांनी आपल्यासमोर उलगडले. *ज्ञानभाषा* मराठी तर्फे, अमृता ताईंचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा💐💐💐

◾ *अमृताताई:*
खुप खुप आभार.मला देखील माहित नव्हते की इतके विविध प्रश्न असतील या मुलाखतीत.उलट बर्याच अव्यक्त प्रश्नांवर व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल सुचिकांतजी, मृणालताई, समूहातील सर्वच प्रश्नकर्ते आपणा सर्वांचे खुप आभार.😊🙏�😊

       *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

No comments:

Post a Comment