ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, August 27, 2017

जवळून टीव्ही पाहिल्यास खरंच डोळे खराब होतात का?

प्रत्येक पालकाने वाचावा 
असा अभ्यासपूर्ण लेख,
वाचा आणि पुढे पाठवा
👇👇👇

जवळून टीव्ही पाहिल्यास खरंच डोळे खराब होतात का?




एका पालकाने सायंटिफिक अमेरिकन या संकेतस्थळाला पत्र लिहून पुढील प्रश्न विचारला होता

पूर्वीपासून मी ऐकत आलोय की, लहान मुलांना किमान २ फुटांवरून टीव्ही पाहून द्यावा नाहीतर त्यांचे डोळे खराब होतात. आजच्या फ्लॅट स्क्रीन, एलईडी, अल्ट्रा एचडीच्या काळातदेखील हा नियम लागू होईल का?

त्यावर संकेतस्थळाने दिलेले उत्तर  :

आपल्यापैकी अनेकजण आणि त्यांची लहान मुले, टीव्हीच्या अगदी जवळ बसून टीव्ही बघतात, पण नशीब! त्यामुळे आपल्याला कोणत्याही शारीरिक व्याधी जडत नाहीत. 

परंतु, हा गैरसमज का बळावला?...याचं उत्तर शोधायला आपल्याला १९६० च्या दशकात डोकवावे लागेल. सन १९६० मध्ये अमेरिकेमध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने काही रंगीत टेलिव्हिजन संच बाजारात आणले. पण या टीव्ही संचांमधून मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या सरकारी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करत साधारण १००००० पटीने जास्त किरणोत्सर्जन होई. जीईने तातडीने विकलेले सर्व टीव्ही परत मागवले आणि आपल्या उत्पादनात सुधारणा केली खरी! पण, तेव्हापासून आजतागायत टेलीव्हिजन संचांवर हा कायमचा दुर्दैवी कलंक लागला.

१९६८ नंतर बनलेल्या टेलिव्हिजन संचांमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत लहरी अपायकारक नसल्या तरीही, प्रत्येकाला आपल्या डोळ्यांची काळजी असतेच! पण डॉ. ली डफनर(अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थोमोलॉजि) यांच्यामते तुम्ही टीव्ही जवळून बघा नाहीतर लांबून त्यामुळे डोळ्यांना कसलीच इजा पोहोचत नाही.
हा!! आता तुम्ही चुकीच्या कोनात बसून किंवा जवळून बराच वेळ टीव्ही बघितला तर डोळ्यांवर ताण येऊ शकतो, डोळे थकू शकतात! पण यावर अगदीच सोपा उपाय म्हणजे, टीव्ही बंद करा आणि विश्रांती घ्या. रात्रीच्या निवांत झोपेमुळे डोळे पुन्हा ताजेतवाने होतील.

'हाऊ स्टफ वर्क्स' संकेतस्थळाच्या डेब्रा रोन्का म्हणतात, काही पालक मुलांमधील दृष्टीदोषाचा संबंध जवळून टीव्ही पाहण्याशी लावतात. जवळून टीव्ही पाहून मुलांमध्ये लघुदृष्टीदोष निर्माण होत नाही! तर,उलट ज्या मुलांमध्ये लघुदृष्टीता असते आणि त्याचे निदान झालेले नसते अशीच मुले जवळून टीव्ही पाहत असतात असा त्यांचा होरा आहे. त्या असंही नमूद करतात की, जर तुमची मुले नेहमीच टीव्हीच्या जवळ बसून टीव्ही बघत असतील तर त्यांचे डोळे वेळीच तपासून घ्या.

साहजिकच तासनतास टीव्ही पाहिला तर, त्याचा डोळ्यांवर नाही पण मुलांच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष का होईना पण परिणाम होणारच ! नेमर्सच्या http://kidshealth.org या संकेतस्थळानुसार जी मुलं दिवसाला ४ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यात घालवतात ती,अतिलठ्ठपणाची शिकार  होऊ शकतात व त्यामुळे भविष्यात आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे तासनतास टीव्ही बघून टीव्हीत पाहिलेल्या वाईट गोष्टींचे अनुकरण करणे तसेच, जग भयानक आहे, त्यांच्या जीवाला काही अपाय होऊ शकतो अशी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते.  नेमर्सच्या अभ्यासात असेदेखील आढळून आले आहे की, मुले टीव्हीवर बघितलेल्या धुम्रपान-मद्यपानासारख्या धोकादायक गोष्टींचे अनुकरण करू शकतात, त्याचप्रमाणे टीव्हीवरील पात्रांच्या प्रभावामुळे त्यांच्यात लिंगभेदाच्या, वंशभेदाच्या भावना अधिक मजबूत होऊ शकतात.

गेल्या काही वर्षांत टीव्ही पाहण्याने लहान मुलांवर होणाऱ्या परिणामावर देखील बरेच वादविवाद चालू आहेत. जी मुले दररोज एक तास लहान मुलांसाठीच्या डीव्हीडीज अथवा व्हिडीओ पाहतात ती मुले कधीही ते व्हिडिओ न पाहणाऱ्या मुलांच्या तुलनेत सहा ते आठ नवीन शब्द कमी शिकतात असे सिटल चिल्ड्रेन्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने २००७ साली केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. परंतु २००९ च्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बोस्टन येथील सेंटर ऑन मीडिया अँड चाईल्ड हेल्थ च्या अभ्यासात जास्त टीव्ही बघणाऱ्या मुलांवर कमी टीव्ही बघणाऱ्या मुलांपेक्षा कुठलाही नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.

तज्ज्ञांच्या मते, मुलांचे टीव्ही बघणे हे जरी पूर्णपणे टाळता येण्यासारखे नसले तरी त्याचे नियमन हा एक मार्ग आहे. आपल्या पाल्याने काय पाहावे, किती वेळ पाहावे यासारखी निश्चित बंधने घालायला हवीत . टीव्ही हे कायम काल्पनिक विश्वात रमून जाण्यासाठी नसून नैमित्तिक मनोरंजनासाठी आहे ही गोष्ट पालकांनी आपल्या मुलांवर बिंबवण्याची गरज आहे याकडे किड्सहेल्थ या संकेतस्थळाने लक्ष वेधले आहे

संदर्भ - 

१. किड्सहेल्थ - http://kidshealth.org
२. सायंटिफिक अमेरिकन - https://goo.gl/rXAxJx

मराठी रुपांतर - #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

[ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, शालेय शिक्षणात मराठी माध्यमाच्या शाळांचे, अर्थात मातृभाषेतून शिक्षणाचे समर्थन करते]

Tuesday, August 15, 2017

इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळांची गरजच काय?

दैनिक सकाळमध्ये आलेला लेख - https://goo.gl/TFf9BL

इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळांची गरजच काय?
- सुचिकांत वनारसे(ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान)

----------------

सर्वप्रथम मराठी माध्यमात आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेतलेल्या पालकांचे अभिनंदन!!

नेहमीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या पाल्यासाठी महाराष्ट्रातील लाखो पालकांनी पुन्हा एकदा मराठी माध्यमातून शिक्षणालाच पसंती दिली आणि मराठी शाळांच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. मराठी शाळा संपल्या.. कुठे मराठी शाळेत प्रवेश घेता? असे म्हणून आपल्यासोबत इतरांचंही मत मराठी शाळांच्याबाबत कलुषित करणाऱ्या मराठी शाळा द्वेष्ट्यांना मराठी जनतेने सणसणीत चपराक दिली. एवढेच नाही तर दरवर्षीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे माध्यमांतरदेखील केले. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या या पालकांचे दुप्पट कौतुक आणि आभार!!!

दरवर्षी हजारोंच्या संख्येने इंग्रजी शाळांकडून मराठी शाळांकडे अशी माध्यमांतरे का बरे होत असतील? काय कारणे असतील ? हा आकडा कमी आहे का? अजूनही हा आकडा वाढू शकतो का? इंग्रजी माध्यम बदलून पाल्यासाठी मराठी माध्यमाची शाळा निवडल्यास, लोक काय म्हणतील? म्हणून शहरी पालक गप्प बसत आहेत का? असे हजारो प्रश्न आज शिक्षण क्षेत्रात विचारले जात आहेत. हा आकडा वाढत राहिला तर अजून काही वर्षांनी मराठी नाही पण इंग्रजी शाळांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होईल, हे कोणत्याही शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात येत नाही. किंबहुना या मुद्द्यावर कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा ही घडत नाहीत. एका दृष्टीने हे सर्व चांगलंच आहे.

मराठी शाळांच्या जुन्नर पॅटर्न, हिवरे बाजार पॅटर्न, केंजळ पॅटर्नमुळे, गल्लाभरू आणि दर्जाहीन इंग्रजी शाळांची येत्या काही वर्षांत पळता भुई थोडी होणार हे मात्र नक्की आहे आणि लवकरच इंग्रजी शाळा प्रेमींना 'इंग्रजी शाळा वाचवा' म्हणून मोहीम राबवावी लागली नाही तरंच नवल!

इंग्रजी शाळांकडे मुख्यत्त्वे इंग्रजी बोलण्याच्या आकर्षणातून, प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून आणि इंग्रजी शाळांच्या झगमगाटाला भुलून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बहुतेक घरात मराठी बोलले जाते, पण यातील काही घरांमध्ये मुलांसाठी मात्र इंग्रजी शाळा निवडली जाते, आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच

प्रथम मराठी माध्यमाचे फायदे पाहूया :

शिक्षणशास्त्र सांगते, आपण घरात ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत मुलांना शिकवावे, असे केल्यास मुलांना शिकवलेले लवकर समजते, पाठांतर कमी करावे लागते, दुसरी भाषा अवगत करण्यास सुलभता येते, अभ्यास कमी वेळेत होतो आणि राहिलेला वेळ इतर छंदांकरता देता येतो. हे सर्व फायदे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मिळतातच, शिवाय बहुसंख्य मराठी शाळा अनुदानित असतात आणि त्यामुळे तिथे शिकवणारा शिक्षकवर्ग नियमाप्रमाणे पूर्ण शिक्षित असतो, इतर ठिकाणी अशी सुविधा मिळेलच याची खात्री आपल्याला देता येत नाही. इंग्रजी शाळांच्या दर्जाबाबत अनेक भयानक बाबी रोज वर्तमानपत्रात छापून येत असतात, ते वाचून सुज्ञ पालकांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही.

काही दिवसांपूर्वी ३ वर्षांच्या चिमुरडीचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. एवढीशा मुलीशी तिच्या शिक्षिका इंग्रजीतून संवाद साधत होत्या. त्या मुलीला समजत नव्हते म्हणून ती रडत होती, आणि त्या शिक्षिका फिदीफिदी हसत होत्या. शेवटी त्या शिक्षिका ज्यावेळी त्या मुलीशी मराठीतून बोलल्या तेव्हा ती मुलगी चटकन मराठीतून बोलायला लागली आणि तिने रडण्याचे कारणदेखील सांगितले, तिला भूक लागली होती! सुशिक्षित नवपालकांनी यावरून काहीतरी बोध घ्यावा, आणि मातृभाषेचे महत्त्व लक्षात घ्यावे.

एक अभ्यास सांगतो, की एखाद्या भाषेतले ८०० शब्द तुम्हाला समजले की तुम्हाला ती भाषा कळू लागते, बोलता येते. मग इंग्रजीच्या बाबतीत काही पालकांच्या मनात इतकी भीती का आहे? हे समजायला मार्ग नाही!! नक्की इंग्रजी शिकण्याची योग्य पद्धत आहे तरी कशी? इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे का? असे प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या मनात येणे आणि त्यांची द्विधा मनःस्थिती होणे स्वाभाविक आहे.

सर्वप्रथम अशा पालकांनी एक गोष्ट समजून घेणे गरजेची आहे, ती म्हणजे तुमच्या पाल्याला ‘इंग्रजी भाषा’ विषय म्हणून शिकायची आहे! त्यासाठी सर्व इतर विषय उदा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र,इत्यादी इंग्रजीतून शिकणे गरजेचे नाही!!! तुम्ही का तुमच्या पाल्याला इंग्रजी विषय शिकण्याकरता, इतर विषयदेखील इंग्रजीतून शिकवताय? कुठेतरी चुकताय, हे लक्षात येतंय का तुमच्या?

मातृभाषा पक्की असेल तर दुसरी भाषा शिकणे सोपे : इंग्रजी शिकण्याकरता प्रथम तुम्हाला मराठी शिकणे गरजेचे आहे कारण, ती तुमची मातृभाषा आहे! ऐकून आश्चर्य वाटलं ना? होय! हेच खरं आहे. शब्द, वाक्यरचना, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अशा अनेक व्याकरणातल्या संकल्पना अगोदरच पक्क्या झालेल्या असतील तर वेगवेगळ्या भाषा शिकणे अवघड जात नाही कारण, सर्व भाषांचा संकल्पनात्मक आधार एकच असतो. म्हणूनच मूलगामी अर्थाने आपण भाषा एकदाच शिकतो असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या मुलांना प्रथम भाषा, मातृभाषा-मराठी चांगली बोलता-लिहिता-वाचता येणे गरजेचे आहे. यावर मराठी माध्यमातून शिकलेले काही लोक म्हणतील, मग आम्हाला इंग्रजी का जमत नाही? तर त्याला सराव, इंग्रजीची भीती, नावड, ई. अनेक कारणे असू शकतात.

आज इंग्रजीला समोर ठेवून मुलांना तयार करण्यासाठी इंग्रजी माध्यमात घातले आणि काही वर्षांनी चिनी भाषेचे प्राबल्य जगाच्या बाजारात वाढले तर काय करणार? तुमच्या पाल्याचे शिक्षण मातृभाषेतून न झाल्याने त्याच्या भाषिक संकल्पना कच्च्या राहिल्या असतील, व्याकरण कच्चे राहिले असेल, तर चिनी भाषा, किंवा इतर कोणतीही भाषा शिकणे त्याला प्रचंड अवघड जाईल! अमेरिकेतील पनामा प्रांतातील सर्व शाळांमध्ये भविष्याचा विचार करून प्राथमिक स्तरापासूनच चिनी भाषा शिकवण्यास प्रारंभ केलेला आहे यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिनी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात येईल...चिनीच नाही तर उद्या जर्मन, जपानी, रशियन कोणतीही भाषा शिकावी लागली तरीही त्याकरता अगोदर मातृभाषा पक्की असावी लागेल.

ब्रिटिश कौन्सिल आणि युनेस्कोचा मातृभाषेचा आग्रह :

ब्रिटीश कौन्सिल आणि युनेस्को या दोन्हीही आंतरराष्ट्रीय संस्था मातृभाषेतूनच शिक्षणाचे समर्थन करतात. अनेक भाषा कशा शिकाव्यात यासाठी ब्रिटीश कौन्सिलने टेक २०१३ च्या संमेलनात उत्कृष्ट तक्ता सादर केला होता. तुम्ही गुगलवर Tec 13 british council एवढंच जरी शोधलं तरीही, तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल त्यात १९८ क्रमांकाच्या पानावर हा तक्ता दिलेला आहे.

त्याचं मराठी रुपांतर खालीलप्रमाणे....

१. मराठी श्रवण, वाचन, वक्तृत्त्व यावरील प्रभुत्त्व आणि आत्मविश्वास वाढवा.
२. अध्यापनासाठी मराठी भाषेचा वापर करा. मराठी वाचन, वक्तृत्त्वासोबतच लेखनकौशल्यांचा विकास करा.
३. मराठीतून अध्यापन आणि मुलांचा भाषिक विकास साधताना इंग्रजीची ओळख करून द्या.
४. मराठीतून अध्यापन आणि मुलांचा भाषिक विकास साधताना, इंग्रजीचे वाचन, लेखन, आणि वक्तृत्त्व कौशल्य वाढवा.
५. मराठी व इंग्रजीतून अध्यापन करा, तसेच भाषिक कौशल्ये, संकल्पना पक्क्या करून घ्या आणि तृतीय भाषेची ओळख करून द्या.
६. मराठी व इंग्रजीतून अध्यापन करताना व मुलांना दोन्ही भाषांमध्ये पारंगत करताना, तृतीय भाषेची भाषिक कौशल्ये विकसित करा.
७. सर्व भाषांचा आयुष्यभर ज्ञानार्जनासाठी उपयोग करा.

याला भाषा शिक्षणाची सप्तपदी असे म्हटले जाते. शिक्षणशास्त्राची पदवी घेतलेले मराठी शाळांमधले शिक्षक साधारण याचप्रकारे मुलांना शिकवतात, परंतु मातृभाषेतून शिक्षणालाच फाट्यावर मारून गल्लीबोळात तयार झालेल्या इंग्रजी शाळांमध्ये अशा प्रकारे शिकवले जाते का? यावर पालकांनी विचार करावा.

आज अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये SIEM सारख्या शासकीय संस्थांच्याद्वारे शिक्षकांचे पण इंग्रजी उत्कृष्ट व्हावे याकरता 'तेजस' सारखे उपक्रम सुरु आहेत. तेजस उपक्रमामध्ये टाटांचे सहकार्य देखील मिळालेले आहे. याचा लाभ केवळ मराठी माध्यमाच्या शिक्षकांनाच मिळत आहे, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या!

इंग्रजी शिक्षण असे सोपे होईल :

वर दिलेल्या भाषेच्या सप्तपदीमुळे भाषा कशी शिकवावी याचा आपल्याला साधारण अंदाज येतो. आता द्वितीय भाषा, उदा. इंग्रजी शिकवताना काय कृती आराखडा आखावा लागेल याकरता शिक्षक किंवा खासकरून पालकांसाठी काही टिप्स खालीलप्रमाणे :

> अगोदर मुलांना मातृभाषा-मराठी नीट बोलता- लिहिता-वाचता येऊद्या. तोपर्यंत इंग्रजी केवळ कानावर पडूद्या.

> दर्जेदार 'इंग्रजी-मराठी शब्दकोश' घरात नेहमी असावा. "माझा पहिला इंग्रजी-मराठी शब्दकोश" हा अतिशय सुंदर चित्रकोश सुद्धा खूप उपयोगी होईल. तो केवळ शब्दकोशच नाही तर एक संपूर्ण असे कोर्स बुकच आहे.

> Look and say चा सराव नियमित असावा. त्यासाठी आपण फ्लॅश कार्ड वापरू शकतो. योग्य इंग्रजी उच्चाराचे नमुने नेहमी मुलांना ऐकवावेत.

> मुलांना रोजच्या वापरातले शब्द अगदी शाळेत जाण्याच्या आधीपासून खेळत खेळत शिकवावेत.

उदा: स्वयंपाक घर=किचन, आणि मग त्यातील एक एक विषय - जसे आठ दिवस सगळी भांडी, मग फ्रीज आणि त्यातील वस्तू, मग धान्य/ स्वयंपाकाचे पदार्थ, असं करत वर्षभरात सगळं घर अगदी मजेत शिकून होतं!

> घरात मराठीसोबत इंग्रजी वर्तमानपत्रं चालू करा. एकच बातमी मराठी आणि इंग्रजीतून वाचायची लहानपणापासून सवय लावा. इंग्रजी वृत्तवाहिन्या पहायची सवय लावा.

> घरात गोष्टीची इंग्रजी पुस्तके, मासिके चालू करावीत. मुलांना आवडणाऱ्या विषयावरील मासिके असावीत म्हणजे मुले त्यात रस घेऊन वाचतात. अशा मासिकांतील तसेच पुस्तकांमधली अक्षरे ठळक, मोठी आणि आकर्षक चित्रांनी युक्त असावीत. उदा. रामायण, महाभारत, Tell me why, Tel me what, Tell me when, 500 Questions and answers इ.

> नेहमीच अभ्यास म्हटल्यावर मुलांना रटाळ वाटू शकते, सबटायटल्स सहीत लागणारे इंग्रजी चित्रपट मुलांना पाहू द्यावे. इंग्रजी कार्टून फिल्म्स पाहून द्याव्यात म्हणजे इंग्रजी उच्चार कानावर पडून सवय होते आणि पुढे समजायला सोपे जाते.

> इंग्रजी बोलण्याच्या सरावाकरता, हौशी पालक आपल्या पाल्यासोबत त्याच्या मित्रवर्गाला घेऊन एखादे लहानसे मंडळ सुरु करू शकतात.

- तिथे इंग्रजी लघुपट दाखवावेत,
- चित्रे देऊन त्याचे इंग्रजीतून वर्णन करण्यास सांगावे/इंग्रजीतून चित्रावरून गोष्ट लिहायला सांगावी.
- लहान लहान इंग्रजी नाटिका बसवाव्यात, इंग्रजी नाट्यवाचनाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा,
- इंग्रजी वाचनकट्टे राबवावेत, इंग्रजीतून गप्पागोष्टी कराव्यात,
- कविता चालीवर, हावभावांसह म्हणून घ्याव्यात..उच्चार स्पष्ट असतील हे बघावे.
- इयत्तेप्रमाणे उपलब्ध असलेल्या कृतीपत्रिका सोडवून घ्याव्यात.
- इयत्ता पहिली ते आठवीची बालभारतीची My English Book ही माला पहा. खूपच सुंदर उपक्रम दिले आहेत.
- आज आंतरजालाच्या जमान्यात आपण फेसबुक, ट्वीटर मार्फत अनेक आंतरराष्ट्रीय समूहांचा भाग होऊ शकतो. अशा समूहांत प्रवेश घेऊन, स्काईप, व्हिडीओ कॉल मार्फत परदेशातील शाळांमधल्या मुलांसोबत गप्पा मारण्याची सोय आपल्या मुलांना उपलब्ध करून देता येऊ शकते. हा उपक्रम श्री. बालाजी जाधव या जि. प. शिक्षकाने प्रत्यक्ष अंमलात आणला आहे. अशक्य काहीच नाही.

अशा मंडळांमध्ये शाळेतील इंग्रजीच्या शिक्षकांना विनंती करून वेळोवेळी मार्गदर्शनाकरता आमंत्रित करावे.मराठी शाळांमधले शिक्षक नेहमीच सहाय्य करतात, चांगल्या उपक्रमांना कधीही नाही म्हणत नाहीत.

> ८ वी, ९ वी, १० वी या वयोगटासाठी भाषिक उपयोजन करण्यावर भर द्यावा. अर्थात व्यवहारात इंग्रजी बोलण्याचा सराव करून घ्यावा.

> पहिली ते दहावीच्या एस.एस.सी. तसेच इतर अभ्यास मंडळांच्या इंग्रजी अभ्यासक्रमाच्या सीडीज उपलब्ध असतात. एक सीडी साधारण ३००-४०० रुपयांना असते. महाग वाटत असेल तर काही पालक एकत्रितपणे वर्गणी काढून अशा सीडीज विकत घेऊ शकतात. शिवाय युट्युबला असंख्य शैक्षणिक व्हिडीओज मोफत उपलब्ध असतात त्यांचादेखील लाभ मिळू शकतो.

> इंग्रजी,गणित,विज्ञान यांचा एकत्रित शब्दकोश इयत्तेप्रमाणे बाजारात उपलब्ध असतो. मराठी माध्यमात शिकत असला तरीही, असे शब्दकोश घरात ठेवून, अभ्यास करताना मराठीसाठी कोणत्या इंग्रजी संज्ञा आहेत हे पहायची मुलांना सवय लावावी.

मुंबईतील इंग्रजी शाळांमध्ये देखील स्पोकन इंग्लिशचे पैसे भरून वेगळे वर्ग घेतले जातात (धक्कादायक असले तरीही सत्य आहे), याचाच अर्थ तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकला तरीही इंग्रजीचा जोपर्यंत सराव करणार नाही तोपर्यंत ती भाषा तुम्हाला आत्मसात होणार नाही.

असो! ज्यांनी अजूनदेखील मराठी माध्यमातून शिक्षणाचा विचार केला नाही त्यांनी आपल्या पाल्याकरता मराठी माध्यमाची शाळा आवर्जून निवडावी असे आवाहन!!  कमी पैशात दर्जेदार इंग्रजी आणि इतर विषय शिकायचे असतील तर मराठी शाळांना पर्याय नाही. इंग्रजी शाळांच्या झगमगाटाला बळी न पडता आपल्या परिसरातील मराठी शाळेत प्रवेश घ्या. इंग्रजी माध्यमात शिकवताना पुढच्या १० वर्षांत खर्च होणाऱ्या पैशापेक्षा थोडे सतर्क आणि जागरूक राहून आपल्या पाल्यासाठी मराठी माध्यमातून शिक्षणाचा योग्य निर्णय घेतला तर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात आणि मातृभाषेच्या भक्कम पायावर इंग्रजीची इमारत डौलात उभी राहू शकते.

सर्व राजकीय पक्षांना मराठी शाळांच्या संवर्धनाकरता खुले पत्र!

महाराष्ट्रातील समस्त सन्माननीय मराठी राजकारणी मंडळींनो,

विनम्र अभिवादन,

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झाली. तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच हा अत्यंत आनंदाचा क्षण. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान तर्फे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

पारतंत्र्यातून मुक्त होणं ही खरंच किती उच्चकोटीची अनुभूती आहे हे ज्यांनी पारतंत्र्य बघितलं त्यांनाच कळू शकेल. आज आपण ढोबळमानाने जरी स्वतंत्र असलो तरी अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींमधे आपल्यावर अजूनही काही परकीय विचारांचा पगडा आहे. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. शिक्षणात आजही म्हणावं तसं स्वातंत्र्य आपण मिळवलेलं नाही.

२२ अधिकृतरित्या मानलेल्या प्रादेशिक भाषा आणि कित्येक इतर बोलींची देणगी लाभलेला भारत देश आज शिक्षणाच्या बाबतीत इंग्रजीच्या पाशातून मुक्त झालेला नाही. उलटपक्षी तो पाश अधिकाधिक घट्ट होतोय. इंग्रजी भाषेकडे नेहमीच एक उच्च दर्जाची, श्रेष्ठ भाषा म्हणून भारतीय बघत आलेत. स्वातंत्र्यपूर्व काळात साहेबाची भाषा म्हणून आणि आता प्रगतीची परिभाषा म्हणून!

इंग्रजीला आणि पर्यायाने इंग्रजी शाळांना राज्यकर्त्यांनीही नेहमीच झुकतं माप दिलंय. आज विविध माध्यमांतून, घरादारातल्या चर्चांमधून हाच विचार पसरतोय की इंग्रजी शाळेशिवाय गत्यंतर नाही आणि महाराष्ट्राबद्द्ल बोलायचं तर मराठीला आता भविष्य नाही. एकीकडे हे होत असताना जगभर मात्र मातृभाषेतून शिक्षणाचाच पुरस्कार होतो आहे.

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रात मराठी शाळांच्या संवर्धनासाठी, प्रगतीसाठी आणि मराठी मुलांच्या भाषिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत असताना राजकीय शक्ती म्हणून वैयक्तिक आणि सामाजिक दोनही भूमिकांमधून काही गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटतात.

महाराष्ट्रात मराठी शाळा किंवा सरकारी शाळांच्या भविष्याबद्द्ल बोलायचं म्हटलं तर, तीन पायाभूत गोष्टींचा विचार करायला लागतो. एक शिक्षणसंस्था,दुसरी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आणि तिसरी राजकीय धोरणं. तिसरी बाब अर्थातच सर्वाधिक महत्वाची कारण ती जर पूरक नसेल तर इतर दोन हतबल ठरतात. त्या अनुषंगाने एक कारण जे प्रत्येक मराठी पालक देतो ते म्हणजे मराठी शाळांची अवस्था. इमारतींची रचना, दर्जा, निगा, अद्ययावतपणा, स्वच्छता इत्यादी.

अनेक भौतिक सुविधांपासून बहुतेक मराठी शाळा वंचित आहेत. कधी अनुदानाचा प्रश्न असेल तर कधी शासकीय नियम आणि अटी असतील किंवा इतर काही निर्देश असतील परंतु अनुदानित मराठी शाळा या अनुदानाखेरीज इतर अनेक बाबतीत शासनावर अवलंबून आहेत व जखडलेल्या आहेत. या भौतिक सुविधांची वानवा हे पालकांच्या पाठ फिरवण्याचं प्राथमिक कारण आहे.

दुसरा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक. गुरुशिष्याचं नातं हे आपल्या संस्कृतीत फार मोठं आहे आणि त्या तोडीची तळमळ असणारे शिक्षक आज कमी नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या भल्यासाठी वेगळी वाट करणारे शिक्षक अनेक सरकारी शाळांमधे आजही मोठ्या संख्येने आहेत. त्यांची अपेक्षा फार मोठी नसली तरी आपल्या चांगल्या कामाची प्रशंसा व्हावी, त्याची दखल घेतली जावी इतकी माफक अपेक्षा त्यांना असते. परंतु शासनाकडून अनेकदा उपेक्षाच पदरी पडल्याने तेही हताश होत आहेत. शिवाय त्यांच्यावर इतर शासकीय कामांचा जो भार टाकला जातो तो अतिशय जाचक ठरतो. शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदार्‍यांच्या तो आड येतो. तरी शिक्षकांसाठी, शाळांसाठी नियमित पुरस्कार, कार्यशाळा, त्यांची राज्यपातळीवर दखल या गोष्टी झाल्या तर एखाद्या शाळेला एकहाती नवसंजीवनी देण्याचं सामर्थ्य आज शिक्षकांमधे आहे.

शासन म्हटलं की लोकप्रतिनिधी यांच्यापासूनच सुरुवात होते. आजवर मराठी भाषा, शाळा यांच्यासाठी अनेक घोषणा विविध नेत्यांकडून केल्या गेल्या. पण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची मुलं आज इंग्रजी माध्यमात शिकतात हे वास्तव आहे. असं असेल तर पालकांचं मनपरिवर्तन होणं कठीणच!!"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असं म्हणतात. मराठी शाळांसारख्या, भाषिक स्वातंत्र्यासारख्या राजकीय नसलेल्या मुद्द्यावर खरं तर एकत्रपणे येऊन, आपल्या मुलांना मराठी शाळेत घालून एक उदाहरण समोर ठेवायची आज गरज आहे असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं. तुम्ही हे केलंत की तुमच्यावर विश्वास असलेला प्रत्येक जण करेल आणि 'कमी पटसंख्या' असा कुठला निकषच मुळी उरणार नाही.

घोषणांच म्हटलं तर मराठीशी निगडीत कित्येक निर्णय आज शासनदरबारी धूळ खातायत. अभिजात दर्जा मिळण्यासाठी इतका अवधी लागतोय. हे चित्र लवकर बदलायला हवं. महाराष्ट्राच्या आत्म्याचं, त्याच्या भाषेचं जिवंतपणी असं तडफडणं थांबवायला हवं. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान सारख्या संस्था प्रयत्न करत आहेतच. परंतु प्रत्येक बाबतीत लोकसहभाग किती पुरा पडणार यालाही मर्यादा असतातच. तेंव्हा शासनाकडून आणि शासनेतर प्रत्येक राजकीय शक्तीकडून आज अपेक्षा आहे ती  या विषयात पुढाकार घेण्याची.

शिक्षणाबद्द्ल मत बदलेलही परंतु भविष्याची हमी प्रत्येकाला हवी असते आणि मराठी शाळांमधे शिकूनही इंग्रजी भाषेचं उत्तम दर्जाचं शिक्षण मिळेल, रोजगार मिळण्यात अडचण येणार नाही हा विश्वास जनतेला देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. असा सर्वांगीण प्रयत्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकारण्याद्वारे व्हावा हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आहे. ते स्वप्न लवकर पूर्ण होईल, तुम्हा आम्हा सर्वांना भाषिक स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने अनुभवता येईल आणि पुढील मराठी पिढी विलक्षण तेजस्वी भविष्य घेऊन येईल अशी या स्वातंत्र्यदिनी प्रार्थना करत आहोत!!

आमच्या म्हणण्यावर कृपया विचार करावा अशी नम्र विनंती आहे.

तसदीबद्दल क्षमस्व!

आपले,
ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

Monday, August 14, 2017

मुंबईच्या महापौरांना पत्र

प्रति,
माननीय श्री. विश्वनाथ महाडेश्वर,
महापौर, मुंबई महानगरपालिका

विषय - बंद पडलेल्या मराठी शाळांच्या जागा महापालिकेच्या इंग्रजी शाळांना देऊ नयेत!

महोदय,

११ जुलै रोजी मुंबई महानगरपालिका, बंद पडलेल्या मराठी शाळांच्या जागा महापालिकेच्या इंग्रजी शाळांना देऊन, त्याजागी इंग्रजी शाळा सुरु करणार अशी बातमी वाचली. महानगरपालिकेने घेतलेला निर्णय मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने घातक आहे.

आपण मराठी भाषिक आहोत, मराठी आपली ओळख आहे, मुंबईत २८% पेक्षा कमी मराठी समाज उरला असताना, मराठी भाषेची शक्तिपीठे निर्माण करण्यावर, त्यांच्या सक्षमीकरणावर भर न देता, त्यांची जागा इंग्रजी शाळांना देऊन तिथे इंग्रजी शाळा सुरु करण्याची परवानगी देणे हा आत्मघातकी निर्णय आहे.

दिल्लीमध्ये ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या २ मराठी शाळा आजही, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस धरून आहेत. आपल्याला तर फक्त मुंबईतल्या मराठी शाळा टिकवायच्या आहेत! युनेस्को, ब्रिटीश कौन्सिल, असंख्य शिक्षणतज्ञ मातृभाषेतून शिक्षणाचेच समर्थन करतात, पण आपण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून असा निर्णय कसा काय घेतलात याचे आम्हाला आश्चर्य वाटते. महाराष्ट्राच्या राजधानीत, #राजभाषा आणि #मातृभाषा असलेल्या मराठीतूनच, #मराठी माणसाने आपल्या पाल्यासाठी शिक्षण घ्यावे असे आपल्याला वाटत नाही का? 

संपूर्ण महाराष्ट्रातील ८०% मुले आजही मातृभाषेतून
शिकतात, परंतु मुंबईतील मराठी माध्यमांच्याप्रती शासनाच्या असलेल्या अनास्थेमुळे परिणामी या शाळांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मुंबईतील मराठी शाळा पोरक्या झाल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळांचे चित्र याच्या उलटे आहे! अगदी ग्रामीण भागातील मराठी शाळा देखील दिमाखात चालू आहेत. परंतु अनेकदा मुंबईतील शाळांमुळे तयार झालेले मराठी शाळांचे नकारात्मक चित्रच समाजासमोर ठेवले जाते, आणि इतर महाराष्ट्रातील पालकांच्या मनात मराठी शाळांविषयी संभ्रम निर्माण होतो, ज्याचा परिणाम उर्वरित महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या पटसंख्येवर होतो.

आपण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहात, आपण महापौर झाल्यावर मुंबईतील शाळांची परिस्थिती सुधारेल म्हणून मराठीप्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आपल्याला आठवतं? पत्रकारांनी आपल्याला परभाषेतून प्रश्न विचारल्यावर आपण त्यांना, "मी मराठी आहे, आणि महाराष्ट्राच्या राजभाषेतूनच बोलणार" म्हणून ठणकावून सांगितलं होतं! आम्हाला तुमच्या मराठी बाण्याचा प्रचंड अभिमान आणि आदर वाटला होता..परंतु आपल्या या निर्णयाने असंख्य मराठीप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे.

आपण कृपया आपल्या निर्णयावर पुन:श्च विचार करून, पुरेशा भौतिक सुविधा देऊन, बंद पडलेल्या मराठी शाळा कशा आकर्षक बनवता येतील, कसे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मराठी शाळांकडे वळतील याकरता काम करावे आणि हा निर्णय रद्द करावा असे आवाहन.

हे काम अवघड आहे याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान देखील या कार्यात आपल्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे, आपण केवळ राजकीय इच्छाशक्ती दाखवा!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान