ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Tuesday, October 25, 2016

माळ स्त्री सामर्थ्याची - माळ नववी

*नमस्कार!!*

कलेच्या माध्यमात रंगाला विशेष स्थान आहे. मग ते चित्रकलेसारखे रेखाटन असो किंवा भावतरंग प्रकट करणारे नृत्य असो रंग सर्वत्र सामावलेले आहेत. फक्त ते जाणवायला हवेत. रंगांच्या या गुणांमुळेच या सर्व माध्यमांना आकार प्राप्त होतो. रंग स्वतःचाच आकार देऊन या माध्यमांना दृश्यरूप मिळवून देतात!!

*🌹आजचा रंग: जांभळा*

हा रंग आक्रमक प्रवृत्तीचे प्रतिक आहे. गाढ ,गूढ,उत्कटता आणि संवेदनशीलता हे गुण आढळणारा रंग!! स्वतःची मते ठामपणे मांडणाऱ्या व्यक्तींमध्ये हा रंग विशेष प्रिय . शुक्र ग्रहाला जांभळ्या रंगाचे वस्त्र प्रिय आहे..

🌹 *या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची नववी माळ गुंफुया!!*

⚡ *नववी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *सौ.लता दाभोळकर*⚡

🌹 *परिचय:*

◾रामनारायण रुईया कॉलेज मधून एम.ए.(मराठी साहित्य)

◾गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत.

◾मुंबई *तरुण भारत आणि सकाळ* या वृत्तपत्रांपासून सुरुवात.

◾ गेली ८ वर्षे *लोकसत्ता* मध्ये *वरिष्ठ उपसंपादक.*

◾ *लोकरंग व वास्तुरंग* पुरवणीची जबाबदारी.

◾महिला विषयक प्रश्न , साहित्याशी संबंधित बातम्या यावर लिखाण

   ◾ *सुचिकांतजी:*
सर्वांना नमस्कार,

मी *सुचिकांत,*  *|| ज्ञानभाषा मराठी ||* समूहाच्या *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत *लता दाभोळकर* यांचे स्वागत करतो.

*लता दाभोळकर:*
सर्वांना नमस्कार🙏

◾ *सुचिकांतजी:*
नमस्कार लता ताई,
आज तुमच्याकडे वेळ नव्हता, दिवाळी अंकांचे काम वेगात सुरु आहे आणि तरी त्यातूनही तुम्ही या मुलाखतीकरता वेळ दिलात त्याकरता आभारी आहोत. 💐

◾ *सुचिकांतजी:*
- लताताई सर्वप्रथम तुमची शाळा, तुमचे बालपण याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..

*लता दाभोळकर:*
मी वडाळाच्या ज्ञानेश्वर विद्यालयात शिकले. रुईया महाविद्यालयात मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए केल.

*सुचिकांतजी:*
अच्छा

*लता दाभोळकर:*
मी पुष्पा भावे, मीना गोखले  यांची विद्यार्थिनी. या दोन्ही शिक्षकांमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली.

◾ *सुचिकांतजी:*
- ताई शाळेत असतानाच पत्रकारितेत कारकीर्द करायचं ठरवलं होतं का? किंवा या क्षेत्रात यायचा निर्णय कधी घेतलात?

*लता दाभोळकर:*
शाळेत असं निश्चित ठरवलं नव्हतं. त्यावेळी खेळणं आणि अभ्यास करणं एवढंच माहीत. रुईयामध्ये गेल्यावर या दोन्ही शिक्षकांमुळे आयुष्यात काहीतरी वेगळं करावं असं ठरवलं.

◾ *सुचिकांतजी:*
खूप छान लता ताई, तुम्ही कव्हर केलेली पाहिली, बातमी कोणती? त्याबद्दल थोडं सांगाल?

*लता दाभोळकर:*
एम.ए. ला असताना काही मित्र पत्रकार होते. त्यांनी मुंबई तरुण भारत मध्ये लिहायची संधी दिली. पुस्तक परीक्षण, लेख या माध्यमातून महिला व साहित्य यावरचं लिखाण करू लागले. त्यातून पुढेही  पत्रकारिता करायची हे पक्क ठरवलं. लिखाणाची आवड होतीच!! त्यावेळी पत्रकारिता कोर्सची तेवढी गरज नव्हती.

कव्हर केलेली बातमी-गिरगाव मधील एका  शाळेच्या दुरावस्थेतील बातमी होती. चिडून शाळेतून धमकी आली. पण त्यामुळे भिती वाटली नाही उलट आम्हाला हुरूप आला की आपण करतो ते योग्य चालले आहे. या बातमीमूळे गैरव्यवहारांना आळा बसला. योग्य मार्गावर आहोत याची पक्की खात्री पटली.

◾ *सुचिकांतजी:*
भारीच .. ताई, संपादकाच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या असतात?

*लता दाभोळकर:*
पत्रकारितेच्या चढत्या क्रमात संपादक हे सर्वात वरचे. समाजहीत, देशहीत, सद्सद्विवेकबुद्धीने काम करणं अपेक्षित असतं . वर्तमानपत्राला आकार देतात. उपसंपादक हा बातम्यांवर संस्कार  करतो. बातमीदार हा तर महत्वाचा घटक.

◾ *सुचिकांतजी:*
अच्छा .. खूप छान माहिती .. एका पत्रकाराला तणावमुक्त जगता येऊ शकत का? की सतत बातम्या, ठळक बातम्या, आणि धावपळच असते? 😊

*लता दाभोळकर:*
पत्रकाराला तणावमुक्त आयुष्य जगता येत का हे प्रत्येकाचं वैयक्तिक वेगळं उत्तर असू शकतं. २४तास अलर्ट रहावं लागत. धावपळ असते. त्यात लिंगभेद नाही. सतत काम !! सतत  प्रोफेशन डोक्यात ठेवावं लागतं आणि त्याने तसं असावं.

*निवेदिता ताई:*
सच्चे पत्रकार 👍🏻👍🏻

◾ *सुचिकांतजी:*
- पत्रकार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटतं ?

*लता दाभोळकर:*
भाषा,वाचन आवश्यक. त्याने विवेकबुद्धी शाबूत ठेवणे ही मोठी गोष्ट,नेहमी समाजाच्या भल्याचा विचार करणे. निर्भीड असणे,सत्याची कास न सोडणे या  महत्त्वाच्या गोष्टी.

◾ *सुचिकांतजी:*
- तरुण भारत-सकाळ-लोकसत्ता विविध ठिकाणी काम केल्यानंतर कामाच्या पद्धतीत काही फरक वाटला?

*लता दाभोळकर:*
मुंबई तरुण भारत हा RSS चा पेपर.त्यामुळे वातावरण हिंदुत्ववादी. माझी विचारसरणी धर्म,जाती न मानणारी होती. तरी माझ्या विचारांप्रमाणे काम करता आले. त्याचे श्रेय त्यावेळच्या संपादकांना जाते.

सकाळमध्ये शिस्तबद्ध काम करणे.त्यामुळे उत्तम प्रकारे विचारधारेला वळण मिळालं. सगळ्यात कलाटणी युक्त टप्पा लोकसत्ता आहे. निर्भीडपणे पत्रकारिता काय असते हे कुमार केतकर,गिरीश कुबेर यांसारख्या संपादकांमुळे कळले.

कुबेर सर कडक शिस्तीचे,  न थकता काम कसं करावं याची नेहमी प्रेरणा देणारं!!
स्त्री म्हणून घर-काम-ऑफिस यात धावपळ होते पण  तारेवरची कसरत शक्य होते ती नवरा, सासर- माहेरची मंडळी आणि सहकार्यांमुळे.

◾ *सुचिकांतजी:*
खूप छान ... दोन्ही दिग्गज 👍👍👍कुबेर सरांचे वैशिष्ट्य काय सांगाल ?
तसं तर तुम्ही सांगितलेलंच आहे . पण अजून जाणून घ्यायला आवडेल ..

*लता दाभोळकर:*
न थकता काम करणारा हा माणूस!! त्यांच्याकडे काम करण्याची एनर्जी  येते कुठून हा प्रश्न पडावा असा!!

आजच्या घडीला इतका हुशार व योग्य संपादक नाही. खूपकाही शिकता येतं.

◾ *सुचिकांतजी:*
- सतरा वर्षांपासून आपण पत्रकारितेच्या क्षेत्रात आहात. तेव्हा इतक्या वर्षांमधे एक पत्रकार, उपसंपादक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत कोणत्या तडजोडी कराव्या लागल्या व त्या संदर्भात कसकशी परिवर्तने आलीत?...- डॅा.अमृता इंदूरकर

*लता दाभोळकर:*
अमृता ताई १७ वर्षापासून पत्रकारिता करते.खूप चढ-उतार पाहिले. मी स्पष्टवक्ती आहे. त्यामुळे अडचण नाही.तडजोड करावी लागली नाही.

अर्थात प्रत्येक वर्तमानपत्रांची चौकट असते ती ओलांडून जाणे शक्य नसते. तरीही चौकटीत राहून जे शक्य आहे ते प्रत्येक पत्रकार करत असतो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत म्हणताना सध्या फारच वाईट परिस्थिती आहे. एखादा शब्द जरी चुकला तरी प्रत्येकाच्या भावना दुखवायला लागल्या आहेत.त्यामुळे कुठंतरी एक दडपण यायला लागले आहे. सांभाळून एखादी गोष्ट करावी लागत आहे. त्यात लोकांना धर्म,जात,देव यांबद्दल वाकडे बोललेले खपत नाही.किंबहुना न बोलताही त्यांच्या मनाप्रमाणे जे अर्थ लागतील तोच अर्थ घेऊन एखाद्या वर्तमानपत्रावर हल्ला करतात.हे चिंताजनक आहे. हे मला पत्रकार म्हणून वाटत.

वर्तमानपत्र हा  लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याने टिकावं हे जनतेसाठी,देशासाठी गरजेचे आहे. त्याच्या अभिव्यक्तीवर दडपण आलं आहे. लोक छोट्या छोट्या गोष्टीत भावनिक होत आहेत किंबहुना राजकारणी लोकांच्या ते आहारी जायला लागले आहेत. स्वतः विचार करण्यापेक्षा राजकारण महत्त्वाचं वाटू लागलं आहे. जे देशासाठी खूप घातक आहे.

असं असताना हि आजच्या मराठी वर्तमानपत्राच्या सृष्टीत लोकसत्ता हे असं वर्तमानपत्र आहे जे सच्चेपणाने बोलतं, लोकांच्या हिताच्या गोष्टी समोर ठेवून लिखाण करतं. लोकांना वेगळ्या बाजूने विचार करायला लावतं.

◾ *सुचिकांतजी:*
- पत्रकारिता काही लोकांनी बदनाम केली आहे, पारदर्शकता आणि वस्तुस्थिती यांचा विचार न करता खप वाढविण्यासाठी बातम्या लावल्या जाणे, ब्लॅकमेल करणे अशा गोष्टीही घडत आहेत त्या घडू नयेत म्हणून काय करावे असं तुम्हाला वाटतं?..सुयोगा ताई

*लता दाभोळकर:*
सुयोगा ताई, या वाईट गोष्टी फक्त पत्रकारितेत चालल्या आहेत असे नव्हे. समाजाच्या सर्व क्षेत्रात वाईट गोष्टींचा भरणा होत चालला आहे. त्याला पत्रकारिता अपवाद नाही.

काही चांगली वर्तमानपत्रे केवळ पैशाच्या मागे न लागता त्यांचे त्यांचे काम करत आहेत. खऱ्या बातम्या देत आहेत. त्यात लोकसत्तेचा मोठा वाटा आहे. या गोष्टीला आळा घालण्यासाठी माणसातील सच्चेपणा असेल तर शक्य आहे.आणि हे व्यवस्थापनेच्या पातळीवरही व्हायला हवे.

◾ *सुयोगा जठार*
-नव्याने प्रिंट मिडियामध्ये येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सल्ला किंवा टीप्स द्याल?

*लता दाभोळकर:*
नव्याने येणाऱ्याने त्यांचा आतला आवाज हरवू देऊ नये. वाचन भरपूर करा. सच्चेपणा कायम टिकला पाहिजे. कितीही संकट आले तरी भक्कमपणे उभे राहण्याची ताकत ठेवा. बातमीमागे काय आहे हे संयमाने शोधा!!

सुयोगा ताई: 🙏🏻 खरंय.. आतला आवाज आणि शहानिशा करणे महत्त्वाचे!!

◾ *सुचिकांतजी:*
- कधी वृत्तवाहिनीकरता काम करायचा मोह झाला का? त्यापासून स्वतःला कसं लांब ठेवलंत?

*लता दाभोळकर:*
मोह झाला असे म्हणण्यापेक्षा पैसे चांगले मिळतात म्हणून एका वृत्तवाहिनीसाठी मी इंटरव्यूव्ह सुद्धा देऊन आले. निवडही झाली पण नंतर असं वाटलं की ही वृत्तवाहिनी आपल्यासाठी नाही.नुसता कामाचा धबडगा आणि ओझं!! कदाचित मला ते शक्य झालं नसतं.

◾ *सुचिकांतजी:*
निवेदिता ताई, तुमचा प्रश्न .. बाकी बातम्यांकरता, खासकरून राजकीय बातम्यांकरता, जसं कधी कधी 'वरतून' दबाव येतो तसा तुमच्या stories साठी आला काय? तुम्ही काय करता तेव्हा? : निवेदिता खांडेकर

*लता दाभोळकर:*
निवेदिता ताई,मी राजकीय बातम्यांचे वृत्तांकन कधी केले नाही त्यामुळे मला हा अनुभव आला नाही.

येथे एका बातमीचा उल्लेख करावासा वाटतो.सकाळ ग्रुप च्या एका कॉपी राईट संदर्भात मला एक स्टोरी मिळाली सुरूवातीला  मला असं वाटलं की दुसऱ्या पब्लिकेशन बद्दल आपण स्टोरी छापू शकतो की नाही!!थोडी शंका होती. पण ती स्टोरी छापली ! ती स्टोरी खूप गाजली. आणि त्या स्टोरी साठी मला लोकसत्तेत एक्सप्रेस एक्सलन्स अवॉर्ड मिळालं.

◾ *निवेदिता ताई:*
तुमच्या stories साठी?

*लता दाभोळकर:*
मला माझ्या स्टोरी साठी कधी दबाव आला नाही. आणि आला असता तर कदाचित मी ऐकलं हि नसतं किंवा सोडून ही दिल असत. शेवटी नोकरी हा एक भाग असतो तो खूप महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यात!!

◾ *निवेदिता ताई:*
बाकीच्यांच्या समजूती साठी ... ज्याला आम्ही story म्हणतोय त्यालाच news report, feature, long form eassay, स्फुट लेखन, opinion piece असं सगळं काही असू शकतं..

*लता दाभोळकर:*
स्टोरी संदर्भात म्हणाल तर लोकसत्ता मला महत्त्वाचा वाटतो. कुमार केतकर आणि गिरीश कुबेर सर या दोन संपादकांच्या कार्यकाळात स्वातंत्र्य मिळणं  आणि तुमची अभिव्यक्ती जपणं या गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि त्या दोघांनी ती जपली!!

◾ *सुचिकांतजी:*
- लोकरंगचे regular columns फार लोकप्रिय असतात. ते दरवर्षी कोणते असावे हे कोण ठरवतं? म्हणजे केवळ तुम्ही का संपादक पण सहभागी असतात? : निवेदिता खांडेकर

*वृषाली ताई:*
👍मस्त प्रश्न मनातला...👏🏼👏🏼

*लता दाभोळकर:*
लोकरंगचे कॉलम वार्षिक मिटींगमध्ये  सर्व मिळून ठरवतो.

◾ *सुचिकांतजी:*
- लोकरंगसाठी विषय ठरवताना काय निकष लावता व किती आधी तुमच्या पुरवण्या छपाईसाठी तयार असतात? : निवेदिता खांडेकर

*लता दाभोळकर:*
लोकरंगचा विषय त्या आठवड्यातला महत्वाचा विषय असतो. तो लोकांना चांगल्या पद्धतीने समजावा, लेखक उत्तम असावा त्याच लिखाण उत्तम असावं.रविवारी जी पुरवणी प्रसिद्ध होते त्याचे काम आम्ही गुरुवारी पूर्ण करून छपाईला देतो आणि दुसऱ्या दिवशी ती छापून  तयार असते.

लोकरंग ची लीड स्टोरी वरिष्ठ  विचारविनिमय करून स्टोरी ठरतो. लोकरंगचं काम करताना फिचर एडिटर रवींद्र पाथरे यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळतंय.

◾ *सुचिकांतजी:*
गुरुवारीच .. तयार ! 😊
इतक्या वर्षांमधली लोकरंगची एखादी कव्हर स्टोरी ज्याला वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यात ... त्याविषयी सांगा : निवेदिता खांडेकर

*लता दाभोळकर:*
गिरीश कुबेराच्या लेखांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद असतो.पण मध्ये लोकसत्तेच्या वर्धापनदिनानिमित्त लोकरंग मधील जुने जे सिलेक्टिव्ह लेख होते ते आम्ही पुन्हा प्रसिद्ध केले आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकांची अशी मागणी आहे की ते पुस्तक रूपाने यावे!!

लोकसत्तेचा वाचक हा प्रतिक्रियात्मक आहे . लेखांवर,बातम्यांवर तो उत्तम रीतीने प्रतिसाद देतो. आम्हाला त्याचं कौतुक आहे. आमचा वाचक जितका प्रगल्भ, तितकी आमची जबाबदारी वाढते.उत्तमोत्तम लेख,बातम्या या वाचकांना पुरवणे महत्त्वाचे वाटते. लोकसत्तेचे काम ही म्हणूनच आनंददायी गोष्ट आहे.

*निवेदिता ताई:*
छान विचार आहे!!पुस्तक यायला हवं!!

*लता दाभोळकर:*
निवेदिता ताई,आम्ही विचार करतच आहोत! की निवडक लेखाचं पुस्तक करावं!!

◾ *सुचिकांतजी:*
बालिश प्रश्न वाटला तर क्षमा  ,.,.,. 😬  आत्ता जशा लाईक आणि कमेंट असतात तशा पूर्वी, नसायच्या .. तर अगोदर, आपला कोणता लेख किती लोकप्रिय झाला हे तुम्हा पत्रकारांना कसं समजायचं ? वाचकांच्या पत्रव्यवहारात ?

*लता दाभोळकर:*
बालिश नाही!!
वाचकांच्या पत्रव्यवहारातून कळतं .पण अनेक वाचक स्वतः फोन करून कळतात.अगदी दोन ते तीन वर्षांपूर्वीच्या लेखविषयी हि आवर्जून फोन करणारी लोक आहे त्यांचं खूप आश्चर्य वाटतं!!

◾ *सुचिकांतजी:*
काही महिलाविषयक प्रश्न घेऊया ... महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होते आहे की समाज प्रगल्भ होतोय, हे अत्याचार कमी होत आहेत? आकडेवारीकडे न जाता, तुमचं एकूण निरीक्षण काय सांगतं ? यावर काय उपाय योजना तुम्हाला अपेक्षित आहेत?

*लता दाभोळकर:*
महिलांवर अत्याचार होतच आहेत. समाजाचा तो दुर्बल घटक मानला जातो.त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होतायत आणि एकूण समाजव्यवस्था इतकी किडली आणि भ्रष्टाचारी आहे की त्यामुळे जी पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळेल याची निश्चिती लोकांना वाटत नाहीए. दुसरे म्हणजे माझा हा तर्क योग्य आहे की नाही माहित नाही पण पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा अभ्यास,वाचन आणि साहित्य खूप महत्त्वाचे वाटायचे पण आता एकूणच सर्व बदलले आहे.

चित्रपट आणि एकूण सर्व गोष्टींमुळे लहान मुलांनाही sex हा विषय मोठा वाटायला लागला आहे. यापलीकडे काही मोठं नाही त्यांना!!छोट्या वयातही त्यांना भरपूर कळायला लागले आहे आणि पालकांचाही त्यावर वचक नाही. एकूण वातावरण गढूळ झालं आहे. पालकांचंही प्रबोधन खूप आवश्यक आहे.

पालकांना वाटतं की मोठया शाळेत घातलं की तेथील शिक्षक आपल्या मुलांना चांगला नागरिक म्हणून घडवतील. खरं तर पालकांची ती जबाबदारी आहे. पालक स्वतः नव्या नव्या गोष्टींमुळे भांबावले आहेत. त्यांना मुलांना कसं वाढवावं हेच कळत नाही. इंग्रजी माध्यमात घातल्याने आपल्या मुलांचं भलं होईल अशी विचित्र समजूत पालकांची झाली आहे.

केवळ पैसे कमावणे हि आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे हे मुलांच्या माथी न मारता तुमची वर्तणूक,मूल्य हि चांगला नागरिक बनवण्यासाठी उपयोगी आहेत. असा संस्कार जर मुलांवर झाला तर याचं प्रमाण खूप कमी होईल.

*निवेदिता ताई:*
खरचं आहे ... पालकांची खुप मोठी जवाबदारी आहे

*लता दाभोळकर:*
निवेदिता ताई,खरं आहे !!पालकांची जबाबदारी कोणत्याही काळात असतेच!! आजचा पालक गोंधळलेला आहे त्यामुळे येणारी पिढी हि बहुतांशी बेशिस्तच असेल की काय अशी भिती वाटायला लागली आहे आहे.

◾ *सुचिकांतजी:*
- स्त्रीभृणहत्येत किती फरक पडला आहे? अजून पहिल्यासारखे चित्र आहे ? की चित्र बदलतंय ?

*लता दाभोळकर:*
स्त्री-भ्रूण हत्येचा विचार केला तर आज पूर्वी इतकं वाईट चित्र नाही. पण फारसं सुखावणारंही नाही.  मुलगा हवा म्हणून IVF चा सेफ मार्ग पत्करला जातो. ते करताना बाईला किती. त्रास होतो याचा विचार केला जात नाही.

◾ *सुचिकांतजी:*
पण अशा तंत्राबद्दल तुमचं मत काय? योग्य की अयोग्य ?

*लता दाभोळकर:*
अशा तंत्रांना माझा वैयक्तक विरोध  आहे.
मुलं हवं बनून दत्तक घेणं हा आपल्या समाजाकडे खूप चांगला मार्ग आहे.पण त्याबद्दलच्या लोकांच्या गैरसमजुतीमुळे हा  मार्ग  अवलंबला जात नाही.

*निवेदिता ताई:*
सहमत!!

◾ *सुचिकांतजी:*
- स्त्री म्हणून आपल्या कामाला किंवा लेखनाला काही मर्यादा आल्या का?
कधी कुणी Underestimate केलं का ?

*लता दाभोळकर:*
पत्रकारिता असो नाहीतर कुठेही, स्त्री म्हणून तुम्ही जे गैरफायदे घेता त्याला माझा सक्त विरोध आहे. मी स्वतःकडे स्त्री म्हणून न बघता माणूस म्हणून बघते. आपण माणूस म्हणून जगावे आणि तसे कामातही असावे.

येथे काम करताना मला कोणी अंडर एस्टीमेट केलेलं आठवत नाही.

मी स्वतः स्त्री-पुरुष भेद मानत नाही. त्यामुळे त्या गोष्टी मी माझ्या कामातही आणून देत नाही.  आता पत्रकारितेत खूप मुली आल्या आहेत.पण आम्ही पूर्वी रात्री 12 पर्यंत काम केले आहे. पण पुरूष सहकार्यांचे सहकार्यच मिळालंय.

येथे सांगायला आनंद होतोय की मला खूप चांगले पुरूष सहकारी  मिळाले त्यामुळे स्त्री-पुरुष भेद मी मानला नाही आणि मानू दिला नाही.

◾ *सुचिकांतजी:*
मृणाल तुम्ही प्रश्न विचारा ..

◾ *मृणाल...मृण्मयी:*
माझा थोडा वेगळा आणि मिश्किल प्रश्न आहे 😀

*लता दाभोळकर:*
विचारा

◾ *मृणाल...मृण्मयी:*
रुईया कॉलेज म्हणजे कट्टा हे समीकरण...आज ही तेथे 2 सेकंद बसावं असं सर्वांनाच वाटतं.. तुम्हाला नाही का वाटत कधी?

*लता दाभोळकर:*
😂😂खर्रर्र वाटतं!! रुईया आणि कट्टा हे समीकरण जिव्हाळ्याचे आहे, रुईयाच्या विद्यार्थ्यांसाठी !!! पण कधी कामानिमित्त रुईयात जाणे झाले तर आम्ही 2 सेकंद का होईना कट्ट्यावर बसतो. जुने मित्र-मैत्रिणी वाचनावर चर्चा करतो. रुईयात गेल्यावर  ताजेतवाने व्हायला होते!!

◾ *मृणाल...मृण्मयी:*
मनीष मधील खाद्य??

*लता दाभोळकर:*
मनीष च काय😂😂डिपीज पण आठवतं खर्रर्र तर!!

*मृणाल...मृण्मयी:*
छान हसलात अगदी😀😀

*निवेदिता ताई:*
खुदकन हसु आलं त्यांना तुझ्या प्रश्नामुळे मृणाल!!

*लता दाभोळकर:*
रुईया खरं तर खूप जिव्हाळ्याची वास्तू!!कारण तिकडे पुष्पा भावे आणि मीना गोखले हे शिक्षक लाभले आणि आयुष्याला वेगळ्या वळणाचा विचार झाला. मीना गोखले बाई तर  आज ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

◾ *मृणाल...मृण्मयी:*
कधी रुईया मध्ये चोरून लग्नसमारंभाला गेलात का? मज्जा म्हणून😀🙊

*निवेदिता ताई:*
चोरून? 😳

*लता दाभोळकर:*
मी कॉलेज मध्ये असताना  रविवारी लग्न समारंभ करायचा प्रकार बंद होता.त्यामुळे याचा अनुभव नाही. असे प्रकार व्हायचे हे ऐकलं आहे!!

◾ *सुचिकांतजी:*
लता ताई, शेवटच्या प्रश्नाकडे वळूया ... तुमचा एक short term गोल आणि एक long term गोल कोणता सांगाल?

*लता दाभोळकर:*
मी आयुष्यात खूप काही ठरवून केले नाही. जे वाट्याला आले ते नेटाने पुढे नेले. माझे सध्या ध्येय्य आहे माझ्या मुलीला खुप चांगल्या पद्धतीने वाढवणे,तिला वेळ देणे आणि जितका वेळ पत्रकारितेला देईन तो सच्चेपणाने देईन. आणि हे करतांना कधी तडजोड करावी लागू नये आणि व्यक्ती म्हणून मी ती करू नये अशी परिस्थिती असावी.

*निवेदिता ताई:*
अगदी माझ्यासारखं

◾ *सुचिकांतजी:*
अगदीच शेवटी एक प्रश्न आला आहे .. विचारू ?

*लता दाभोळकर:*
हो

◾ *सुचिकांतजी:*
सुशील सोनार यांनी पाठवला आहे ...
मराठी मीडियामध्ये नवोद्यम(स्टार्टअप्स) हा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे, मराठी माणूस आणि व्यवसाय साक्षरता याविषयी तुम्हाला काय वाटतं.

*लता दाभोळकर:*
छान प्रश्न!!मराठी माणसाला व्यवसायाचं वावडं आहे . हे समीकरण दृढ झाले आहे. पण ते तितक खरं नाही. मराठी मुलं हि खूप उद्योगांकडे वळत आहेत. करियर संबंधी ज्या पुरवण्या आहेत त्यात व्यवसाय या संदर्भात खूपच मार्गदर्शन केलं जात. मराठी मीडियाकडून अनेक गोष्टी दुर्लक्षित झाल्या आहेत.पण आता बऱ्याच व्यवसायांचे मार्गदर्शन लाभत आहे.

लोकसत्ताचे १० वी १२ वी साठी व्यवसाय मार्गदर्शन सत्र असत त्यात बरचसं मार्गदर्शन मिळतं . प्रतिसादही खूप आहे. व्यवसायासाठी अथक परिश्रम करणे आणि खचून न जाणे या गोष्टी मराठी माणसाने शिकायला हव्यात.

◾ *सुचिकांतजी:*
लोकसत्ता बद्दल माझे निरीक्षण लिहितो .. २ च  ओळी ...

*लता दाभोळकर:*
चालेल!!

◾ *सुचिकांतजी:*
आम्ही बऱ्याच वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे फेसबुक पेज लाईक करतो.  पण केवळ सकाळ आणि लोकसत्ताच अशी पाने आहेत जिथे रात्री साधारण ९ नंतर weired बातम्या येत नाहीत, नाहीतर इतर प्रत्येक ठिकाणी आंबटशौकिनांच्या साठीच्या अपडेट्स येत राहतात. दर्जा टिकवून ठेवता त्याकरता खूप आभार.

- सुचिकांत

◾ *लता दाभोळकर:*
या मुलाखतीने स्वतःबद्दलही खूप विचार करायला लावलं 🙏

*सुचिकांतजी:*
शिवाय, मराठीतून गुगलवर काही शोधल्यास सगळ्यात जास्त लोकसत्ता आणि लोकमतची पाने सापडतात, ही अजून एक चांगली गोष्ट आहे.

*रेखा चवरे ताई:*
लोकसत्ता हे माझे सर्वात आवडते वृत्तपत्र आहे.लोकरंग पुरवणी विशेष आवडती आहे. या निर्मितीत भरीव योगदान असणारया  लताताईंना सलाम.💐💐

*श्रुती पानसे ताई:*
खूप वेगळया गोष्टी समजल्या. अतिशय छान !!
चांगल्या पत्रकारितेचं कौतुक व्हायलाच हवं. 👍🏼👍🏼

*वृषाली ताई:*
मी नियमित वाचक आहे लोकसत्तेची!लोकरंग अगदी कसुन वाचते!
लता ताई 👇🏾ही तुम्हांला साधी पण अंतःकरणापासुन भेट!

मूर्तिमंत "सौदामिनी" तू,श्रद्धाच दृढ आहे,
म्हणुनचि "स्रीत्व"जपलेस,खरे आत्मभान आहे,
गुरुने दिला तो वसा चालविसी,
सत्य.शुद्धतेच्या मार्गावरी रहासी,
"लता" आहेसि परि "ताल"ही सांभाळला,
शाश्वततेचा आग्रह तू निग्रहाने जपला,
"लोकरंग"..दावितो समृद्ध ज्ञानरंग,
"वास्तुरंग"..दावितो आपुले वारसा अंग,
मी करिते प्रणाम तुझिया ओजस्वी सुस्वरुपा,
राखी अशीच गे तुझियाच  दिव्यरुपा!!!!!!

अभिमान वाटला गिरीश कुबेरांचा!
ते डोंबिवलीकर आहेत!

*अमृताताई:*
लताताई आजची आपली मुलाखत पत्रकारितेच्या सर्वच बाजूंना, पैलूंना स्पर्श करणारी ठरली.माझ्या प्रश्नाला देखील आपण जे उत्तर दिलेत ते अतिशय मार्मिक, वास्तव, चपखल आहे.मुख्य म्हणजे तुमच्या व्यवसाय व कार्याशीच बरीच प्रश्न निगडीत असूनही तुम्ही तुमचे व्यावसायिक पद मधे येऊ न देता त्याची अतिशय एक व्यक्ती म्हणून दिलखुलास उत्तरे दिलीत.👏👏👏खुप छान मुलाखत 👍👍👍धन्यवाद

*राखी चव्हाण:*
लता मॅडम.. मुलाखत मस्त👌🏻आता वाचली आणि ऐकलीसुद्धा

*काळपांडे काका:*
लता दाभोळकरांची मुलाखत वाचली आणि ऐकली. वाचन आणि श्रवण या दोन्हींचा उपयोग करून घेतलेली माझ्या माहितीतली तरी ही पहिलीच मुलाखत. 👍 नवीन तंत्रज्ञान, 👍व्हाट्सऍप आणि 👍 सुचिकांत!

लता दाभोलकरांनी अतिशय समर्पक अशी उत्तरे मोकळेपणाने दिली. त्यामुळे मुलाखत खुलली. मुलीच्या भविष्यासाठी दक्ष असलेली आई, आपल्या व्यवसायावर मनापासून करणारी पत्रकार आणि समतोल आणि त्याचवेळी पारदर्शक व्यक्तिमत्त्व असलेली एक व्यक्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या मुलाखतीतून जाणवले.

*श्रुती पानसे ताई:*
समूहातल्या व्यक्तींचा परिचय करून दिल्याबद्दल सुचिकांतजींचे आणि मृणाल चे मनापासून आभार 🌹अतिशय वेगवेगळया कल्पना  प्रत्यक्षात उतरवता तुम्ही !!
वाचनकट्टाही असाच कौतुकास्पद उपक्रम.आभारी आहोत तुम्हा सर्व प्रशासकांचे.....!!

*वृषाली ताई:*
खरंच,फार उत्तम पद्धतीने मूलाखती होत आहेत.खुप शिकायला मिळतंय .

*सुचिकांतजी:*
तुम्हा सर्वांचा मोठेपणा, अधिक काय बोलू..

*मेघा परब:*
नमस्कार सर.
नवरात्रात अत्यंत आशावादी उपक्रम आपण राबवत आहात. मायमराठीची
ही सेवा स्पृहणीय आहे. ..वैचारिक क्रांती जाणवते. सक्रीय सहभाग नसला तरी सातत्यपूर्ण वाचन मी प्रामाणिकपणे करत आहे. ..माझ्या विद्यार्थ्यांसाठी यातून अनेक दुवे सापडतात. .....पुनश्च अभिनंदन आणि धन्यवादही. .👍🌹👏👏👏👏...

*वैशाली ताई:*
मा.  लता madam
कालची मुलाखत आज ऎकली
छानच. ! 👌💐🙏👍

◾ *सुचिकांतजी:*
*#माळ_स्त्रीसामर्थ्याची*

आज आपल्या उपक्रमात आपण, *लता दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनीपण कसलाही संकोच न बाळगता सर्व प्रश्नांची अगदी छान, मनमोकळेपणे उत्तरे दिली, त्याकरता *ज्ञानभाषा मराठी* समूहातर्फे त्यांचे आभार ..

◾ *लता दाभोळकर:*
सुचिकांत आणि मृणाल यांचे खूप आभार तुम्ही संधी दिलीत!! या आधी ज्या ज्या मुलाखती झाल्या त्या वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या होत्या तरी माझ्यासारख्या लहान व्यक्तीला संधी दिल्याबद्दल आभार आणि माझे विचार ऐकल्या बद्दल समूहाचे आभार!!!

  *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

No comments:

Post a Comment