ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, April 17, 2016

स्वा. सावरकर - काही आठवणी : डॉ. वसंत काळपांडे सर

सुचिकांत, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर गेले त्यावेळी मी दहावीत होतो. त्यांना मी प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. परंतु त्यांच्या 'स्वतंत्रते भगवती', 'सागरा प्राण तळमळला', 'माझे मृत्युपत्र' अशा कवितांतून भेटणारे भावनोत्कटता आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांचा संगम असलेले प्रतिभाशाली कवी, तर त्यांच्या लेखांतून "गाय हा एक उपयुक्त पशु आहे, देव नाही.' , "एखाद्या वेळी थोडी गोहत्या झाली तरी चालेल, परंतु राष्ट्राची बुद्धिहत्या होऊन चालणार नाही." अशा जळजळीत शब्दांत विचार मांडणारे, पोथीनिष्ठेतून बाहेर पडण्याचे आवाहन करणारे विज्ञाननिष्ठ विचारवंत अशी दोन टोकाची, परंतु तेवढाच दिव्यत्वाची प्रचिती देणारी त्यांची रूपे त्यांच्या साहित्यातून अनुभवली होती.

 9वी ते 11वीला मराठी शिकवायला राम दारव्हेकर सर होते. ते प्रख्यात नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे लहान भाऊ. दारव्हेकर सर उत्कृष्ट शिक्षक तर होतेच, परंतु त्याचबरोबर सावरकरांचे अनुयायीसुद्धा होते.

आम्हाला प्राथमिक शाळेत मध्यप्रदेश सरकारची, तर माध्यमिक शाळेत विदर्भ माध्यमिक शिक्षण मंडळाची पुस्तके होती. पुरवणी वाचनासाठी प्रत्येक इयत्तेला एक स्वतंत्र पुस्तक असायचे. 9वी ते 11वी पर्यंत अनुक्रमे 'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी', 'ती धन्य बंदीशाला' आणि 'उमाजी नाईक' ही पुस्तके पुरवणी वाचनासाठी होती.

'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी' ही कादंबरी तात्या टोपे यांच्या जीवनावर आधारलेली होती. 1857च्या लढ्याला पूर्वी 'शिपायांचे बंड' म्हणत. त्याला स्वातंत्र्यसमर किंवा स्वातंत्र्ययुद्ध हे नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच दिले हे दारव्हेकर सरांमुळेच कळले.

'ती धन्य बंदीशाला' हे डॉ. प्र. न. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक स्वातंत्र्यसैनिकांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित लेखांचा संग्रह होता. पुस्तकाच्या एका पानावर पुस्तकात काय असेल याची कल्पना देणाऱ्या कवितेच्या पुढील ओळी होत्या:-

गीतारहस्य बाळा
कमला विनायकाला।
दे स्फूर्ती जावयाला
ती धन्य बंदीशाला।।

या पुस्तकातले 'विनायक दामोदर सावरकर' हे प्रकरण शिकवताना दारव्हेकर सर अगदी देहभान हरपून शिकवायचे.

11वीला 'उमाजी नाईक' हे नाटक पुरवणी वाचनासाठी होते. ते शिकवताना उमाजी नाईक ----> लहूजी साळवे ---> वासुदेव बळवंत फडके ---> विनायक दामोदर सावरकर ही क्रांतिकारकांची मालिका सर अतिशय प्रभावी रीतीने समजावून सांगत.

______________

भाग २

दारव्हेकर सरांमुळे आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बरीच माहिती झाली होती.अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्याऐवजी सिंधुसागर आणि गंगासागर हे शब्दच तोंडात बसले होते.

1966मध्ये सावरकरांनी प्रायोपवेशन (आत्मार्पण) करण्याचा निर्णय घेतला. एवढ्या शूरवीर व्यक्तीने अशी आत्महत्या का करावी? आम्ही आपसात चर्चा करत होतो. दारव्हेकर सरांनाच आपण विचारू, असा आम्ही विचार केला. सरांना राग येईल काय? पण आम्ही धाडस करून सरांना विचारलेच. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे आम्हाला समजावून सांगितले.
"सर्वसामान्य माणसाला आपला जीव खूप प्रिय असतो. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली, तिला तोंड द्यायची त्याच्याकडे हिंमत नसेल, तर वैफल्यग्रस्त होऊन तो आत्महत्या करतो. अशा रीतीने आपले जीवन संपवणे म्हणजे गुन्हाच आहे. परंतु आपले जीवनच समाजासाठी आहे अशा भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपले या जगातील कार्य संपले असे ज्यावेळी वाटते आणि अशावेळी ते जीवन संपवतात त्याला समाधी म्हणतात. सावरकरांचे प्रायोपवेशन हा समाधीचाच प्रकार आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानमहाराज यांची समाधी, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी शरयू नदीत घेतलेली जलसमाधी, एकनाथ महाराजांनी गोदावरी नदीत प्रवेश करून घेतलेली जलसमाधी अशी अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. सावरकरांचा मृत्यू झाल्यानंतर दारव्हेकर सर तीन चार दिवस तरी येणार नाहीत असा आमचा समज होता. पण सर आले. त्यांनी नेहमीप्रमाणे शिकवायला सुरवात केली. "सर, तुम्ही नाही गेलात मुंबईला?" आम्ही विचारले. "मी? नाही.' "का, सर?" " सावरकरांकडून मी हेच तर शिकलो." ते म्हणाले. त्यांनी पुन्हा शिकवायला सुरवात केली. मात्र ते उदास वाटले. संध्याकाळी आम्ही काहीजण सरांच्या घरी गेलो. ते खूप मनमोकळेपणाने आमच्याशी बोलले. मनातल्या ज्या गोष्टी शाळेत बोलता येत नाहीत अशा.आम्हाला आणखी समृद्ध झाल्यासारखे वाटले.

No comments:

Post a Comment