ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Wednesday, October 26, 2016

इंग्रजी भाषेचा विजय

रविवार, ४ ऑक्टोबर  २००९
सलील कुळकर्णी - 
 saleelk@gmail.com

इ. स. १६५० पर्यंतचा इंग्लंडचा राजकीय व भाषिक गुलामीचा इतिहास जरी बऱ्याच प्रमाणात भारताच्या इतिहासासारखाच असला तरी इंग्रजांनी १ जानेवारी १६५१ पासून ६०० वर्षाचा न्यूनगंड झटकून टाकून ज्याप्रमाणे स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:चा इतिहास बदलला, त्याप्रमाणे २०० वर्षाच्या न्यूनगंडावर मात करून स्वत:च्या स्वाभिमानाचा आणि वैभवाचा भविष्यकाळ निश्चयपूर्वक पुन्हा घडवणे आज आपल्याला जमेल काय? 

आपण कविवर्य माधव जुलियनांच्या 
पुढील ओळी सार्थ करून दाखवू शकू काय?
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, 
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी।
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, 
हिला बैसवू वैभवाच्या शिरी।।
मराठी असे आमुची मायबोली..

आ ज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लंडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याचा मागोवा घेणे सुरस ठरेल.

मध्यंतरी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९६७ साली लोकसभेत केलेल्या एका भाषणासंबंधीचा लेख मला वाचायला मिळाला. चारशे-पाचशे वर्षापूर्वी इंग्रजी भाषा अत्यंत मागासलेली होती आणि खुद्द इंग्लंडमध्येसुद्धा लोकांना इंग्रजीबद्दल आत्यंतिक न्यूनगंड वाटत होता. पण शेवटी सतराव्या शतकाच्या मध्याला जनमताच्या रेटय़ाला मान देऊन इंग्रज सरकारने निश्चयाने कायदे करून इंग्रजी भाषेला स्वत:च्या देशात हक्काचे आणि वैभवाचे स्थान कसे मिळवून दिले याची माहिती वाजपेयींनी लोकसभेत सांगितली आणि तशा प्रकारे वैभव मिळवणे भारतीय भाषांनासुद्धा कठीण नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. तो लेख वाचून माझी जिज्ञासा जागृत झाली व मी याविषयी अधिक माहिती महाजालावरील विकिपीडियासारखी संकेतस्थळे व वाजपेयींनी उल्लेख केलेला संदर्भग्रंथ यामधून मिळवली. सर्व माहिती संकलित केल्यावर एक ‘सुरस आणि विस्मयकारी’ कथा हाती लागली. तीच पुढे देत आहे.

हजार वर्षापूर्वी इंग्लंड देश युरोपातील आजूबाजूच्या देशांच्या मानाने अप्रगत होता. त्या काळी फ्रान्स हा साहित्य व संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत प्रगत देश समजला जात असे. युरोपातील बहुसंख्य देशांमध्ये (जर्मनी, इंग्लंड यांच्यासह) लॅटिन व फ्रेंच या दोन भाषांचा मोठा प्रभाव होता.

फ्रान्स देशाच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीला लागून नर्ॉमडी नावाचा एक प्रश्नंत आहे. सन १००२ मध्ये या नॉमर्ंडीच्या राजघराण्यातील एका डय़ूकच्या एम्मा नामक कन्येचा इंग्लंडचा राजा दुसरा एथर्लेड यांच्याशी  विवाह झाला. त्यांचा मुलगा ‘एडवर्ड दी कन्फेसर’ याला काही वादामुळे बराच काळ आपल्या आजोळी म्हणजे नर्ॉमडी प्रश्नंतात हद्दपार स्थितीत काढावा लागला. पुढे त्याने १०४२ साली इंग्लंडची सत्ता काबीज केली. एडवर्डने फ्रान्सच्या नर्ॉमन लोकांच्या पाठिंब्यावर इंग्लंडची सत्ता मिळवली असल्यामुळे नर्ॉमन लोकांना इंग्लंडच्या राज्य कारभारात फार महत्त्व प्रश्नप्त झाले.

इ.स. १०६६ च्या आरंभाला राजा एडवर्ड मेला आणि तेव्हा इंग्लंडच्या गादीला कोणी वारस नसल्यामुळे इंग्लंड, स्कॉटलंड, आर्यलड व आजूबाजूच्या प्रश्नंतातीलच नव्हे तर नॉर्वे, बेल्जियम, फ्रान्स अशा परदेशातील राजे-सरदार- उमरावसुद्धा इंग्लंडची सत्ता काबीज करण्याच्या मागे लागले. काहींनी समुद्रमार्गाने देखील हल्ला चढवला. त्यांच्या आपापसात अनेक लढाया होऊन शेवटी नर्ॉमडीच्या डय़ूक विल्यमने इंग्लंडची व आजूबाजूच्या संस्थानांची सत्ता काबीज केली त्यामुळे त्याला ‘दिग्विजयी विल्यम’ (विल्यम दी कॉन्करर) असे नाव पडले. ही घटना इतिहासाला ‘नॉर्मन कॉनक्वेस्ट’ (इंग्लंडवरील नॉर्मन लोकांचा विजय) म्हणून प्रसिद्ध आहे. या महत्त्वाच्या घटनेचा इंग्लंडच्या पुढील इतिहासावर मोठा परिणाम झाला. यानंतरचे सर्व नॉर्मन (फ्रेंच) राजे वर्षाचा बराच काळ फ्रान्समध्येच राहत आणि आपल्या फ्रेंच अधिकाऱ्यामार्फतच इंग्लंडचा कारभार चालवीत. त्यासाठी वेळोवेळी इंग्लंडच्या राज्यांनी फ्रेंच लोकांचे महत्त्व सर्व क्षेत्रांत वाढण्याच्या दृष्टीने विविध नियम-कायदे केले.

यानंतर सन १२०४ पर्यंत म्हणजे सुमारे १४० वर्षे नॉर्मन लोकांची इंग्लंडवर अधिसत्ता होती. त्या आधी इंग्लंड अनेक दृष्टीने ‘मागासलेला’ देश समजला जात असे. फ्रेंचांनी आपल्या राज्य कारभाराच्या काळात इंग्लंडमधील कायदा, संसदीय कारभार आणि न्याय संस्थेची मुहूर्तमेढ इंग्लंडात घालून दिली. मात्र त्यासाठी त्यांनी सर्वत्र फ्रेंच भाषेचाच उपयोग केला. सरकारी कोषागार (रिझव्‍‌र्ह बँक), राजाचे सल्लागार मंडळ (संसद), इंग्लंडमधील प्रश्नंतनिहाय न्यायसंस्था, शेरिफ (कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस दलाचा सर्वोच्च अधिकारी). सर्व हिशेबाच्या खात्यांवरील सर्वोच्च हिशेब-तपासनीस अधिकारी (एक्सचेकर) अशा सर्व महत्त्वाच्या संस्थांच्या संबंधातील कायदे-नियम पूर्णपणे फ्रेंच पद्धतीप्रमाणे आणि फ्रेंच भाषेत बनवले गेले. त्यानंतरही काही शतके इंग्लंडमधील संसद, न्याय व्यवस्था आणि राज्य कारभाराची भाषा फ्रेंचच होती. राज्य कारभाराला आवश्यक अशा अनेक पारिभाषिक संज्ञा इंग्लिशमध्ये फ्रेंचमधून आलेल्या आहेत. याचाच परिपाक म्हणून समाजाच्या उच्च वर्तुळात फ्रेंच भाषा प्रतिष्ठेची भाषा मानली जाऊ लागली आणि लॅटिन व फ्रेंच भाषांपुढे इंग्रजांना आपल्याच देशात आपल्याच भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड वाटू लागला. अगदी व्यवहारातील साध्या साध्या शब्दांच्या बाबतीतही इंग्रजांनी आपले मूळ इंग्रजी शब्द विसरून फ्रेंच शब्द उचलले. याच कारणामुळे स्पेलिंग व उच्चारात फरक झालेला असला तरी आजहीइंग्रजीमधील बरेच शब्द मूळ फ्रेंच शब्दांपासून निर्माण झालेले आढळतात.

आता आपण अटलबिहारी वाजपेयींनी लोकसभेत संदर्भ दिलेल्या ‘ट्रायम्फ ऑफ दी इंग्लिश लँग्वेज’ (इंग्रजी भाषेचा विजय) या पुस्तकाकडे वळू. सोळाव्या शतकातील इंग्रजी भाषेतील परिस्थितीविषयी भाष्य करणारे त्या पुस्तकातील निवडक उतारे खाली उद्धृत केले आहेत.

पृष्ठ- ७ : ‘वस्तुत: इंग्रजी भाषा ही वक्तृत्वपूर्ण (एलक्वण्ट) भाषा नाही. उलट बोजड व गवार (नॉनएलक्वण्ट) भाषा आहे, अशीच भावना त्या काळी होती. हे तेव्हा इंग्रजीचे वर्णन करण्यासाठी वारंवार वापरल्या जाणाऱ्या विशेषणांवरून सहजच समजून येते, जसे उद्धट, ढोबळ, असंस्कृत, हिणकस, कुचकामी इत्यादी.’

 पृष्ठ- ११ : सोळाव्या शतकातील एक लेखक, जॉन स्केल्टन म्हणतो, ‘आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा आहे की, ‘खराब’ (corrupt) इंग्रजी भाषेच्या तुलनेतील फ्रेंच भाषेचे श्रेष्ठत्व हे केवळ फ्रेंच भाषेच्या माधुर्यामुळेच नव्हे तर बायबलसुद्धा त्याच भाषेत भाषांतरित केले गेलेले आहे या वस्तुस्थितीवरूनही ते लक्षात येते.’ असे म्हणून या लेखकाने अशी इच्छा व्यक्त केली होती की, ‘इंग्रजीत लवकरात लवकर बायबलचे भाषांतर उपलब्ध केले जावे कारण तसे झाल्यास आपल्या देशी, अप्रगत बोली भाषेची (दी व्हन्र्याक्युलर) काही प्रगती होऊ शकेल असे मला वाटते.’ आपल्या एका कवितेत स्केल्टन स्पष्टपणे म्हणतो की, ‘वक्तृत्वपूर्ण लिखाणास ज्या प्रकारची सुसंस्कृत आणि अलंकारिक अभिव्यक्ती आवश्यक असते ती आमच्या अप्रगत बोली भाषेच्या शब्दसंग्रहात कुठेही आढळत नाही.’ 

पृष्ठ- १६ : डग्लसच्या मते ‘लॅटिन भाषेतील वक्तृत्वपूर्ण गुण आणि अलंकारिक सौंदर्याशी बरोबरी करण्यात आपली देशी भाषा (इंग्रजी) असमर्थ ठरते याला इंग्रजी भाषेतील मर्यादित शब्दसंग्रह तर कारणीभूत आहेच, पण इंग्रजीचा शब्दसंग्रह अर्थपूर्णतेच्या दृष्टीने सुद्धा कमी पडतो हे आणखी एक कारण आहे.’

कुशल संसदपटू आणि भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९६७ सालच्या डिसेंबर महिन्यात लोकसभेत एक सुंदर आणि ऐतिहासिक भाषण केलं होतं. १९६७-६८ साली भाषिक-शैक्षणिक धोरणावर लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हाचा काळ इंग्लंडमधील १६५०-१६५१ या काळाप्रमाणेच देशाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. इंग्रजीचे महत्त्व वेळीच कमी करूनस्थानिक भाषांना त्यांचा योग्य तो मान व अधिकार लवकरात लवकर मिळवून दिला नाही तर मग पुढील काळी ती गोष्ट करणे महाकर्मकठीण होऊन बसेल असे वाजपेयींनी ठासून सांगितले आणि तसे प्रतिपादन करताना त्यांनी ‘ट्रायम्फ ऑफ दी इंग्लिश लॅन्ग्वेज’ या पुस्तकातील संदर्भ दिले. वाजपेयींच्या भाषणात कुठल्याही प्रकारे इंग्रजीबद्दलची द्वेषाची भावना नाही. उलट त्यात स्वत: इंग्रजांनी स्वभाषेच्या पुनरुज्जीवनासाठी आणि संवर्धनासाठी अवलंबलेल्या मार्गाबद्दल कौतुक केलेले आढळते.
वाजपेयी लोकसभेत म्हणाले, ‘मी जेव्हा याआधीची भाषणे  ऐकत होतो तेव्हा मला १६५० सालातील इंग्लंडची आठवण येत होती. त्या काळी इंग्लंडमध्ये दोन भाषा प्रचलित होत्या. एक होती फ्रेंच आणि दुसरी होती लॅटिन! इंग्रजी नव्हे! इंग्लंडमध्ये जे काही कायदे केलेले होते ते सर्व फ्रेंच भाषेतच होते. लॅटिन भाषा उच्च शिक्षणाचे माध्यम होती. त्या काळी लॅटिन व फ्रेंच अशा दोन्ही भाषांचे अस्तित्व टिकवण्यासाठी; तसेच इंग्रजी भाषा प्रस्थापित होऊ नये म्हणून; जे तर्ककुतर्क लढविले जात होते, अगदी तसेच तर्क आज भारतात इंग्रजीचे वर्चस्व टिकवण्यासाठी व भारतीय भाषा प्रस्थापित होऊ न देण्यासाठी लढविले जात आहेत. अध्यक्ष महाशय, या संबंधात अत्यंत प्रयत्नपूर्वक मी एक पुस्तक शोधून काढले आहे आणि ते म्हणजे रिचर्ड फॉस्टर जोन्स यांनी लिहिलेले ‘ट्रायम्फ ऑफ दी इंग्लिश ल्ँाग्वेज’ हे होय.

या पुस्तकातील काही भाग मी आपल्याद्वारे या सभागृहापुढे सादर करू इच्छितो. सन १६४७ मध्ये इंग्लंडमधील लॅटनबर्ग या खासदाराने लोकसभेपुढे एक याचिका सादर केली जिच्यामध्ये असे लिहिले होते की, ‘(आम्हाला पराभूत करणाऱ्या) दिग्विजयी नॉर्मनांची भाषा म्हणून आपल्या गुलामगिरीचे प्रतीक ठरलेल्या  अशा भाषेबद्दल सर्वसामान्य जनता पूर्णपणे अनभिज्ञ असतानासुद्धा त्याच भाषेत आमचे कायदे बनविले जाणे; एवढेच नव्हे तर अशा कायद्यांच्या अनुसार आमच्या देशाचा राज्यकारभार चालवणे हा प्रकार म्हणजे स्वतंत्र देशातील गुलामगिरीचाच एक नवीन आविष्कार आहे, म्हणूनच आपल्या देशाच्या सरकारचे सर्व कायदेनियम आणि रीतिरिवाज, कुठल्याही प्रकारे आडमार्ग न काढता, तात्काळ मातृभाषेत लिहिले गेले पाहिजेत.’
या संदर्भात २२ नोव्हेंबर १६५० या दिवशी इंग्लंडच्या लोकसभेने जो निर्णय घेतला तोसुद्धा या लोकसभेने नीट ध्यानात घेतला पाहिजे. त्यात असे म्हटले  होते, ‘सध्याच्या संसदेने, असा कायदा करावा की १ जानेवारी १६५१ पासून आणि त्यापुढे नेहमी न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाच्या सर्व नोंदपुस्तिका आणि कायदेविषयक प्रसिद्ध होणारी सर्व पुस्तके ही इंग्रजीतच असतील.’
खुद्द इंग्लंडमध्येसुद्धा  इंग्रजी भाषा प्रस्थापित करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागला होता हे यावरून स्पष्ट होते. त्या काळी इंग्लंडमध्ये असाही युक्तिवाद केला जात होता की, वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण इंग्रजी भाषेतून केले तर रोगी दगावतील, म्हणून इंग्रजी भाषेची शिक्षणाचे आणि कायद्याचे माध्यम होण्याची योग्यता नाही, पण सरते शेवटी इंग्लंडच्या जनतेने १६५१ सालापासून इंग्रजी भाषा प्रस्थापित करण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतला आणि त्यानंतर इंग्रजीचा इतका विकास केला की आजच्या घडीला आपणही तिच्या अत्यंत मोहात पडलो आहोत आणि तिचा त्याग करू इच्छित नाही.

वाजपेयींनी लोकसभेत केलेले वरील एकूण प्रतिपादन वाचल्यावर आपल्या असे लक्षात येईल की, इंग्लंडचा १६५० सालच्या आधीच्या ६०० वर्षाचा इतिहास आणि भारताचा  आजपासून मागच्या सुमारे दोनशे वर्षाचा इतिहास यात खूपच साम्य आहे. हजार वर्षापूर्वी संपूर्ण ग्रेट ब्रिटन हेसुद्धा भारताप्रमाणेच अनेक लहान लहान स्वतंत्र राज्यात विभागलेले होते. त्या राज्यांमध्ये आपापसात सतत कुरबुरी व लढाया चालू असत. आपल्या शत्रुराज्याचा काटा काढण्यासाठी परदेशातील राजाला आमंत्रण देणे, त्याला साहाय्य करणे असे उद्योग भारतातील राजांप्रमाणे इंग्लंडमधील राजांनीही केले. ज्याप्रमाणे भारताचा प्रदेश काबीज करण्यास इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी राष्ट्रे उत्सुक होती, त्याचप्रमाणे इंग्लंडचा प्रदेश काबीज करण्यास फ्रान्स, बेल्जियम, आर्यलड व इतर देश उत्सुक होते. शेवटी स्थानिक राजांच्या मदतीने फ्रान्सचा परकीय नॉर्मन राजा विजयी झाला. त्याने आपले सरदार व इतर अधिकारी स्वदेशातून आणून त्यांना इंग्लंडमध्ये उच्च पदावर नेमले आणि भरपूर जमीनजुमला, संपत्ती देऊन थोडक्या नॉर्मन अधिकाऱ्यांच्या मार्फत पूर्ण इंग्लंडचा कारभार स्वत: फ्रान्समध्ये बसून चालवला. इंग्लंडनेही भारतावर अगदी अशाच प्रकारे राज्य केले. मध्यमयुगीन काळी फ्रान्सच्या मानाने इंग्लंड मागासलेले समजले जात होते. इंग्लंडवरील पकड घट्ट करण्यासाठी फ्रान्सने इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्था. संसद, कायदेनियम, अर्थव्यवस्था इत्यादींची घडी आपल्या देशातील पद्धतप्रमाणे घातली. त्यासाठी आवश्यक ते सर्व कायदे, नियम, कार्यपद्धती यांच्यासाठी त्यांनी फ्रेंच भाषेचाच उपयोग केला. सामान्य जनतेला ती भाषा समजत नसल्यामुळे त्या भाषेत सोयीस्कर कायदे करून ते जनतेवर लादणे, वेळोवेळी त्या कायद्यांचे सोयीस्कर अर्थ लावणे व त्या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा करणे हे सर्व त्यांना सुलभ जाई व त्याद्वारे थोडय़ा अधिकाऱ्यांमार्फत सामान्य जनतेवर घट्ट पकड ठेवणे त्यांना सहज शक्य झाले. इंग्लंडने भारतामध्ये हुबेहूब हाच मार्ग अवलंबिला. जेव्हा इंग्रजांनी आपल्या देशातील शिक्षण, न्याय, कायदे इत्यादी क्षेत्रांतील (मूलत: फ्रेंचांकडून मिळालेल्या) शासनपद्धती भारतात प्रस्थापित केल्या तेव्हासुद्धा त्यांनी स्थानिक लोकांच्या सोयींपेक्षा स्वत:च्या राज्यकारभाराच्या सोयींकडेच अधिक लक्ष दिले व राज्यकारभारावर पक्का ताबा ठेवण्यासाठी सर्व कायदे-नियम स्वत:च्या इंग्रजी भाषेतच केले. हे सर्व साम्य म्हणजे निव्वळ योगायोग नक्कीच नाही.
इंग्लंड देश फ्रेंचांच्या गुलामगिरीत पिचल्यावर त्यांच्या मनातदेखील स्वत:च्या भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला. तेव्हा इंग्लंडातही स्थानिक इंग्रजी भाषेला ‘दी व्हन्र्याक्युल’ (देशी, अप्रगत बोली भाषा) म्हणूनच संबोधले जाई. भारतातही स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक प्रदेशातील स्थानिक भारतीय भाषेला इंग्रजांनी हीच उपाधी बहाल केलेली होती.

भारताच्या आणि इंग्लंडच्या इतिहासातील साम्य इथे संपतं. इंग्रजी भाषा ही असंस्कृत भाषा समजली जात असल्याकारणाने, जवळजवळ संपूर्ण जनता ख्रिश्चन असूनही अगदी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकांपर्यंत the book of books (सर्वश्रेष्ठ ग्रंथ) समजल्या जाणाऱ्या बायबल या पवित्र धर्मग्रंथाचे भाषांतरही इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिलेले नव्हते. मात्र मराठीत ज्ञानेश्वरी व त्यासारखे  इतर अनेक उत्तमोत्तम धर्मग्रंथ उपलब्ध होते. इतर भारतीय भाषांतही कमीअधिक प्रमाणात तशीच स्थिती होती आणि संस्कृतमधील अगणित बहुमोल महाकाव्ये, नाटके, विज्ञान-तत्त्वज्ञानापर ग्रंथ, धार्मिक ग्रंथ यांचे ज्ञानही उपलब्ध होते. म्हणजे १६५० सालच्या दरम्यान इंग्रजीची परिस्थिती मराठीपेक्षा कितीतरी अधिक हलाखीची होती. राज्यकारभार व कायद्यासाठी फ्रेंच आणि उच्च शिक्षणासाठी लॅटिन या भाषांना पर्यायच नव्हते.

मात्र फ्रेंचांच्या अधिपत्याखाली राहूनही इंग्रजी माणसाचा स्वाभिमान शाबूत राहिला होता. आपली भाषा ही कायद्याची भाषा होऊच शकणार नाही. ज्ञानभाषा होऊच शकणार नाही अशा न्यूनगंडाला फुंकर मारीत तो कपाळाला हात लावून बसला नाही. सहा शतकांचा न्यूनगंड निश्चयाने बाजूला सारून सर्वसामान्यांच्या हितासाठी इंग्रज लोकांनी स्वाभिमानाने व जिद्दीने सरकारला १ जानेवारी १६५१ पासून इंग्लंडमध्ये राज्यकारभार, न्यायसंस्था यांच्यासाठी इंग्रजी भाषा सक्तीची करणे भाग पाडले. तरीही प्रथम अनेक वर्षे शिक्षित आणि उच्चभ्रू वर्गाने दाद दिली नाही. १६५१ सालानंतर शंभराहून अधिक वर्षे लॅटिन व फ्रेंच भाषा इंग्लंडमध्ये पाय रोवून होत्या. (इंग्लंडचा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि धर्मशास्त्रवेत्ता सर आयझ्ॉक न्यूटन, ज्याचे नाव प्रत्येक इंग्रज नेहमीच मोठय़ा अभिमानाने घेत असतो, याने सतराव्या शतकाच्या अखेरच्या काळात केलेल्या आपल्या सर्व शोधांचे प्रबंध लॅटिनमध्येच लिहिले होते. इंग्रजीत नव्हे.) शेवटी इंग्रज सरकारने कायदे आणि राज्यकारभाराच्या विषयात इंग्रजीचा वापर न केल्यास दंड लागू केला आणि अशा प्रकारे जिद्दीने आणि हिकमतीने आपल्या मातृभाषेला आपल्या देशात सर्वोच्च स्थान मिळवून दिले.

म्हणूनच मला असं वाटतं की, इ. स. १६५० पर्यंतचा इंग्लंडचा राजकीय व भाषिक गुलामीचा इतिहास जरी बऱ्याच प्रमाणात भारताच्या इतिहासासारखाच असला तरी इंग्रजांनी १ जानेवारी १६५१ पासून ६०० वर्षाचा न्यूनगंड झटकून टाकून ज्याप्रमाणे स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:चा इतिहास बदलला, त्याप्रमाणे २०० वर्षाच्या न्यूनगंडावर मात करून स्वत:च्या स्वाभिमानाचा आणि वैभवाचा भविष्यकाळ निश्चयपूर्वक पुन्हा घडवणे आज आपल्याला जमेल काय?  आपण कविवर्य माधव जुलियनांच्या पुढील ओळी सार्थ करून दाखवू शकू काय?

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, 
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी।
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, 
हिला बैसवू वैभवाच्या शिरी।।
मराठी असे आमुची मायबोली..

No comments:

Post a Comment