ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Monday, August 14, 2017

मुंबईच्या महापौरांना पत्र

प्रति,
माननीय श्री. विश्वनाथ महाडेश्वर,
महापौर, मुंबई महानगरपालिका

विषय - बंद पडलेल्या मराठी शाळांच्या जागा महापालिकेच्या इंग्रजी शाळांना देऊ नयेत!

महोदय,

११ जुलै रोजी मुंबई महानगरपालिका, बंद पडलेल्या मराठी शाळांच्या जागा महापालिकेच्या इंग्रजी शाळांना देऊन, त्याजागी इंग्रजी शाळा सुरु करणार अशी बातमी वाचली. महानगरपालिकेने घेतलेला निर्णय मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने घातक आहे.

आपण मराठी भाषिक आहोत, मराठी आपली ओळख आहे, मुंबईत २८% पेक्षा कमी मराठी समाज उरला असताना, मराठी भाषेची शक्तिपीठे निर्माण करण्यावर, त्यांच्या सक्षमीकरणावर भर न देता, त्यांची जागा इंग्रजी शाळांना देऊन तिथे इंग्रजी शाळा सुरु करण्याची परवानगी देणे हा आत्मघातकी निर्णय आहे.

दिल्लीमध्ये ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या २ मराठी शाळा आजही, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस धरून आहेत. आपल्याला तर फक्त मुंबईतल्या मराठी शाळा टिकवायच्या आहेत! युनेस्को, ब्रिटीश कौन्सिल, असंख्य शिक्षणतज्ञ मातृभाषेतून शिक्षणाचेच समर्थन करतात, पण आपण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून असा निर्णय कसा काय घेतलात याचे आम्हाला आश्चर्य वाटते. महाराष्ट्राच्या राजधानीत, #राजभाषा आणि #मातृभाषा असलेल्या मराठीतूनच, #मराठी माणसाने आपल्या पाल्यासाठी शिक्षण घ्यावे असे आपल्याला वाटत नाही का? 

संपूर्ण महाराष्ट्रातील ८०% मुले आजही मातृभाषेतून
शिकतात, परंतु मुंबईतील मराठी माध्यमांच्याप्रती शासनाच्या असलेल्या अनास्थेमुळे परिणामी या शाळांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मुंबईतील मराठी शाळा पोरक्या झाल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळांचे चित्र याच्या उलटे आहे! अगदी ग्रामीण भागातील मराठी शाळा देखील दिमाखात चालू आहेत. परंतु अनेकदा मुंबईतील शाळांमुळे तयार झालेले मराठी शाळांचे नकारात्मक चित्रच समाजासमोर ठेवले जाते, आणि इतर महाराष्ट्रातील पालकांच्या मनात मराठी शाळांविषयी संभ्रम निर्माण होतो, ज्याचा परिणाम उर्वरित महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या पटसंख्येवर होतो.

आपण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहात, आपण महापौर झाल्यावर मुंबईतील शाळांची परिस्थिती सुधारेल म्हणून मराठीप्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आपल्याला आठवतं? पत्रकारांनी आपल्याला परभाषेतून प्रश्न विचारल्यावर आपण त्यांना, "मी मराठी आहे, आणि महाराष्ट्राच्या राजभाषेतूनच बोलणार" म्हणून ठणकावून सांगितलं होतं! आम्हाला तुमच्या मराठी बाण्याचा प्रचंड अभिमान आणि आदर वाटला होता..परंतु आपल्या या निर्णयाने असंख्य मराठीप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे.

आपण कृपया आपल्या निर्णयावर पुन:श्च विचार करून, पुरेशा भौतिक सुविधा देऊन, बंद पडलेल्या मराठी शाळा कशा आकर्षक बनवता येतील, कसे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मराठी शाळांकडे वळतील याकरता काम करावे आणि हा निर्णय रद्द करावा असे आवाहन.

हे काम अवघड आहे याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान देखील या कार्यात आपल्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे, आपण केवळ राजकीय इच्छाशक्ती दाखवा!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment