ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Monday, October 24, 2016

माळ_स्त्रीसामर्थ्याची - माळ सातवी

*नमस्कार!!*

मानवी मनाच्या अनेक भावनांना *मूर्तरूप* देणारे असे हे रंग!! मनाची विशालता,मनाचे धैर्य,मनाचा स्वप्नाळूपणा,मनाचा अस्थिरपणा हे सर्व *मूर्तरूपात प्रकटवण्याकरिता रंग रंगातच रंगून जातात*!! *रंग माझा वेगळा* हे सिद्ध करायला ही साथ लागते ती या रंगांची!!! 

*🌹आजचा रंग: हिरवा*

स्वाभिमानाचा, सर्जनशक्तीचा,सौभाग्याचा, धारणाशक्तीचा,प्रकृतीचा,निसर्गाचा निर्देशक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगांचे अतूट नातं आहे. निसर्गाचा रंग ही हिरवाचं!! निसर्गदेवता आई जगदंबाशी संलग्न असणारा हा हिरवा रंग आहे!!


🌹 *या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची सातवी माळ गुंफुया!!*

⚡ *सातवी माळ स्त्री-सामर्थ्याची*⚡

⚡ *सौ.सोजर मस्के*⚡

🌹 *परिचय:*

◾सासर-सौ. सोजर कालिदास रणदिवे-सांगोला..माहेर-पंढरपूर

◾शिक्षण-डी.एड, बी.एड, एम.ए.-मराठी,हिंदी पंडित. एम.एड.

◾पर्यावरण प्रबोधन मासिकाची सदस्या

◾स्त्री-भ्रूण हत्येवर आधारित"आई मला जगायचं आहे" स्वगत प्रसिद्ध

◾उत्तर सोलापूर तालुक्यातील गुणवत्ता विकासात शाळा व्यवस्थापन समितीच्या सहभागाचा अभ्यास हा प्रबंध नुकताच मराठवाडा विद्यापीठात सादर
◾ज्ञानरचनावाद,ABL उपक्रम. लोकसहभाग.

🌹 *पुरस्कार*

◾२०१५-१६ शाळेला iso मानांकन मिळवले .आदर्श शाळा पुरस्कार.

◾सुशील रत्न सामाजिक न्याय पुरस्कार.

◾"सा रे गा सोलापूर" या गीतगायन स्पर्धेत प्रथम

◾"लोकमंगल" आदर्श शिक्षक पुरस्कार.

◾डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड (दिल्ली येथे वितरण)

◾कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार

◾स्टेट इनोव्हेटिव्ह अँड रिसर्च फौंडेशन तर्फे प्रयोगशील शिक्षक पुरस्कार

◾गुणवंत शिक्षक पुरस्कार

◾तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

◾जिल्हास्तरीय सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार

◾जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

◾अतिउत्कृष्ट कामाची दखल म्हणून जि.प.तर्फे विशेष वेतनवाढ

   *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

◾ *सुचिकांत:*
सर्वांना नमस्कार,

मी *सुचिकांत,*  *|| ज्ञानभाषा मराठी ||* समूहाच्या *#माळ_स्त्रीसामर्थ्याची* या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत *सौ. सोजर मस्के* यांचे स्वागत करतो. 💐

सोजर ताई: नमस्कार 🙏

*मृणाल..मृण्मयी:*
स्वागत ताई🙏🌹

◾ *सुचिकांत:*
ताई, आज सर्व प्रथम एकच प्रश्न विचारतो ---- सोजर या नावाचा अर्थ काय आहे?

*सोजर ताई:*
धन्यवाद 🙏

*सुचिकांत:*
खूप शोधला, नाही सापडला...

*सोजर ताई:*
😀मी ही खूप शोधला पण माफ करा नाही सापडला.आजीने कुठून शोधून काढला काय माहित

*सुचिकांत:*
पण खूप छान नाव आहे .. तुमच्या आजीचे आभार मानायला हवेत ..

*सोजर ताई:*
धन्यवाद 🙏
मलाही खूप आवडते. वेगळेपण आहे नावात!!

◾ *सुचिकांत:*
आपण पहिला प्रश्न निवेदिता ताईंचा घेऊया ..

*सोजर ताई:* हो विचारा!

◾ *निवेदिता ताई:*
आपलं माहेर पंढरपूरचं, विठुरायाचं. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत वारीचा, आषाढीसाठी जमा होणाऱ्या अफाट जनसमुदायाचा काही प्रभाव पडला का? - निवेदिता खांडेकर

*सोजर ताई:*
हो. मला अभंग आवडतात व थोडे गायला ही येतात!! वारी वेळेस भारी वाटते

*मृणाल..मृण्मयी:*
आम्हाला कधीतरी ऐकवा वाचनकट्ट्यात!

*सोजर ताई:*
हो नक्की!!

◾ *सुचिकांत:*
तुमचा सर्वात आवडता अभंग कोणता ?

*सोजर ताई:*
वृक्षवल्ली आम्हा ....

◾ *सुचिकांत:*
देवीला अष्टभुजा होत्या म्हणून ती एकाचवेळी  इतके  कामं करायची .
तुम्ही(घर ,शाळा ,स्वाध्याय ,व्हॉट्सॅप ,फेसबुक,प्रशासक पद इ इ ) इतकी कसं लीलया पार पाडता . कसं साधता सगळं ?? - डॉ. प्रज्ञा देशपांडे

*सोजर ताई:*
🙏🙏छान प्रश्न प्रज्ञाताई
आवड असेल तर सवड मिळते हे नक्की.त्रास होतो पण कौतुक झाले की सगळे विसरते व आनंद वाटतो.

◾ *सुचिकांत:*
वर तुमच्या मांजरांचा उल्लेख नाहीये ..🐈

*सोजर ताई:*
😀😀हो माझ्याकडे  5 मांजर आहेत.अगदी माणसासारखी राहतात.
सात होती दोन परवा कुठे गेले माहिती नाही

◾ *सुचिकांत:*
😄...सोजर ताई, अनेक जण म्हणतात की अपघाताने मी शिक्षक झालो /झाले , तुमच्या बाबतीत असंच झालं की, तुम्ही पहिल्यापासूनच या क्षेत्रात यायचं ठरवलं होतं?

*सोजर ताई:*
मला शाळेत असतानाच शिक्षकी पेशा आवडायचा. आमच्या मॅडम खूप छान शिकवायच्या तेव्हाच ठरवले होते. शिवाय वडील शिक्षकच होते.

◾ *सुचिकांत:*
झकास ... तुमच्या दैनंदिन कामातील अडचणी/आव्हाने कोणती आहेत?त्यावर कशी मात करता?

*सोजर ताई:*
पालकांचे सहकार्य आम्हाला अजिबात नसते ही मोठी अडचण आहे

◾ *सुचिकांत:*
का ? त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायचं नसतं का ?

*सोजर ताई:*
आम्ही स्वतः मुलांना त्यांचे पालक होऊन शिकवतो. आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे. तेथील पालक फ़क्त पोटापाण्याचा विचार करतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो.

*सुचिकांत:*
ओह ..हो बऱ्याच ठिकाणी वाचलं आहे यावर ..

*सोजर ताई:*
ती मुले आमचीच समजून आम्ही सगळे काम करतो.मिटींग सुद्धा त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हाच घेतो.जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे तारेवरची कसरत आहे

◾ *सुचिकांत:*
खरंय ..तुम्हाला वैयक्तिक, कोणता विषय शिकवायला सर्वात जास्त आवडतो आणि का?

*सोजर ताई:*
माझा आवडता विषय मराठी आहे. खूप आवडतो. कविता गायन तालासुरात हावभावयुक्त घेतल्याने मुलांना ही ते खूप आवडते.शिवाय व्याकरण व निबंध.मुले निबंध स्वतःच्या शब्दात लिहीतात

◾ *सुचिकांत:*
मध्ये फेसबुकवर मी काही फोटो पाहिले तुमचे ..तुम्ही मुलांना घेऊन क्षेत्रभेटीवर गेला होतात ..त्याबद्दल सांगाल ?
बहुतेक पाण्याचे स्रोत हा विषय होता ..

*सोजर ताई:*
हो. मी तिसरीचा विज्ञानाचा पाठ घेत होते --पाणी कोठून मिळते. पाऊस पडत होता शिवाय सगळीकडे पाणी साठले होते. मुलांना प्रत्यक्ष तेथे नेऊन ओढा, तलाव, विहीर, तळे दाखवले.

*सुचिकांत:*
मस्त ... मुलांना आवडलं असेल ना जाम ..

*सोजर ताई:*
सर्वाना खूप आवडले. शिवाय फ्लाॅवर शेतीला ही भेट दिली आहे

◾ *सुचिकांत:*
अच्छा!!मुलांना मूल्यशिक्षण देण्याची सर्वात चांगली पद्धत तुम्हाला कुठली वाटते? - सुशील सोनार

*सोजर ताई:*
वर्गाना परिपाठ वाटून देऊन त्यातील सर्व पायऱ्या घ्यायला सांगितल्या की आपोआप मूल्ये त्यांच्यात रुजतात.मी गेल्या वर्षी हा नवोपक्रम सादर केला. परिपाठातून विविध मूल्ये

◾ *मृणाल...मृण्मयी:*
थोडक्यात सांगाल?

*सोजर ताई:*
आपली दहा मूल्ये आहेत ती बाहेरील बाजूस लिहून ठेवायची. मुले येता जाता पाहतात. त्याचा परिपाठात वापर करतात

◾ *सुचिकांत:*
ताई, तुमच्या शाळेच्या गावची लोकसंख्या किती आहे?आणि शाळेचा पट ?

*सोजर ताई:*
फ़क्त  360

*निवेदिता ताई:*
बापरे !!पाडाच म्हणायचा

*सोजर ताई:*
हो वाडी!!आता खूप छोट्या गावातील शाळेतकाम करते मी!!30 आहे. चार वर्ग

◾ *सुचिकांत:*
अच्छा .. म्हणजे एका वर्गात ३० असे ४ ?

*सोजर ताई:*
पुर्वी मी  30 शिक्षक संख्या असलेल्या शाळेत होते अन आता विद्यार्थी  30

◾ *सुचिकांत:*
अच्छा!!तिथे पण इंग्रजी माध्यमाचे वेड आहे का ?यावर एक प्रश्न आला आहे -----

पंढरपूर सोलापूर सांगोला भागात अमराठी आकडा नगण्य आहे, तरीही इंग्रजी(सेमी इंग्रजी) शाळा आपल्या पाय पसरत आहेत, अशा मध्ये मराठीशाळा सोडून आपल्या पाल्याला इंग्रजीतून शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय भविष्यात इंग्रजी बोलता येईल की नाही याच भीतिने घेतला जातो असं माझं निरीक्षण आहे,  हे रोखण्यासाठी काय करता येईल? - राहुल वेळापुरे

*सोजर ताई:*
हो. त्या गावातील  3 मुले इंग्रजी शाळेत जातात. पालकांचे प्रबोधन केले आहे. पुढील वर्षी घालतो म्हणाले आपल्याकडे फरक सांगितला त्यांना. पटले त्यांना!!आपल्या मुलाला इंग्रजी चांगले यावे शिवाय ड्रेस, गाडी ही त्याला कारणीभूत आहे.पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याला इंग्रजी येत नाही मग यांचा अभ्यास कसा घ्यायचा.आपल्याला पालकांना दोन्ही शाळेतील फरक सांगितला पाहिजे.मूल मातृभाषेतून जास्त चांगले शिकते हे पटवून सांगायला हवे.

◾ *सुचिकांत:*
-खरं आहे!! ताई, समुहात अनेक लोक मराठी प्रेमी आहेत, त्यांना *ज्ञानरचनावाद* याबद्दल अधिक माहिती नाही. त्यांना थोडक्यात ज्ञानरचनावाद म्हणजे काय, कसे समजावून सांगाल?

*सोजर ताई:*
ज्ञानरचनावाद थोडक्यात असे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर समस्या ठेवायची. त्यातून मार्ग काढण्यासाठी तो आपल्या सहकरयाची मदत घेईल किंवा गटात चर्चा करून त्यावर उपाय शोधतील.त्यांच्याजवळील ज्ञानाचा उपयोग करून शिकणे म्हणजे  ज्ञानरचनावाद!!

◾ *सुचिकांत:*
तुम्ही याअगोदरच्या पद्धतीत देखील शिकवले आहे .. दोन्हींची तुलना केल्यास कोणती पद्धत अधिक प्रभावी वाटते तुम्हाला ?

*सोजर ताई:*
सध्याची जी ज्ञानरचनावादी पद्धत आहे त्यात मूल पटकन शिकते हा माझा अनुभव आहे.पाहणे आणि कृती दोन्ही होतायत!!

◾ *सुचिकांत:*
- ज्ञानरचनावादी शाळा खर्चिक आणि कष्टाचे काम आहे का हो खूप?

*सोजर ताई:*
हो आहे पण मुलांना ज्यामुळे आनंद मिळतो व शिक्षकांना विश्रांती मिळते.

*सुचिकांत:*
विश्रांती म्हणजे सतत बडबडीतून ...

*सोजर ताई:*
हो बरोबर. शिवाय घोकंपट्टी ही होती ना

◾ *सुचिकांत:*
शिक्षणेतर कामांचे ओझे कितपत त्रासदायक वाटते?शासनाच्या सतत बदलणाऱ्या सूचना, व्हाट्सएवर कायम उपलब्ध राहण्याचे बंधन कितपत जाचक वाटते? - काळपांडे सर

*सोजर ताई:*
खरं सांगू या कामामुळे आमच्यातील उपक्रमशील शिक्षक मरण पावत चालला आहे. सतत तीच कामे घरी शाळेत सगळीकडे 😒😒

माझ्याकडे मुख्याध्यापक चार्ज आहे.आहे.खूप ओढाताण होते आहे. दोन वर्ग व चार्ज...डोंबारी लोकांसारखी अवस्था आहे आमची

◾ *सुचिकांत:*
खरंय!! शासनाच्या सतत बदलणाऱ्या सूचना, व्हाट्सएवर कायम उपलब्ध राहण्याचे बंधन कितपत जाचक वाटते?

*सोजर ताई:*
खूपच जाचक आहे सगळे. पुर्वी मोबाईल वापरू देत नव्हते ते बरे वाटत होते. निदान तो वेळ त्या निष्पाप मुलांना तरी देत होतो

◾ *सुचिकांत:*
मग या सगळ्यावर तुम्हाला काय उपाय वाटतो?

*सोजर ताई:*
आता सतत ऑनलाईन राहावे लागते. पण आम्ही नेटवरून कविता गाणी घेऊन मुलांना ऐकवतो व दाखवतो.ही कामे आठवड्यातून एक दिवस द्यावीत म्हणजे आम्हाला नीट शिकवता येईल..

◾ *सुचिकांत:*
किंवा तुम्ही शासनात असता तर कोणते असे बदल घडवले असते जेणे करून शिक्षकांचे बर्डन कमी झाले असते .. असे कोणतेही २ उपाय ?

*सोजर ताई:*
मी शासनात असते तर प्रथम शालेय पोषण आहार योजना महिन्यातून एकच दिवस भरायला सांगितली असती.

◾ *सुचिकांत:*
पण मग एके दिवशी ताण येणार नाही ?

*सोजर ताई:*
नाही!!प्रथम ज्यासाठी आमची नेमणूक केली ते उद्दिष्ट साध्य होईल याकडे लक्ष वेधले असते

*सुचिकांत:*
👏👏 खूप छान ..

*स्वप्नील पाटील:*
हे एकदम खरं..

*सोजर ताई:*
आता आम्हाला दररोज तीन वह्या पूर्ण करून ऑनलाईन आकडा मेनू भरावा लागतो. शिवाय सरल आहेच .आज पासून शाळा माहिती भरायची आहे.

*सुचिकांत:*
त्यात रेंजचा न संपणारा प्रश्न ..

*सोजर ताई:*
ते तर विचारूच नका. रात्री  12 वाजेपर्यंत भरा म्हणतात.कोणीच कारणे ऐकत नाहीत.खाजगी शाळांना क्लार्क असतात.करतो आम्ही सगळे गपगुमान!!

*स्वप्नील पाटील:*
वाईट परिस्थिती आहे,(मूळ)काम कमी (नसती) उठाठेव जास्त आहे हल्ली!!

◾ *सुचिकांत:*
- ज्या शाळांनी अजूनही ज्ञानरचनावादाचे महत्त्व ओळखले नाही त्या शाळांना काय संदेश द्याल?

*सोजर ताई:*
विद्यार्थ्यांना खरोखरच प्रगत करायचे असेल तर प्रत्येक शाळेने ज्ञानरचनावादाचा अवलंब करावा.

◾ *सुचिकांत:*
आपल्याला प्रयोगशील शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालाय. काही महत्वाचे innovations सांगू शकाल जे पालक आपल्या घरी मुलांकरता ते प्रयोग करू शकतील. - निवेदिता खांडेकर

*सोजर ताई:*
👍मी स्वच्छ पाणी हा सोपा प्रयोग मुलांना घेतला. त्यांनी घरी करून दाखवला. दुसर्‍या दिवशी पालकांनी माझे कौतुक केले. पाणी स्वच्छ होते पण शुद्ध होत नाही हे त्यांनाही पटले

मी चर्चा पद्धतीने अध्यापन करत असल्याने सर्व मुले बोलकी व धीट, हजरजबाबी होतात

◾ *सुचिकांत:*
छानच- ZP शाळा म्हणलं कि बघायचा दृष्टिकोन तितकासा चांगला नाही लोकांचा.(आता चित्र बदलत आहे,पण गंमत हि आहे की आपल्या पोरांसाठी नाकं मुरडणारी हि पिढी याच शाळांतून शिकली.)कमी सुविधा,अपुरी पटसंख्या,इंग्रजी शाळांचे अवास्तव झालेला उदोउदो याबरोबरीने ZP शाळा आता कात टाकत आहेत.Zp शाळा कुठे कमी पडत होत्या की काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती.? आणि आता आपण जस iso मानांकन मिळवलत शाळेकरता,अश्या प्रयत्नांना शासनाकडून कश्या प्रकारे प्रोत्साहन अपेक्षित आहे.? - स्वप्नील पाटील

*सोजर ताई:*
हो अगदी बरोबर आहे. जे त्या शाळेत शिकले तेच नाक मुरडतात. त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. पण आता
सगळे शिक्षक उच्च शिक्षित झाले आहेत. नवीन नवीन अध्यापन तंत्राचा वापर करून अध्यापन करतात.शिवाय आमच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. तंत्रसनेही शिक्षणाचा वापर करत आहोत त्यामुळे पालकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आपल्याकडे पट वाढत आहे.सगळे शिक्षक तंत्रस्नेही बनले आहेत

◾ *सुचिकांत:*
आता आपण जस iso मानांकन मिळवलत शाळेकरता,अश्या प्रयत्नांना शासनाकडून कश्या प्रकारे प्रोत्साहन अपेक्षित आहे.?

*सोजर ताई:*
मी माझी शाळा पूर्ण लोकसहभागातून रंगवून व आय. एस. ओ केली.

◾ *स्वप्नील पाटील:*
तुम्ही म्हणालात तसं,अशैक्षणिक कामे,क्लर्क शिपाई नाही,अपुरा निधी व इतर अशी अगणित यादी होईल,याउपर तुम्ही उपक्रमशील राहता,शासनाकडून कमीत कमी काय अपेक्षित आहे.?

*सोजर ताई:*
शासनाने आर्थिक मदत करायला हवी पण ती मिळत नाही. शिक्षकांना शिक्षक म्हणूनच राहू द्यावे मग पहा प्रगतीचा आलेख कसा उंचावतो ते.
पण हे सगळे मनातच..

*निवेदिता ताई:*
अगदी बरोब्बर

◾ *सुचिकांत:*
- शाळा ISO करणे खरंतर खर्चिक काम, पण तुम्ही हे आव्हान कसं पेलवलं? काय अडचणी आल्या? कसा विरोध झाला? याबद्दल सांगाना?

*सोजर ताई:* हो. आय. एस ओ. करायला एक लाख रूपये सहज जातात. पालक द्यायला तयार होत नाहीत. मग मोठ्या संस्थांना निधी मागावा लागतो. आता शंकर दादा कसे मागत आहेत तसे. आमचे पालक जे सधन आहेत त्यांना कामे वाटून दिली. एकानी रंग, एकांनी फी भरायची, काहीना फर्निचर घ्यायचे काम दिले. शिवाय मी स्वतः  25 000 /_खर्च केला .

*निवेदिता ताई:*
स्वतः !! 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

*सोजर ताई:*
हो स्वतः घातले!!पालक तयार होण्यासाठी अगोदर आपल्याला चमत्कार दाखवावा लागतो.माझ्या शाळेत फर्निचर खूपच सुंदर बनवले आहे.

◾ *सुचिकांत:*
- शाळा ISO करण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया, निकष कुठे मिळू शकतील? त्यावर एखादा माहितीपूर्ण लेख लिहाल का?

*सोजर ताई:*
हो. निकष माझ्या कडे आहेत. लिहून देते.

१.जुने रेकॉर्ड मागणी २.व्हिजिटर नोंदवही ३.विद्यार्थी फाईल ४. शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम ५.वृक्षारोपण,टेबलक्लॉथ ६.घोषवाक्य,फ्लॉवरपॉट ७. ग्रामस्थांचा सहभाग ८.शाळेचे नाव ९.सेंद्रिय गांडूळ खत १०. चप्पल स्टँड ११.अधिकारी पदाधिकारी १२.समित्या फलक १३.वर्गांना कार्यालयास फलक १४.घोषवाक्य,संदेश सुविचार १५.खिडक्यांना पडदे १६.स्वच्छता व टापटिपपणा १७.आपत्कालीन मार्ग १८.शिक्षक, विद्यार्थी ओळखपत्र १९. दिशादर्शक फलक २०.बोलका व्हरांडा २१.शालेय क्रीडांगण २२.सौरऊर्जा वापर २३.इन्व्हर्टर सुविधा, वीज २४.प्रकाश योजना २५.क्रीडा साहित्य मागणी २६.कला,कार्य,शैक्षणिक साहित्य कोपरे २७.विज्ञान प्रयोगशाळा २८.पार्किंग व्यवस्था २९.वीजबचत, पाणीबचत संदेश ३०.स्वच्छता संदेश पाण्याची सुविधा ३१.स्वच्छ सुंदर शालेय बाह्यांग/अंतरंग ३२.प्रथमोपचार पेटी ३३.ऑफिस अंतर्गत रचना,शालेय रेकॉर्ड ३४. राष्ट्रीय नेत्यांचे फोटो ३५.संगणक शिक्षण ई-लर्निंग,डिजिटल क्लासरूम ३६.बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका ३७.स्वागत फलक ३८.शौचालय सुविधा फलक ३९.अग्निशामक यंत्र ४०.वाचनालय ४१.संरक्षण भिंत ४२.शिक्षक कार्यसूची ४३.सूचना व कौतुक पेटी

◾ *सुचिकांत:*
शालेय कामकाजात लोकसहभागाचे महत्त्व मोठे आहे ... पण यात ज्ञानभाषा सारखे समूह हातभार लावत आहेत याबद्दल तुमचे काय मत ? खरोखर अशा समुहांचा फायदा होतोय का ?

*सोजर ताई:*
मला खूप अभिमान आहे आपल्या समूहाचा. मी नेहमीच सुचिभाऊंना सांगत असते. हा समूह म्हणजे महाज्ञानी व दानशूर आहे.

◾ *सुचिकांत:*
माझा विचारायचा उद्देश होता की .. आपल्यासारखे अनेक समूह कार्यरत आहेत .. त्यांच्या कार्याचा उपयोग होतोय का ? आपण ज्या पोस्ट लिहितो .. विचार मांडतो .. ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत का ?

*सोजर ताई:*
हो. पण इतर समूहात तितकेसे मनावर घेतले जात नाही जितके आपण घेता
माझा सर फाऊंडेशन हा समूह ही असाच आपल्यासारखा आहे.शैक्षणिक चर्चा व मदत

◾ *सुचिकांत:*
आता आपण तुमच्या पर्यावर्णाशी संबंधित कामाकडे वळूया ...

◾ *निवेदिता ताई:*
इतके व्याप आणि तरीही
पर्यावरण संबंधी मासिकात तुम्ही लिखाणही करता का?

*सोजर ताई:*
हो. मला प्रवास करताना आठवते मी वहीत लिहून घेते लगेच. नाहीतर परत विसरते. 😀सध्याचा विषयच पर्यावरण व बेटी बचाओ आहे

*निवेदिता ताई:*
भारीच

*सुचिकांत:*
पर्यावरण प्रबोधन मासिकाचे आम्हाला सभासद होता येईल काय.
जि.प.शाळा शेलविहीरे.

*सोजर ताई:*
हो.सांगते घ्यायला

◾ *सुचिकांत:*
आजची स्री खरंच ,"स्वयंसिद्धा" आहे? - वृषाली गोखले

*सोजर ताई:*
खरचं आहे. पण सगळ्या जणींनी कंबर कसायला हवी. कुणालाही घाबरायचे नाही असे ठरवले पाहिजे.

सोलापूर जिल्हा परिषदेने होईन मी स्वयंसिद्धा नावाचे कराटे, योगा चे पुस्तक तयार केले आहे. 2006 ला. त्यावेळी आम्ही मुलीना कराटे शिकवले होते. मी लोणावळा येथे या प्रशिक्षणाला गेले होते.माझ्या दोन्ही मुलीना कराटे येतात आणि मलाही 😀

◾ *सुचिकांत:*
अरे वा ..black belt ?💪

*सोजर ताई:*
हो!!त्या दोघी आहेत. मी फ़क्त स्वसंरक्षणासाठी शिकले.आचरण महत्वाचे आहे. पुस्तकी ज्ञान फ़क्त नको!!

*निवेदिता ताई:*
👏🏻👏🏻👏🏻 सहीच

◾ *सुचिकांत:*
काही शैक्षणिक प्रश्न आले आहेत .. आपण तिकडे वळूया .. नंतर पुरस्कार आणि समारोप ...

पहिलीपासून इंग्रजी सुरू होऊन आता 16 वर्षे झाली आहेत. इंग्रजी शिकवण्यासाठी वेगळे शिक्षक नसतात. ते प्रभावी व्हावे यासाठी तुम्ही काय करता? पहिलीपासून इंग्रजीच्या अध्यापनाबद्दल तुम्ही  समाधानी आहात काय?तुमच्या शाळेत किंवा परिसरांतील शाळांत 'सेमी-इंग्रजी' आहे काय? तुमचे 'सेमी-इंग्रजी'बद्दल काय मत आहे?-....... काळपांडे सर

◾ *सोजर ताई:*
सन 2000 साली इंग्रजी आले. आम्ही शैक्षणिक साहित्याचा वापर करून प्रभावी अध्यापन करण्याचा प्रयत्न करतो. चित्र, शब्द असा क्रम घेतला तर मूल लवकर शिकते. आम्ही स्वतः तयारी करून संभाषणाचया माध्यमातून शिकवतो.
आमच्याकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत पण त्यांच्यापेक्षा आपली मुले इंग्रजी छान शिकतात. हो आम्ही समाधानी आहोत.
पण सेमी इंग्रजी नसावे या मताची मी आहे.

◾ *सुचिकांत:*
पण सेमी इंग्रजी नसावे या मताची मी आहे. >>> यावर अजून सांगाल? असं तुम्हाला का वाटतं ?

*सोजर ताई:*
सध्या पहिलीपासून इंग्रजी आहे. फ़क्त दोन विषय सेमी मधून. त्यात ती मुले गोंधळून जातात. मातृभाषेतून जेवढे पटकन समजते तेवढे इंग्रजीतून नाही.

◾ *सुचिकांत:*
अच्छा!!डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप साठी तुम्ही कोणता विषय निवडला होता व का? - निवेदिता ताई

*सोजर ताई:*
मी केलेल्या समाजसेवेसाठीचा हा पुरस्कार आहे. मागासवर्गीय समाजातील मुलींचे शिक्षण हा विषय आहे.
या समाजात मुली जास्त शिकत नाहीत. त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे...बालविवाह हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यात

◾ *सुचिकांत:*
ही प्रथा अजून चालू आहे??महाराष्ट्रात तरी ?

*सोजर ताई:*
हो आहे!! मी  2012 साली एक बालविवाह तहसीलदार यांच्या मदतीने रोखला.15 वर्षाच्या मुलीचे  एक मुलगा पहिलीला असलेल्या विधुर पुरुषाशी लग्न होते. मंडपात लग्न थांबवले आहे.

◾ *सुचिकांत:*
खरंच भारी!!!मग विरोध झाला नाही का ?

*सोजर ताई:*
हो. परत मला खूप त्रास झाला पण घाबरत ही होते ते लोक!!

*मृणाल..मृण्मयी:*
रणरागिणी रूप !!!

*वृषाली ताई:*
सलाम!

◾ *सुचिकांत:*
असाच अजून एक प्रश्न आहे ---सोलापूर जिल्ह्यात स्त्री भ्रूणहत्येचा प्रश्न आहे काय? असल्यास कितपत गंभीर?.....काळपांडे सर 👆

*सोजर ताई:*
हो आहे. पण जास्त नाही. आता त्याला आळा बसत आहे पण चोरून चालते.
मागे एका डाॅकटर दांपत्याना अटक झाल्याने जरा प्रमाण कमी झाले आहे.

◾ *सुचिकांत:*
शेवटी एक वेगळा प्रश्न घेतो आहे .....मुलांना जबाबदार नेटिझन बनण्यासाठी शाळेने काही उपक्रम करावेत असं वाटतं का? --- सुशील सोनार

फक्त तुमच्या शाळेने या अर्थाने घेऊ नका .. एकूणच ...

*सोजर ताई:*
आपण सर्व उपक्रम राबवत आहोतच. जि. प. च्या शाळा बरं का. मला वाटते हे मुलांना पुरेसे आहे.अंदाजपत्रकातच उपक्रम नोंदी केलेल्या आहेत.

*सुचिकांत:*
त्यांना *नेटिझन* म्हणजे ... जबाबदार आंतरजाल वापरकर्ती पिढी - Internet Users बनवण्याकरता उपक्रम राबवावे अशी इच्छा आहे ..

*सोजर ताई:*
हो तेच. कारण प्रत्येक शाळेत संगणक आलेला आहे. शिवाय मुले आपल्यापेक्षा जास्त शिताफीने मोबाईल हाताळतात. मुलांना संगणक ज्ञान देत आहोत. म्हणून पुरेसे आहे!!

◾ *सुचिकांतजी:*
खूप छान वाटले तुमच्याशी बोलून

*सोजर ताई:*
धन्यवाद. मी ही बोलण्याच्या ओघात जरा भरकटली असेल तर सर्वांनी मोठ्या मनाने माफ करा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्याबरोबर संवाद साधून मला खूप आनंद झाला. असेच प्रेम राहू द्या 🙏😊

*अमोल शिंपी:*
खरी रणरागिणी!!!दुर्गा देवी!!

◾ *सुचिकांतजी:*
कराटे येणारी!! ज्युदो ? की तायकोंदो ?

*सोजर ताई:*
ज्यूदो!! जिल्हा परिषदेची कृपा 🙏🙏

*वसन्त देशपांडे:*
सोजरताई आपण केलेली रचनावादाची व्याख्या जर आपल्याशिक्षणात आली तर चित्रच बदलून जाईल. खूप खूप धन्यवाद🙏

*वृषाली ताई:*
"सोल्जर,सोल्जर,.....सोजर ताई"....असंच आलं आत्ता मनांत!
कदाचित आजीला पुढचे भविष्य दिसले असावे!मर्दानी तनुजा महाराष्ट्राची!तुमच्या स्वच्छ,नितळ,निर्मळ,निखळ,प्रामाणिक अशा संवादशैलीने प्रेरित झाले आहे.

अशा तेजस्वी स्री ला कोणत्या शब्दांनी सन्मानित करु?
स्रीने जसे असले पाहिजे तशाच त्या,"सोल्जर"! आहेत.माझं खुप प्रेम व आदर तुम्हाला अर्पण करते.दाटले अश्रु च नयनी!
घे,भरारी अशीच गे उंच.उंच गगनी!
🙏🏾

*सोजर ताई:*
खूप मोठी भेट दिली ताई, कायम जपून ठेवेन 🙏🙏💐💐👍

*स्वप्नील पाटील:*
आज आईची मुलाखत झाल्यासारखं वाटलं अगदी..माझी आई पण वस्ती शाळेवर शिक्षिका आहे(१ली ते ४थी,२४ पट आहे(बाबा तेथूनच गेल्या वर्षी निवृत्त झालेत).याच सगळ्या समस्या तिला भेडसावतात.तीच मुख्याध्यापक,तीच क्लर्क,तीच शिपाई,सगळी अशैक्षणिक कामे करून शेवटी उरलेल्या वेळात तीच शिक्षक.
जास्त काय बोलू..🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

*सोजर ताई:*
धन्यवाद. आईपण ही लाभले आज

*विजया पाटील‬:*
सोजरताई..,आपले कर्तृत्व खरंच आम्हा जि.प.शिक्षिकांसाठी प्रेरणादायीच..,💐💐💐👏🏻👏🏻👏🏻आपली मते व मुलाखत वाचतांना स्वतःपुढे येणा-या अनंत अडचणीच दिसत होत्या..आपली वाटचाल नक्कीच आम्हाला पुढे चालण्यास मार्ग दाखविणारी...🙏🏻🙏🏻

*अमृताताई:*
सोजरताई तुमची मुलाखत खुपच प्रोत्साहन देणारी आहे.सर्वात महत्त्वाची व मला विलक्षण वाटणारी गोष्ट म्हणजे तुमच्या शाळेत एकूण ३०मुले आहेत.किती नशिबवान अाहेत ती की शिक्षकाचे जवळजवळ सर्वच लक्ष त्यांच्यावरच केंद्रित होत असणार,प्रत्येक विद्यार्थ्यामधे कोणकोणते कलागुण,वैशिष्ट्ये आहेत ते सर्व लक्षात घेऊन त्या त्या मुलाशी संवाद साधल्या जात असणार.आणि प्रात्यक्षिक आधारित शिक्षण तेही निसर्गाच्या सान्निध्यात. 👌�👌�👌�खुप छान.

*प्रमिला ताई:*
वृषाली ताई म्हणाल्या त्याप्रमाणे या वर्षीचं नवरात्र खरच चैतन्यान भारलेलं आहे.
*सोल्जर* नाव एकदम रास्त आहे असे वाटते. समुहात आल्यापासून सोजरताईंच्या नावाबद्दल कुतूहल होते.माझी आजी आठवणी सांगताना इंग्रज सैनिकांचा *सोजर*असा उल्लेख करायची.
खुपच प्रेरणादायी मुलाखत.👏�👏�👏�💐💐💐

*श्रुती पानसे ताई:*
सोजरताई, मुलाखत खूप छान. एक वेगळंच पान   उघडल आमच्यासाठी.
सोजिरी - गोजिरी असा शब्द ऐकला होता माझ्या आजीकडून. साजिरी - गोजिरी आपल्याला माहितीच आहे.
बालविवाह रोखतानाचा अनुभव कधीतरी प्रत्यक्ष ऐकायला आवडेल.

*काळपांडे काका:*
👍सोजिरी➡सोजर हे मलासुद्धा काल सुचले होते. पण सोजर मस्के यांची सर्व सदस्यांच्या मनात निर्माण झालेली 'सोजर' ही प्रतिमा इतकी पक्की झालेली दिसली की मी अशी पोस्ट टाकली नाही.कोणत्याही आजीच्या मनात आपल्या नातीची/नातवाची प्रतिमा जगातले सर्वात गोड बाळ अशीच असणार ना!

*अलका ताई:*
मुलाखत छान। माझ्या आईची मामी होती ती सोज्ज्वळ च्या ऐवजी सोजर म्हणायची.बाई फार सोजर आहे.असे वाक्य मी अनेकदा त्यांच्या तोंडून ऐकले आहे

*सुयोगा ताई:*
मला ऐकल्यापासूनच उत्सुकता आहे 😱सोजर=साजिरी. =सोबर☺

◾ *सुचिकांत:*

*#माळ_स्त्रीसामर्थ्याची*

आज आपण संवाद साधला, सौ. सोजर मस्के ताईंशी. ताईंनी देखील सर्व प्रश्नांची मनमोकळे पणाने उत्तरे दिली त्याकरता सोजर ताईंचे समूहातर्फे मनःपूर्वक आभार.

   *॥ज्ञानभाषा मराठी॥*
*॥माझी शाळा📚माझी भाषा॥*

1 comment:

  1. वर एकाने सोजर या नावाचा आपणास अर्थ विचारला....सांगायला आनंद वाटतोय माझे ही नाव सोजर आहे ...मी ही या नावाचा खूप अर्थ शोधला पण बरोबर असा नाही सापडला...पण मला दहावीमध्ये असताना मराठी पाठ्यपुस्तकात एक धडा होता त्यात सैनिकांचा उल्लेख केलेला होता..सैनिकांना संस्कृतमधे सोजीर असा शब्द होता...बहुधा सोजीर चा सोजर असा काहीसा शब्द झालेला असावा हा माझा एक अंदाज आहे...

    ReplyDelete