ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, January 15, 2017

वाक्यावरून गोष्ट

काकांची अवस्था भेदरल्यासारखी झाली होती. घरात येताना  अचानक काकू त्यांच्यासमोर कोसळल्या आणि जाग्यालाचं बेशुद्ध झाल्या. हातातील चपात्या आणि कोरड्यासचं भांडं तिथंच ठेऊन ते दरवाज्याकडे सरसावले. दाराच्या कडीला डोकं आपटल्याने डोक्याला खोच पडली होती. त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. ते लालेलाल रक्त पाहून त्यांचं हातपाय लटपटायला लागले. कसंतरी स्वतःला सावरून लाकडी स्टुलावर ठेवलेल्या तांब्यातील पाणी काकूंच्या चेह-यावर मारत भितारल्या आवाजात ते तिला हाका मारू लागले. पण  काहीच प्रतिक्रिया मिळत नव्हती. सारं अंग गार पडल्यावाणी वाटत होतं. कोणालातरी बोलवावं म्हंटल तर अशा अवस्थेत काकूंना सोडून जाणं बरंही वाटत नव्हतं. या उतारत्या वयात दोघांनाही एकमेकांची साथ महत्वाची वाटत होती. काकूंना शुद्धीवर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. हाताचे तळवे चोळावे म्हणून त्यांनी काकूंचे हात हातात घेतले. आणि मुठीतला जाहिरातीचा तुकडा पाहून आणखीनच भेदरून गेले.

नोकरीतून रिटायर झाल्यावर त्यांनी काकूंच्या आग्रहाखातर पोराला डोनेशन देऊन  प्राध्यापकाची नोकरी मिळवून दिली. लगेच त्याचं  लग्न करून टाकलं . यासाठी त्यांनी आपली फंडाची सारी रक्कम खर्ची घातली होती. थोड्या दिवसांनी पोरानं शहरात एक भुखंड घेतला . त्यासाठीही त्यांनी पेन्शनवर कर्ज काढून पैसे चुकते केले. एका वर्षात पोराचा पगार चालू झाला की सगळं ठीक होईल या भाबड्या समजूतीनं त्यांनी आयुष्याची सारी पुंजी खर्च केली होती. म्हातारपणी पोरगा आपल्याला फसवेल याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी त्यांना आली नव्हती. थोड्या दिवसांनी पोराला जसा पगार सुरू झाला तसा तो आईबापासून वेगळं रहायला लागला . लाख प्रयत्न करूनही पोराशी जवळीक साधण्यात काका अयशस्वी झाले . सगळ्याच बाबतीत पोरांनं त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. ज्या वयात गरज होती त्या वयात दोघांचा आधार नाहीसा झाला. आपल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये कसं चालवायचं हा प्रश्न दोघांसमोर होता. त्यामुळे दोघेही प्रचंड तणावाखाली जीवन जगत होते. कुणाम्होरं हात पसरायलासुद्धा जागा राहीली नव्हती.

घडला प्रकार काकूंनाही अनपेक्षित होता. पोटच्या गोळ्यापायी आपणचं आपल्या धन्याला फसवलं या विचारानं काकू खंगत चालल्या होत्या. हळुहळू त्यांचं वागणं विक्षिप्त होत होतं. उतारत्या वयानं दोघांची शरीरे अनेक आजारांची कोठारेच बनली होती. दवापाण्याला पैसा कुठून आणायचा या काळजीनं काकूंनी दोनतीन वेळा जीवन संपवायचा प्रयत्नही केला होता . पण काकांच्या  समजुतदारपणाच्या आणि लाडीगोडीच्या विचारांमुळं त्यांनी तसा प्रकार पुन्हा केला नाही आणि काकांनीही होऊ दिला नाही. काहीवेळा ते बिना औषधपाण्याचे रहायचे पण काकूंच्या तब्येतीची  फार काळजी घेत होते. काकुच्या माघारी अनेक ठिकाणी ते बैठी  नोकरी मिळवण्यासाठी जाऊन येत होते . पण नोकरी मिळवण्यात वाढलेलं वय आडवं येत होतं. शेवटी त्यांनी  वैतागून सोसल तेवढं सोसायचं नाहीतर कुठंतरी किड्यामुंगीसारखं मरायचं असा मनात निश्चय केला होता . मात्र एवढं सोसत असतानाही दोघा नवराबायकोनं पोराला कधीही शिव्याशाप दिला नाही.

आज सकाळी बंड्यांच्या घरातून आणलेला पेपर वाचताना नेहमीप्रमाणे काका जाहीराती पाहत होते. त्यांनी काकूंकडून पेन मागून एक जाहिरात अधोरेखित केली . इतक्यात शेजारचा बंड्या, आजोबांनी बोलावलंय म्हणून त्यांना घेऊन गेला. का कुणास ठावं, उठल्यापासून काकूंच्या मनाची घालमेल वाढली होती. काका शेजा-यांच्यात गेले तोच त्यांनी दाराला कडी लावली. आणि शंका आल्याने पेपरमध्ये कशाला खूण केली ते पाहत बसल्या .ज्यावेळी  काकांनी खूण केलेली जाहीरात वाचली त्यावेळी त्यांच्या काळजात धस्स झालं. किडनी हवी आहे अशी अधोरेखित केलेली जाहीरात होती. अनेक विचारांचे वावटळ त्यांच्या मेंदूत फिरायला लागलं. नव-याची अशी गत बघण्यापेक्षा आपणचं मेलेलं बरं असा विचार त्यांच्या मनात आला.नव-याला  ती जाहीरात मिळू नये म्हणून फाडून आपल्या हातात घेतली. इतक्यात दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने विचारांच्या गोंधळातच त्या दरवाज्याकडे गेल्या. दरवाजा उघडताच समोर काका दिसले. त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते खाली मान घालून घरात शिरले. त्यांच्या पाठमो-या आकृतीकडं पाहत काकू दाराजवळ कोसळल्या.

*बाजीराव जठार*

Sunday, January 1, 2017

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा - प्रस्तावना

▪मराठी भाषा संवर्धन पंधरवडा▪
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माय माऊल मराठी स्त्रिच्या, अंकावरचे बाळ आम्ही
खबरदार जर तिला हिणविता, होऊ कर्दळकाळ आम्ही
अलंकारते शब्दसुरांचे,गुंफून तिजला बहाल करु
महाराष्ट्र जय जय जयश्री मराठी, एकच हा जयघोष करु

[२०१४ साली, शाहीर राजू राऊत यांच्या पोवाड्याचा कर्नाटक राज्याच्या आठवीच्या अभ्यासक्रमातील क्रमिक पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे. - https://goo.gl/hh7mkr]

महाराष्ट्र शासनाने १ ते १५ जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून घोषित केलेला आहे. मराठी भाषा पंधरवडा म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात, महाराष्ट्रात असून मराठी पंधरवडा कशासाठी? काय फायदा होईल याचा? २७ फेब्रुवारीला तर मराठी दिन असतो, मग आत्ता मराठी पंधरवडा कशासाठी?

जसं एखाद्या पर्यटनस्थळाच्या जाहिरातीसाठी त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो, त्या पर्यटनस्थळाचा इतिहास, भूगोल, आजूबाजूचा परिसर, तिथे गुंतवणूक केल्यास मिळणारे फायदे, अशा विविध गोष्टींवर प्रकाश टाकला जातो, त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि तिचं महत्त्व, तिचा इतिहास, तिच्या विविध बोली, तिचं साहित्य, हजारो मराठी पुस्तके-ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेली माहिती, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलात तर मिळणारे फायदे, तिच्या समोरची आव्हाने, काळानुरूप नवं स्वीकारण्याची तिची ताकद, या आणि अशा अनेक गोष्टींवर लोकांनी एकत्र यावं, चर्चा करावी, तिचं महत्त्व जाणून घ्यावं, तिचा प्रचार-प्रसार करावा, आणि अशा दैदीप्यमान इतिहास लाभलेल्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा हा शासनाचा मराठी भाषा पंधरवड्यामागे हेतू आहे.

जसं वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो आणि वर्षभर त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याचप्रमाणे आज १ जानेवारीला काही भाषिक संकल्प करा.

उदा.

- मी सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात अधिकाधिक मराठी वापरेन आणि इतरांनादेखील मराठी वापरण्याचा आग्रह करेन

- मी माझ्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकवेन

- मी मराठी संगीत-चित्रपट-नाटकांचा आवर्जून आस्वाद घेईन

- मी नेहमी मराठी पुस्तके वाचेन

- मी सोशल मिडीयावरील विविध अनुप्रयोग(apps) मराठीतून वापरेन आणि मराठीत नसतील तर निर्मात्यांकडे त्यासाठी आग्रह करेन

- मी मला खाजगी क्षेत्रातून मिळणाऱ्या विविध सेवा मराठीतूनच मिळाव्या यासाठी आग्रह धरेन, उदा. एटीएम मध्ये मराठी भाषेचा पर्याय, ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे मराठीतूनच बोलण्याची मागणी, इ.

- मी त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी होते आहे का यावर लक्ष ठेवेन, त्रिभाषा सूत्राचा वापर झाला नसेल तर वेळोवेळी सरकारी यंत्रणांना त्यांची चूक लक्षात आणून देईन

- 'हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही', आणि राष्ट्रभाषेचा राष्ट्राच्या एकात्मतेशी काडीचादेखील संबंध नाही, हे माझ्या मित्रपरिवाराला पटवून देईन.

इ.

तर पुढील १५ दिवस, ||ज्ञानभाषा मराठी|| च्या विविध भाषिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग तर नोंदवाच परंतु पुढील वर्षभर भाषा संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करा.

#मराठीभाषासंवर्धनपंधरवडा
#राजभाषामराठी
#ज्ञानभाषामराठी
#व्यवहारभाषामराठी
#मराठीबोलाचळवळ
#महाराष्ट्र