ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Thursday, June 30, 2016

::: आपले शब्द, शब्दांचे अर्थ - ५ :::

<<< चरित्र >>>


या शब्दाचा अर्थ सर्वांना ज्ञात आहे. साधनवाचक 'इत्र' प्रत्यय लागून हा शब्द बनला आहे. खाण्याचे साधन 'खनित्र', कापण्याचे 'लवित्र' त्याप्रमाणे जगण्याचे किंवा आचरणाचे साधन ते 'चरित्र'.पण पुढे त्याचा अर्थ आचरण असा झाला. संस्कृत भाषेच्या नियमाप्रमाणे चरित्र आणि चारित्र्य यांचा अर्थ एकच आहे. 'चारित्र्य' हे 'चरित्र' पासून बनलेले भाववाचक नाम नव्हे. जे चरित्र, तेच चारित्र्य. परंतु मराठीत 'चरित्र' म्हणजे आयुष्यक्रम आणि चारित्र्य म्हणजे शील, असे अर्थ रूढ झाले आहेत. संस्कृतमध्ये असा अर्थभेद नाही. चरित्र म्हणजेही शीलच असा तेथे अर्थ आहे.


संकलन :-

     ||ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

Wednesday, June 29, 2016

आपणाला हे माहित आहे का? - २


१) दातांवरील बाह्यावरण एनॅमल हे आपल्या शरीरातील सर्वात कठीण भाग आहे.

२) योग्य तापमानाला येईपर्यंत अन्न हे तोंडात गरम अथवा थंड केले जाते .

३) झोपेत असताना आपल्याला गंधाचे ज्ञान होत नाही .

४) मानवी शरीरात तीन इंच लांबीचा खिळा बनविता येईल एवढे लोह असते.

५) हातांची नखे पायांच्या नखांपेक्षा चार पटीने जलद वाढतात.

     || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

शिक्षणाची भाषा की भाषेचं शिक्षण?

काळाच्या ओघात शिक्षणाचा अर्थ बदलत गेला. भाषेकडे, शिक्षणमाध्यमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचे, बदलत्या परिस्थितीचे पडसाद समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये उमटत गेले, त्याचा हा डोळस वेध.

मुलं शाळेत जातात आणि पालक कामाला. जणू हा निसर्गनियम बनलाय. याखेरीज कुठे काही वेगळंसुद्धा घडतं. तेव्हा आपण सतर्क होतो. काही चुकतंय का पाहू लागतो. शाळेत न जाणार्या. मुलांना शालेय शिक्षणाची संधी का नाकारली जातेय पाहतो. अशा मुलांना शाळेत रस वाटायला हवा असं ठरवतो. कामावर न जाणारे पालक व्यसनी, बेजबाबदार किंवा आजारी असतील असं समजतो. अशा काळात आणि अशा वातावरणात शाळा या शिक्षणाहून इतरच काही बाबींसाठी महत्त्वाच्या ठरतात. आणि पालक हे पालकत्वाहून अधिक काही बाबींसाठी जबाबदार ठरतात.

शाळांमधून शिक्षणासोबत विशिष्ट संस्कृतींचा अंगीकार केला जातो. त्याचप्रमाणे मान-सन्मान, उच्चतर सामाजिक स्थान, स्पर्धात्मकता, आर्थिक सुबत्तेसाठी सक्षमता यांसारख्या मूल्यांचं रोपण केलं जातं. बहुतेक वेळा ही शिक्षणेतर मूल्यं ऐतिहासिक-सामाजिक आकलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवादक्षमता, परिसर-आकलन, तार्किक विचार, कल्पकता, शारीरिक समायोजन यांसारख्या शैक्षणिक मूल्यांवर कुरघोडी करतात. इतकी की, शिक्षणाचा अर्थच पालटावा. ‘जीवनातील समस्या पेलण्याची, सोडविण्याची क्षमता म्हणजे शिक्षण’. हा अर्थ पालटून ‘जीवनातील समस्या नाकारण्याची, टाळण्याची वा त्यांपासून कृत्रिम सुरक्षितता शोधण्याची सोय म्हणजे शिक्षण’ असा शिक्षणाचा अर्थ झाला आहे.आणि शिक्षणाचा हा अर्थ समाजमान्य झाला आहे. त्यामुळेच पालकांचं कामाला जाणं हे जणू मुलांच्या शाळेला जाण्याचंच मोठ्या वयातील स्वरूप बनलं आहे. म्हणजे, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी मिळालेलं शिक्षण, मोठेपणी त्याच कामी आणण्याकरिता चालू राहणारी धडपड हाच बहुतांश माणसांच्या काम करण्याचा अन्वयार्थ होतो आणि केवळ ही धडपड अखंड चालू राहण्यासाठीच पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करीत आहेत !

सृष्टीचा आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी मानवी समाजाला निसर्गाच्या साथीनं प्रगतिशील, कृतिशील करणारं शिक्षण काळाच्या ओघात मागं पडलं आहे. त्याऐवजी सृष्टीचं आणि जीवनाचं व्यवस्थापन करणारं शिक्षण उदयाला आलं आहे. हे सामाजिक बदलाचं प्रतिबिंब आहे. हा बदल मागील शतकभरात झालेला आहे. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालावं या विचारामागं समाजाच्या धारणेतील हा प्रदीर्घ बदल कारणरूपाने आहे. या प्रदीर्घ प्रक्रियेमुळे या बदलाची मानसिकता केवळ आत्ताच्या पालकांच्यापुरती सीमित नाही. या मानसिकतेच्या पाठीमागे एक मोठा इतिहास दिसल्यावाचून राहत नाही.

यासंदर्भात काही चित्रं मला इथे मांडावीशी वाटतात :
चित्र क्रमांक एक - १० ते १२ वर्षांपूर्वीचा प्रसंग. माझ्या दवाखान्यात एक तरुण जोडपं उपचारांसाठी आलेलं. नवरा-बायको दोघंही अशिक्षित मजूर. त्यांच्यासोबत ३ ते ५ वर्ष वयाची त्यांची दोन मुलं इकडं-तिकडं बागडत असलेली. अधून-मधून आपल्या आई-बापाला मम्मी-पप्पा म्हणून हाका मारत होती. या इंग्रजी उच्चारांमुळं माझ्या नजरेत अस्पष्ट आश्चर्य तर त्या जोडप्याच्या चेहेर्याइवर स्पष्ट आनंद!

चित्र क्रमांक दोन-काळ साधारण तोच. कुटुंब खेड्यातलं पण उच्चभ्रू आणि मोठं. छोट्या मुलांचे आई-वडील बर्याबपैकी शिकलेले -म्हणजे ग्रॅज्युएट वगैरे.पुरुष मंडळी शेती, शेतीशी निगडीत काही व्यवसाय व स्थानिक पातळीवर पुढारीपण करणारी. स्त्रिया मिळून घरातील व्यवहार, परंपरा, पाहुणचार वगैरे सांभाळणार्या.. त्यांच्यासाठी एक नवी जबाबदारी कुटुंबानं सोपवलेली. घरातल्या छोट्या मुलांना घेऊन जवळच्या शहरात आळीपाळीनं रहायचं. मुलं तिथल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणार. त्यांची जेवणं, डबे, क्लासेस, इतर हवं-नको ते पहायचं आणि जमल्यास आपापल्या कुवतीनुसार त्यांचा अभ्यासही घ्यायचा. पुरुषमंडळी आपापल्या सवडीनुसार थोड्या वेळाकरिता फ़्लॅटवर डोकावणार पण त्यांचं मुख्य काम रसद पुरवण्याचं आणि ट्रान्सपोर्टेशनचं. बायकोला किंवा भावजयीला बदली कामगारासारखं ३-४ महिन्यांनंतर गावी नेऊन सोडायचं आणि दुसरीला फ्लॅटवर. मुलांना सुट्टयांनुसार घरी घेऊन जायचं, पुन्हा माघारी आणून सोडायचं. अशा अनेक हंगामी कुटुंबांपैकी एक कुटुंब आमचं शेजारी. शिकणारी मुलं आमच्या मुलांचे सवंगडी. या मुलांना केवळ त्यांच्या शिक्षणाच्या अनुरोधानं कौटुंबिक पातळीवर झालेलं हे मोठं परिवर्तन जाणवत असावंच पण उमगत असेल असं कोणतंच चिन्ह उमटत नव्हतं. ना भावविश्वात ना अभ्यासात !

चित्र क्रमांक तीन - समुपदेशनासाठी गेल्या ५-१० वर्षांत परीक्षांच्या मोसमात हमखास येणारी, खरं तर आणली जाणारी मुलं. काही मातृभाषेतून शिकणारी, काही इंग्रजी माध्यमातून शिकणारी तर काही मिश्र (सेमी-इंग्लिश) माध्यमातून. कुणी चांगल्या शैक्षणिक क्षमतांची, कुणी मध्यम तर कुणी शैक्षणिकदृष्ट्या गतिमंद. परीक्षा, अभ्यास, अभ्यासूवृत्ती (पालकांना अपेक्षित अशी) नसणं, आळस, ताण असे संदर्भ या सार्यास मुलांबाबतीत समान म्हणावेत असे. मात्र, त्यांच्याशी संवाद करताना शैक्षणिक माध्यम म्हणून असलेल्या भाषेचा संदर्भ फारच क्वचित येतो. मुलांच्या स्वत:च्या तसंच पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या क्षमता यांतील तफावत, मुलांचा नैसर्गिक कल आणि शैक्षणिक अपेक्षा यांतील तफावत, स्वयंप्रेरणांचा अभाव, मुलांना स्वत:चं भावविश्व हाताळण्यात असणार्या, अडचणी यांसारखे घटक हेच शैक्षणिक अडी-अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात जबाबदार असावेत असं दिसतं.

चित्र क्रमांक चार - पाच वर्षांपूर्वी सातवी इयत्तेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा एक मुलगा पालकांसोबत दवाखान्यात आलेला. अभ्यासात मागास मात्र इतर अनेक बाबतीत चलाख म्हणावा असा. म्हणजे मित्र-मंडळींत स्मार्ट, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साही. त्याच्याशी बोलल्यानंतर असं जाणवलं की त्याला अभ्यासाच्या प्रक्रियेची समज आणि गोडी निर्माणच झालेली नाही. त्याच्याकरिता अभ्यास म्हणजे केवळ एक अनाकलनीय, क्लिष्ट असं घोकंपट्टीचं ओझं झालेलं आहे. त्याला सुचवून पाहिलं की, इंग्रजी माध्यमाची शाळा बदलून मराठी माध्यमाच्या शाळेत पुढील इयत्तांकरिता प्रवेश घेतला तर त्याला अभ्यास करणं तुलनेनं सोपं जाईल. पण ही कल्पना त्याला मान्य होईना. ही गोष्ट अपमानजनक असल्याची त्याची समजूत होती. इंग्रजी जमत नाही म्हणून मराठी माध्यम म्हणजे त्याच्या दृष्टीनं अध:पतन तर होतंच शिवाय मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे गावंढळ मुलांच्या शाळा ही त्याची पक्की समजूत होती ! कदाचित त्याच्या पालकांनी आणि इतर संबंधितांनीच ही समजूत रुजवली असावी.

चित्र क्रमांक पाच-गोष्ट वरच्याप्रमाणेच पण किंचित जुनी. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न रुजलेला दुसरा एक मुलगा. मात्र, या मुलाच्या बाबतीत इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याची सूचना फारशी मानापमानाची बनली नव्हती. थोड्याशा धाकधुकीनं का होईना पण मुलानं आणि त्याच्या पालकांनी शाळा बदलण्याचा निर्णय घेतला.त्याकरिता येणार्याम तांत्रिक समस्या सर्व संबंधितांनी समजूतदारपणानं सोडविल्या. आनंदाची बाब म्हणजे, मुलाची शैक्षणिक कारकीर्द लक्षणीयरित्या सुधारली !

चित्र क्रमांक सहा - इंजिनियरींगला प्रवेश घेतलेला ग्रामीण भागातला एक मुलगा. नव्यानंच शहरात, होस्टेलवर राहू लागलेला. वर्षभरात आत्मविश्वास गमावून, निराश मनानं गावी परतला. खूप प्रयत्नांनी बोलायला तयार झाला. तेव्हा त्याची आत्मप्रतिमा खूप ढासळलेली दिसत होती. शहरातील मुला-मुलींचं फाड - फाड इंग्लिश बोलणं, त्यांचे आधुनिक पेहराव आणि विविध फॅशन्स् यांमुळे तो बिचारा सुरुवातीपासूनच बिचकून गेला होता. त्यांचे मॅनर्स त्याला परग्रहावरचे वाटत होते. आपण या जगात सामावले जाऊ शकणार नाही हे त्याच्या मनानं पक्कं गृहीतच धरलं होतं !

चित्र क्रमांक सात - मराठी माध्यमाची एक नामांकित शाळा. या शाळेत पाचवीच्या वर्गापासून काही तुकड्या सेमी-इंग्रजी माध्यमातील आहेत. या वर्गात प्रवेश कुणाला हवा असतो? एखाद - दुसरा अपवाद वगळता सार्यांयनाच. मग शाळा व्यवस्थापन काय करतं? तर चौथीच्या वर्गात मिळणारे गुण आणि त्याच्या जोडीला एका प्रवेश-परीक्षेतील गुण यांनुसार प्राधान्यक्रम ठरवतं. या परीक्षा नेमके काय जोखतात? मुलांच्या भाषाविषयक क्षमता, नवीन भाषा शिकण्याची आवड की केवळ मुलांनी भविष्यात सायन्स शाखेचं शिक्षण घेण्याची शक्यता?

चित्र क्रमांक आठ - अनेक घरांघरांत दिसणारं. कोणत्याही माध्यमाच्या शाळांत शिकणारी मुलं इंग्रजी कार्टून्स, हिंदी किंवा इंग्रजी सिनेमे वा टी.व्ही. वरील काही कार्यक्रम आवडीनं पाहतात. मोबाईल्स, कंप्यूटर्स इ. वापरताना लागणार्या इंग्रजी सूचना त्यांना सहज समजतात अथवा त्या सूचना मुलं अंदाजानं चटकन समजून घेतात. म्हणजेच आवड असेल तर मुलं भाषेकरता अडून राहत नाहीत. भाषा म्हणजे संवादाचं साधन. मुलांचा परस्परात किंवा अशा आवडीच्या गोष्टींशी चालू असलेला हा संवादच नव्हे का?

चित्र क्रमांक नऊ - कोणत्याही माध्यमाच्या शाळांत शिकणारी १०वी - १२वी पर्यंतच्या कोणत्याही वर्गांतील मुलं. त्यांच्याबाबतीत भाषाविषयक संकल्पना (व्याकरण, भाषेच्या वापरातील बहुविधता इ., भाषाविषयक प्रयोगशीलता, कुतूहल, वाचनाची गोडी, स्वयंप्रेरणेनं लिहिण्याची आवड आदि बाबी फारच कमी प्रमाणात आढळतात. मात्र, त्यांना भाषेच्या परीक्षेत चांगले गुण मिळालेले असू शकतात. आपल्याला मुलांकडून भाषाविषयक नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत? या बाबत बोलताना सातार्याकतील प्रयोगशील शिक्षण-विस्तार अधिकारी श्रीमती भराडे म्हणाल्या होत्या की, मुलांनी एखादी भाषा ही भाषा म्हणून शिकणं आणि त्यांनी एखादा शालेय विषय शिकण्यासाठी ती विशिष्ट भाषा अवगत करणं या दोन पूर्णत: भिन्न बाबी आहेत !

चित्र क्रमांक दहा - अनेक बालमानसशास्त्रज्ञ असं प्रतिपादन करतात की, आपण पालक म्हणून मुलांच्या अंगभूत क्षमतांना विनाकारण कमी लेखतो. पुरेशा पोषक, स्वतंत्र आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणात मुलांच्या नैसर्गिक क्षमतांचा विस्मयकारक विकास होऊ शकतो. भाषांचं आकलनदेखील मुलांना मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत भरभर होऊ शकतं. त्यामुळे मुलांना अधिकाधिक भाषा आत्मसात करणं बर्यााच अंशी शक्य होतं. पण, म्हणून सरसकटच सर्व मुलांना अधिकाधिक भाषा शिकायला लावाव्यात का? या प्रश्नाचं उत्तर ठरविताना आणखी काही शास्त्रीय माहिती विचारात घ्यायला हवी. ती अशी १) बुद्धी ही अनेकांगी असते. भाषाक्षमता हे बुद्धीच्या अनेकांपैकी एक अंग आहे. हुशार असूनही सर्वांनाच बुद्धीच्या सर्वच अंगांचा विकास साध्य करता येईल असं नाही. २) ज्या मुलांची भाषा-निगडीत बुद्धिमत्ता तुलनेनं मागास असते अशा मुलांना भाषेचं अंग कमी वापरून अन्य क्षमतांच्या साहाय्यानं ज्ञानसंपादन करण्याची संधी मिळाल्यास ती इतर मुलांप्रमाणेच सक्षम होऊ शकतात. तसंच भाषाविषयक किमान कौशल्यदेखील आत्मविश्वासानं संपादन करू शकतात. ३) ज्ञानसंपादनामध्ये मुलांचा आत्मसंवाद महत्त्वाचा आहे. त्यासाठीदेखील भाषा हे नैसर्गिक साधन आहे. मातृभाषेतून स्वाभाविकपणे मोठं शब्दभांडार मुलांपाशी जन्मापासूनच जमा होत असतं. आत्मसंवादामध्ये हे भांडारच जास्तीत जास्त उपयोगी ठरतं. ४) इतरांशी संवाद हेही आत्मसंवादाप्रमाणंच ज्ञानसाधन आहे. मुलांना भाषेबद्दल अवडंबरयुक्त भीती असेल तर त्यांचा इतरांशी सहज संवाद खुरटू शकतो.

ही दहा चित्रं एकत्र करून मी पाहतो तेव्हा मला काय दिसतं? भाषाशिक्षण ही एक नैसर्गिक स्वाभाविक प्रक्रिया आहे. तिचा विकास सामाजिक, भौगोलिक घटक करत असतात. प्रत्येकजण आपापल्या गरजा आणि क्षमतांनुसार भाषा हे स्वत:च्या बुद्धीचं अंग जीवनात वापरू शकतो. ही प्रक्रिया सहजपणे घडली नाही, तर भाषा हा काहीजणांच्या शिक्षणात आणि पर्यायानं जीवनात अडसर आणणारा घटक ठरू शकतो. शिक्षणाची भाषा आणि भाषेचं शिक्षण या पूर्णत: भिन्न बाबी आहेत. म्हणून शिक्षणात भाषा हे साधन आहे की साध्य याचा विवेक प्रत्येक मुलानुसार स्वतंत्रपणे केला पाहिजे. आज शालेय शिक्षणामध्ये हा विवेक बाळगला जाईल असे खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. कारण, शिक्षणामध्ये मुलांचा नैसर्गिक विकास हे तत्त्व पुरेशा गांभीर्यानं जपलं जात नाही; तर विकासाच्या विशिष्ट संकुचित चित्रामध्ये मुलांना बसविण्याकरिता नैसर्गिक विकासाचा बळी जातो आहे. अगदी थोडक्यात विधान करायचं तर मी असं म्हणेन की, कोणतीही भाषा मुलांच्या शिक्षणात तेव्हाच पोषक ठरेल जेव्हा तिचा केवळ साध्य म्हणून नव्हे तर साधन म्हणून नैसर्गिक अंगीकार केला जाईल. आणि कोणतंही शिक्षण कोणत्याही भाषेत तेव्हाच साकार होईल जेव्हा शिक्षणाचा विचार जीवनाचं व्यवस्थापन करण्याचं साधन म्हणून न होता जीवन समजून घेण्याचं साधन असा होईल !
___________________________
डॉ. अनिमिष चव्हाण, सातारा
मैत्र क्लिनिक, सातारा येथे मानसोपचार तज्ज्ञ. जानेवारी २०११ पासून ‘सार्थ-सन्मान’ या नावाने मानसोपचारातून बदलासाठी केंद्र.
(मे २०१२ पासून ‘ब्रेन अँड माइंड जिम’ हा बोधात्मक व भावनिक विकासासाठीचा प्रकल्प. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्यावरील अनेक लेख व पुस्तके प्रसिद्ध.)


Sunday, June 26, 2016

मातृभाषा ठरू शकते व्यवसायभाषा !

गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आलेला एक सुखद बदल म्हणजे, दहावीनंतर सर्व हुशार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडेच जायचे असते हा अंधविश्वास मागे पडून, अनेक गुणवंत विद्यार्थी आपला कल, आपले उद्दिष्ट यांना महत्त्व देत आवर्जून ‘कला - मानव्यविद्या’ या शाखेत प्रवेश घेऊ लागले आहेत. परंतु याच काही वर्षांत मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांतील महाविद्यालयांत ’कला - मानव्यविद्या’ या शाखेतील ’मराठी भाषा-साहित्य’ या विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने रोडावली आहे. मराठी भाषा-साहित्य हा विषय पदवीस्तरावर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या बाजारपेठकेंद्री जगात काहीही व्यावसायिक संधी नाहीत, असा मराठी भाषकांत प्रचलित असलेला गैरसमज हे विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा-साहित्य’ या विषयाकडे पाठ फिरविण्यामागचे एक मुख्य कारण आहे.
अनेकदा विद्यार्थ्यांची मराठी हा विषय घेण्याची इच्छा असली; तरी पालक, अन्य नातेवाईक, समवयस्क यांच्याकडून केल्या जाणाऱ्या ‘मराठीतून तुला पुढे काहीही भवितव्य नाही,’ या अशा नकारात्मक वक्तव्यांमुळे तेही संभ्रमात पडतात.
प्रत्यक्षात, ‘मराठी भाषा-साहित्य‘ या विषयाचे अध्ययन हे विविध विषयांचे ज्ञान देऊन, तसेच व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक अशी संवादकौशल्ये, अभिव्यक्तिक्षमता रुजवून एक उत्तम माणूस घडवू शकते. या विषयातील पदवी शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधीही निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतात. मराठीत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन शाळा, महाविद्यालयांत अध्यापक म्हणून काम करण्याच्या पारंपरिक शक्यतांबरोबरच अन्य भाषिकांसाठी मराठीचे अध्यापन करणे, पदवीनंतर शैक्षणिक तंत्रज्ञानाविषयीचा अभ्यासक्रम करून शैक्षणिक संसाधननिर्मितीच्या क्षेत्रात जाणे अशा अन्य वाटांचाही विचार करणे शक्य आहे. मराठी भाषा-साहित्य यांतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय परीक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य-मराठी-विकास-संस्था’, ‘साहित्य-संस्कृती-महामंडळ’ इत्यादी संस्थांत नोकरी मिळवू शकतात. मराठीतून पदवी घेतल्यानंतर ‘भाषाविज्ञान’ (लिंग्विस्टिक्स) या विषयातही पदव्युत्तर शिक्षण घेता येते. भाषाविज्ञानातील या शिक्षणाच्या आधारे अनेक शासकीय व बिगरशासकीय संस्थांतील भाषाविषयक संशोधन प्रकल्पांत कार्यसंधी मिळू शकते.
मराठी भाषा-साहित्य या विषयातील पदवी शिक्षणानंतर ‘पत्रकारिता व प्रसारमाध्यमे’ यांविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि आंतरजाल या माध्यमांत व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. मराठीच्या पदवीधरांना पत्रकारितेशिवाय ‘जाहिरात-मसुदालेखन’ (कॉपी-रायटिंग), ‘जनसंपर्क-व्यवहार’ (पब्लिक रिलेशन्स) या वाटा चोखाळणेही शक्य आहे; त्यासाठी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. भाषेवर प्रभुत्व, लेखनक्षमता आणि उत्तम आवाज असलेले मराठीचे पदवीधर आकाशवाणीवर सूत्रवाही (आर.जे.), वृत्तनिवेदक, कार्यक्रम-अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत असलेले दिसतात.
मराठीच्या पदवीधरांना ‘ग्रंथालयशास्त्रा’चा अभ्यासक्रम पूर्ण करून शाळा-महाविद्यालयांतील ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये येथे ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळू शकते. त्यांना रिझर्व्ह बँकेसारख्या शासकीय संस्था तसेच खासगी क्षेत्रांतील विविध उद्योगसंस्था यांमध्येही ग्रंथपाल किंवा माहिती-अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते. मराठीचे, ग्रंथालयशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुस्तक प्रकाशन संस्थांतील संपादन विभागांतही काम मिळू शकते. प्रकाशन संस्थांकडून अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, संपादन या प्रकारची कामे मिळविणे शक्य आहे.
याव्यतिरिक्त ‘मराठी’ या विषयाचे पदवीधर त्यांच्या मराठीविषयक अभ्यासाच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षांत, तसेच सामाजिक संशोधन, पर्यटन अशा अन्य व्यावसायिक क्षेत्रांतही यश मिळवू शकतात. ज्यांना नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य, लोककला या क्षेत्रांकडे जायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी पदवीस्तरावर ‘मराठी’ या विषयाचा अभ्यास केल्यास, तो त्यांच्या कलाविषयक अध्ययनास पूरक ठरू शकतो. दुसरे असे की, ज्या ठिकाणी कोणत्याही विषयातील पदवी ही पात्रता-अट असते, अशा रोजगार संधी, उदाहरणार्थ, बँकेतील, रेल्वेतील किंवा कोणत्याही शासकीय विभागांतील भरतीसाठीच्या परीक्षा या मराठीच्या पदवीधरांसाठीही खुल्या असतात.
थोडक्यात, ‘मराठी’ हा विषय शिकून पैसा, प्रतिष्ठा, प्रगतीच्या संधी, नावलौकिक हे सारे काही निश्चितपणे मिळू शकते.
मराठी ही आपली ‘मातृभाषा’ किंवा ‘निजभाषा’ म्हणून आपले तिच्यावर प्रेम असतेच; पण ‘व्यवसायभाषा’ म्हणूनही ती आपल्याला खूपकाही देऊ शकते. गरज आहे ती, महाराष्ट्रीय समाजातील भाषा-साहित्यविषयक क्षमता व आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी आपापल्या डोळ्यांवरची गैरसमजांची नकारात्मक झापडे दूर करून; ‘मराठी आणि व्यावसायिक संधी’ या समीकरणाकडे नव्या, सकारात्मक दृष्टीने पाहण्याची, तसेच यशाकरिता आवश्यक असलेल्या भाषिक आणि अन्य क्षमतांच्या वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची !
प्रा. डॉ. अनघा अ. मांडवकर
(दै. लोकमत - २९ मे, २०१६)

मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

🎆Whatsapp वरून🎆
प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी माहिती
----------------------------------
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा …
मिले सुर मेरा तुम्हारा …
(कश्मीरी)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़
(पंजाबी)
तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल
मिलके बणे एक नवा सुर ताल
(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
(सिन्धी)
मुहिंजो सुर तुहिंजे साँ प्यारा मिले जडेंह
गीत असाँजो मधुर तरानो बणे तडेंह
(उर्दू)
सुर का दरिया बह के सागर में मिले
(पंजाबी)
बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले
(तमिल)
इसैन्दाल नम इरुवरिन सुरमुम नमदक्कुम
तिसै वॆरु आनालुम आऴि सेर
मुगिलाय मऴैयय पोऴिवदु पोल इसै
नम इसै…
(कन्नड)
नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय,
सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय
(तेलुगु)
ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै,
मन स्वरंगा अवतरिंचे .
(मलयालम)
निंडॆ स्वरमुम् नींगळुडॆ स्वरमुम्
धट्टुचॆयुम् नमुडॆय स्वरम .
(बांगला)
तोमार शुर मोदेर शुर
सृष्टि करूर अइको शुर
(आसामी)
सृष्टि हो करून अइको तान
(उड़िया)
तोमा मोरा स्वरेर मिलन
सृष्टि करे चालबोचतन
(गुजराती)
मिले सुर जो थारो म्हारो
बणे आपणो सुर निरालो
(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
(हिन्दी)
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा …
तो सुर बने हमारा
💠गीतकार : पियूष पांडे
💠संगीतकार : अशोक पत्की , डांबर बहादुर बुडाप्रिति , प्रताप के. पठाण
💠गायक : पं. भीमसेन जोशी , लता मंगेशकर , कविता कृष्णमूर्ति , एम. बालकृष्णमूर्ति , सुचित्रा मित्रा
( दूरदर्शनच्या लोकसेवा संचार परिषदेच्या वतीने १५ ऑगस्ट १९८८ रोजी देशातील १४ प्रमुख भाषेतील हे गीत राष्ट्राला अर्पण करण्यात आले. )

Saturday, June 25, 2016

मृत्यूछायेतले ६९ दिवस

प्रेषक, मोदक, Sun, 11/11/2012 - 14:38

http://misalpav.com/diwali2012/te_69_diwas?page=1


Friday, June 24, 2016


“मला माझ्या मांड्यांच्यामध्ये, काय चुळबुळ होत होती ते कळत नव्हतं”
“मला हे सर्व केल्यावर, खूप जळजळ होऊ लागली, चक्कर येऊ लागली”
“अलीकडच्या काळात, मला वयाने मोठ्या असलेल्या बायकांचं, जबरदस्त आकर्षण वाटत होतं.”

हे गूगल भलतंच उद्योगी बाळ आहे. एक जुनी मराठी कविता शोधताना, अपघाताने एक ब्लॉग हाती लागला, आणि वरील काही वाक्य वाचल्यावर या विषयाबद्दल, माझ्या आकलनाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे, आणि अभ्यासाप्रमाणे  काही उघडपणे लिहावं असं वाटू लागलं.

'त्या' ब्लॉगमध्ये जे काही लिहिलं होतं ते पूर्णपणे स्वप्नरंजनच होतं. अशी कोणतीही गोष्ट लेखकाने प्रत्यक्ष केलेली लिहिलेली नाही पण तरीही, त्याने जे काही केलं त्यातून त्याला बराच आनंद मिळाला, अशा आशयाचा तो पूर्ण मजकूर होता. त्या लेखाचा मुख्य भर Fantasy-स्वप्नरंजन आणि हस्तमैथुनावरच होता. वयात आलेला मुलगा, आपल्या शरीराची तगमग भागवण्याकरता कोणत्या थरापर्यंत जातो, हे सर्व वाचल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. याशिवाय त्याचं संभोगाबद्दलच औत्सुक्य, नक्की संभोग(सेक्स) करतात म्हणजे काय करतात? जाणून घ्यायची भारी हौस, वाचून मी अवाक झालो! या मनःस्थितीतून अनेक लोक गेले असतील, पण अशा वेळी मुलांना कशा प्रकारे हाताळावं, यावर उघडपणे चारचौघात बोलणं तरी लांबची गोष्ट आहे, पण अनेक घरांमध्येदेखील, असे विषय निघत नाहीत, हे दुर्दैव! ..

तो लेख वाचल्यावर, मला काही प्रश्न पडले ! वयात आलेल्या मुलींची तिच्या घरच्यांना खूप काळजी असते, पण वयात आलेल्या मुलांची तेवढी काळजी असतेच का? मुलगाच आहे म्हणून, आपण निष्काळजी तर नसतो ना ? एखाद्या लैंगिक समस्येवर जाणून घ्यायचे असल्यास, किंवा माहिती हवी असल्यास, मुलगा इतर कुठे विचारण्यापेक्षा त्याच्या पालकांशीच मोकळेपणे का बोलू शकत नाही? हे चित्र कुठेतरी बदलायला हवं असं प्रकर्षाने मला वाटतं, म्हणूनच हा लेखनप्रपंच..

“माणूस हा, सर्वप्रथम एक प्राणी आहे! अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मैथुन ही त्याची एक नैसर्गिक गरज आहे.”

ही गरज भागवताना कुठेही स्वैराचार होऊ नये म्हणून मानवी समाजाने लग्नाची बंधने घालून दिलेली आहेत. विविध संस्कार आहेत, पण तरीही प्रत्येकवेळी मानवी मन या सगळ्याचा विचार करेलच असे नाही. दावणीला बांधलेलं जनावर मोकळं सोडल्यावर, काही काळाकरता जसं मुक्तपणे बागडून येतं, तीच अवस्था पौगंडावस्थेतील मुले हस्तमैथुनाचा आनंद घेताना अनुभवतात, आणि अचानक पुन्हा डोकं ताळ्यावर येतं, आणि आपण केलं ते पाप होतं, आता आपल्याला याचे भोग भोगावे लागतील या भावनेनं पुन्हा मनात घुसमट सुरु होते! पण त्यावेळी मनाची ही अवस्था कथन करायला जवळ कुणीच नसतं! कारण त्या काही क्षणांकरता हे मन, आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या, एखाद्या स्त्रीच्या बरोबरदेखील स्वप्नरंजनाच्या आधारे, मीलनाचा आनंद घेत असतं, जी खऱ्या आयुष्यात समाजाच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे, किंबहुना गुन्हा आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

ही गोष्ट ना आपल्या पालकांना सांगितली जाते ना आपल्या मित्रांना, ना शिक्षकांना ….माणसातील दांभिकपणा नेहमीच ‘संभोग’ या विषयावरील चर्चेत सर्वात जास्त दिसून येतो. मित्र जरी तेच करत असले तरीही, थट्टा करायला कुणाला कारण लागतं थोडीच! आणि आपल्याला कुणी विकृत म्हटलं तर? नालायक म्हटलं तर ? असे शेकडो विचार मुलांच्या मनात घोंघावत असतात. खासकरून मेंदू अशा स्त्रियांच्याबाबत स्वप्नरंजन करतो, की ज्यांच्यापर्यंत पोहोचणं कधीच शक्य नसतं. प्रत्येकवेळी त्यांच्याबद्दल मनात प्रेमाची भावना असतेच असे नाही. प्रत्येकवेळी त्या स्त्रीचा बांधा सुडौल असेल असे नाही, ती स्त्री सुंदर असेलच असे देखील नाही. हे केवळ स्वप्नरंजन असतं. त्यामध्ये संबंधित स्त्रीपर्यंत पोहोचायला खऱ्या आयुष्यात जितक्या अडचणी आणि आव्हाने असतील, तितकं हे स्वप्नरंजन अधिकच रंजक होतं. अर्थात मेंदूला इथं साहस (Adventure) आवडतं... या सर्व भावना अतिशय नैसर्गिक आहेत. या भावना विशिष्ट वयात एखाद्या मुलाच्या मनात आल्या नाहीत, तरच नवल म्हणावं लागेल!!! या भावनांना वाट मोकळी करून नाही दिली तरीही, नैसर्गिकरीत्या शरीर आपलं काम करतच रहातं! पहाटेच्या वेळी झोपेत असताना नकळतपणे होणारे वीर्यपतन, हे त्याचेच एक उदाहरण आहे.

पण अशा भावना मनात येणे, पहाटेच्या वेळी वीर्यपतन होणे, हस्तमैथुनानंतर जळजळ होणे, हस्तमैथुन झाल्यावर चक्कर आल्यासारखे वाटणे, आपल्या वयापेक्षा अधिक वयाची स्त्री आवडणे, एकच वृषणफल (टेस्टीकल) असणे - आणि त्याने काहीही फरक पडत नाही हे माहित नसणे, वृषणफलांमध्ये मध्ये अंतर असणे, ती वर-खाली असणे, हस्तमैथुन केल्याने अंगातील शक्ती कमी होते असा गैरसमज अंगी बाळगणे, अशा अनेक गोष्टींबद्दल मोकळेपणे बोलायला मुलांना पण एक ह्क्काच माणूस लागतं !!! जिथे ती व्यक्त होऊ शकतील. पण बहुतांशी वेळा आपल्या अतिशय घनिष्ट मित्रांमध्येच यावर चर्चा केली जाते.

मुलांचे मार्गदर्शक कोण ? तर त्यांचेच समवयस्क मित्र नाहीतर आजकाल गुगल. पण गुगलवर या विषयाबद्दल शोधताना, अनेकदा भलतीच माहिती हाती लागते, शिवाय कोणती माहिती कोणत्या संकेतस्थळावरून घ्यावी ही समज असत नाही, आणि अशामुळे शोधमोहीम भरकटण्याची, दाट शक्यता असते.

मी आणि माझ्या मित्रांचं सुदैव म्हणजे, आम्ही सर्वच अतिशय सुशिक्षित, तसेच बऱ्यापैकी उघडपणे चर्चा होणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलो, तसेच आमच्याच गृहसंकुलात आमच्यापेक्षा वयाने काहीच मोठे असलेल्या डॉक्टरांचा दवाखाना सुरु झाला होता, आणि ते काहीवेळा आमच्यात क्रिकेट खेळायला पण यायचे. त्यामुळे त्यांच्याशी अशा विषयांवर संवाद साधताना दडपण कमी यायचं..

“आमच्या घरात नेहमीच विविध विषयांवरील पुस्तकांचा ढीग लागलेला असायचा. दहावीला असताना, असच एक पुस्तक हाती लागलं, महाराष्ट्र आरोग्य शिक्षण मंडळ अस काहीतरी त्यावर लिहिलेलं होतं आणि लैंगिक शिक्षणावर होतं.”

नुसत चाळायला घेतलेलं पुस्तक, पूर्ण वाचून झाल्यावरच हातातून खाली ठेवलं. एका दमात वाचलेलं आयुष्यातील एकमेव पुस्तक म्हणता येईल. तर त्या पुस्तकातून अनेक गोष्टी योग्य वयात समजल्या.

पुस्तकाबद्दल सांगायचा उद्देश म्हणजे ... माझ्या समवयस्क एका मित्राच्या छातीमध्ये लहान गाठी आल्या होत्या. बोलता बोलता त्याने ही गोष्ट मला सांगितली. त्याचप्रमाणे ती गोष्ट त्याने त्याच्या वडिलांना पण सांगितली होती. पण त्याच्या वडिलांनी त्याला आयोडेक्सने चोळायचा सल्ला दिला. मी अगोदर त्यावरील एक मोठं पुस्तक वाचल्याने  मित्राला योग्य मार्गदर्शन करू शकलो. त्याला सांगितलं, “बाबारे तुला स्तन वगैरे येणार नाहीत. या गाठी काही दिवसांनी आपोआप नाहिश्या होतील. हे बघ या पुस्तकात लिहिलं आहे”.त्यावेळी तो शांत झाला.. अर्थात अगदी घरातल्या व्यक्तींना देखील, परिपूर्ण माहिती असेल असे सुद्धा नाही, पण नक्कीच बहुतांशीवेळा मित्रांना विचारण्यापेक्षा, घरातल्या अनुभवी व्यक्तींना विचारणे, हा कधीही चांगलाच आणि विश्वासार्ह पर्याय आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, का वयात आलेला मुलगा आणि बाप एकमेकांचे हाडवैरी बनून संवादाची दारे बंद करून टाकतात? का काहीच घरांमध्ये अशा विषयांवर उघड चर्चा होऊ शकतात ,आणि बाकी घरांमध्ये नाही? यावर खरोखरच चिंतन व्हायची गरज आहे...

हा विषय काही लोकांच्या मते चेष्टेचा ठरू शकतो, काही लोक गांभीर्यानेपण घेतील, काहीजण दुर्लक्षित करतील , पण हे नक्की आहे, की तरुण मुलं या दिव्यातून जात असताना, त्यांना समजून घेण गरजेच आहे ; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे त्यांना समजून घेणे नव्हे.

“आमचा मुलगा दिवसभर खोलीत कोंडून घेऊन बसलेला असतो,”
“त्याचा तो कॉम्प्युटरवर काहीतरी करत असतो,”
“आता जेवणाच ताट देखील आम्ही त्याला त्याच्या खोलीतच नेऊन देतो”
“आता तो फक्त चहा प्यायला खोलीतून बाहेर येईल ..”

अशा आशयाची कौतुकपर वाक्य हमखास ऐकायला मिळतात. पण आपला मुलगा नक्की काय करतो, त्याच्या डोक्यात विचारांची काय घरघर चालू आहे, या गोष्टींबाबत खूपच कमी पालक विचार करतात. समुद्र वरवर जरी शांत दिसत असला तरी त्याच्या अंतरंगात प्रचंड उलथापालथ चालू असते, असंच काहीसं या मुलांचं पण असतं.

या सगळ्यातून अनेक जण सहीसलामत पुढच्या आयुष्यात पाउल ठेवतात, तर अनेकांना यातून बाहेर पडण जड देखील जाते. अत्यंत हुशार मुलगा बोर्डाच्या परीक्षेत अचानक कमी टक्के घेतो, तेव्हा जी कारणे शोधली जातात, त्यामध्ये तर त्यांच्या शरीरातील बदल हे कारण, कुणी ग्राह्य पण धरत नाही हे सर्वात मोठं दुर्दैव!!!! याशिवाय देखील, या शारीरिक बदलांना सामोरे जात असताना, त्यांची चिडचिड होणे, नैराश्य येणे, अपराधीपणाची भावना येणे, चुकीची संगत लागणे, त्यातून व्यसनाच्या आहारी जाणे, अनेक मुलींच्याकडे आकर्षित होऊन अभ्यासात दुर्लक्ष होणे, एखाद्या कॉलगर्लच्या जाळ्यात अडकणे, अशी एक ना अनेक आव्हाने आणि संकटे असतात..

कॉलगर्लच्या जाळ्यावरून एक किस्सा आठवला! काही दिवसांपूर्वी मला एका निनावी क्रमांकावरून फोन आला. पलीकडची महिला म्हटली “सर हम मसाज पार्लर से बात कर रहे है! क्या आप हमारे साथ काम करेंगे?” मला शंका आलीच, मी म्हटलं काय काम आहे? तर ती महिला म्हटली की, “हमारे पास हाय प्रोफाईल, बहुत हाय क्लास लेडीज आती है, इन लेडीज को सेक्शुअली सॅटिसफाय करना होता है..एक सेशन के आपको ४०-५० हजार तक मिलेंगे”, मला समजलं की हे सेक्स रॅकेटआहे. मी म्हटलं माझा नंबर तुम्हाला कुणी दिला? तर म्हणे असाच मिळाला.. मग म्हटलं, पोलिसात तक्रार देऊ का? असं म्हटल्यावर रागाने त्या महिलेने फोन बंद केला.

आज मी पस्तिशीत आहे, जवळपास सर्व धोकादायक वळणातून तावून सुलाखून बाहेर पडलो आहे, म्हणून मी हा प्रसंग आत्मविश्वासाने आणि धिटाईने हाताळू शकलो, पण असा फोन एखाद्या कॉलेजकुमाराला गेला तर???? काळजी वाटते …

“या अवस्थेतून निघून पुढे, लग्न झाल्यावर देखील, अज्ञान पाठ सोडत नाही..अनेकदा लग्न झाल्यावर पहिल्या रात्री येणाऱ्या संबंधांवर, त्याला तसेच तिलाही मार्गदर्शनाची गरज असते.”

अनेक वर्ष एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहून, एकदम ती समोर आल्यावर अनेकदा पुरुषाच्या लिंगाचा ताठपणा कमी होऊन ते मलूल पडते. ती भावना पुरुषासाठी अपमानास्पद वाटू शकते, त्यामुळे भयानक नैराश्य येऊ शकत, पण त्यात तथ्य नसतं. असं अनेकांच्या बाबतीत घडतं ! त्याचप्रमाणे प्रथम संबंध आल्यानंतर, स्त्रीच्या योनीतील, स्नायूंचा पातळ पडदा फाटतो, अशा वेळी रक्तस्त्राव होतो. त्यावेळी घाबरून न जाता काय करावं हे माहित नसतं. हा स्नायूंचा पडदा अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी लग्नाच्या अगोदरच फाटू शकतो. मुलगी खेळाडू असेल, सायकलिंग करणारी असेल, तरीही हा पडदा अगोदरच आपोआप फाटू शकतो. पण काही बेअक्कल पुरुष असतात जे या कारणामुळे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, स्वतः बरोबरच तिच्या आयुष्याचीपण वाट लावतात. अशा अनेक पेचप्रसंगांच्यावेळी, आपल्या आई वडिलांकडे याबाबत विचारणा न करता समवयस्क मित्र-मैत्रीणीना विचारणे, हाच पर्याय स्वीकारला जातो, आणि बऱ्याच वेळा चुकीचं मार्गदर्शनदेखील मिळत…हे अज्ञानाचं चक्र पुढे पण चालूच राहतं! पण अशा सर्वच मुद्द्यांवर या लेखामध्ये प्रकाश टाकता येणार नाही.

“मग या सगळ्यांवर काहीच उपाय नाही का?”

लेखात अनेकदा सांगितल्याप्रमाणे कुटुंबांमध्ये अशा विषयांवर उघड चर्चा व्हायला हव्यात, किमान मुलांमध्ये आणि त्याच्या आईबाबामध्ये नातं इतकं मैत्रीचं असाव की, त्या मुलाला यावर बोलताना अडचण येऊच नये. मुलांसाठी सर्वात पहिला ‘पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट’ त्याचे आईवडीलच असावेत, आणि त्यांच्याकडे उत्तरे नसतील तर तज्ञांचे मार्गदर्शन गरजेचे आहे.

जेवढी याबाबत लपवालपवी होईल तेवढं औत्सुक्य वाढतच जाईल! लैंगिक शिक्षण आणि तत्सम विषयांवर दर्जेदार साहित्य घरामध्ये असावं, जिथे मुलांना योग्य माहिती मिळेल. मुलांचे मित्र कोण आहेत? यावर पालकांचं नेहमीच लक्ष असावं..अर्थात मायक्रोमॉनीटरिंग देखील नको, कारण त्याने संबंध बिघडू शकतात. केवळ अभ्यास, घर, आणि शाळा/महाविद्यालय, यापेक्षा अजून मुलांना काय आवडतं याची पण चाचपणी पालकांनी करावी.

माझ्याकडे प्लुटो नावाचा ‘लॅबरॅडोर’ जातीचा कुत्रा आहे. तो एकेकाळी प्रचंड हायपर होता, त्याच्या अंगात खूप उर्जा होती. मला नेहमी प्रश्न पडायचा की ही उर्जा याच्या अंगातून कशी काढावी म्हणजे, हा थोडा शांत बसेल? नाहीतर याच्यावर भूंक, त्याच्यावर भूंक, दार वाजले की धावत जा, आलेल्या माणसाच्या अंगावर उड्या मार! यावर त्याच्या डॉक्टरांनी चांगला उपाय सांगितला. डॉक्टर म्हणाले, त्याला व्यायाम कमी पडतोय, शिवाय त्याला केवळ शरीरानेच थकवू नका, त्याचा मेंदू पण थकला पाहिजे! त्यासाठी त्याला वेगवेगळ्या करामतीपण शिकवा, मी सध्या हा उपाय अमलात आणायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात बराच फरक पडला आहे.

मी प्लुटोचे उदाहरण का दिले असावे? कारण तरूण मुलांच्या अंगातदेखील  त्या वयात प्रचंड उर्जा असते. ती उर्जा विविध मार्गाने त्यांच्या विकासासाठी खर्च झाल्यास त्याचा त्यांना फायदा तर होईलच पण, पण शारीरिक बदलांना ती अधिक समर्थपणे तोंड देतील. बुद्धिबळ, सुडोकू, विविध कोडी, रुबिक क्यूब, इ. मुळे ती बौद्धिकरीत्या थकतीलच पण मैदानी खेळांमुळे शारीरिक दृष्ट्या पण थकतील, शिवाय या सर्वातून थकून गेल्यावर ताजंतवानं होण्याकरता जर संगीत, नाट्य, कला यांची जोड मिळाली तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पण मोठी भर पडेल. शिवाय इतक्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती थकून, अशा गोष्टींचा अधिक विचार न करता भरपूर झोपतील हा त्यातला मोठा फायदा. यामुळे नैसर्गिक भावनांना कुठेच धक्का लागणार नाही, पण अशा शारीरिक बदलांची तीव्रता मुलांना कमी जाणवेल, आणि त्याचा त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल.

अर्थात हे मुद्दे माझ्या चिंतनातून मी मांडले आहेत, अजूनही विविध उपाय असतील..

“वर मांडलेल्या अनेक गोष्टी तारुण्यात असतानाच नाही, तर नंतर देखील अनेकांच्या मनाला स्पर्शून जातात, पण यावर अधिक कुणीच बोलत नाही.”

किमान आजची पिढी, माझ्यासारखे तिशी-पस्तीशीतील नवपालक आपल्या मुलांशी मैत्रीच नातं प्रस्थापित करू शकतील, आपली मुलं वयात आल्यानंतर, अशा कोणत्याही अडचणीच्या वेळी सर्वप्रथम विश्वासार्ह जागा म्हणून गुगल मारून काही आक्षेपार्ह संकेतस्थळांवर न जाता, किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आपल्या मित्रांकडे न जाता, आपल्या आई-बाबाकडेच मार्गदर्शनासाठी येतील, अशी अपेक्षा करुया!!

©सुचिकांत वनारसे


Wednesday, June 22, 2016

आपल्याला हे माहित आहे का? - १

१) स्मितहास्य 😊करण्यासाठी १७ स्नायूंची गरज असते तर आठ्या घालण्यासाठी 😣४३ स्नायूंची गरज असते.

२) २० माणसामागे एकास एक बरगडी जास्त असते.

३) एका माणसाच्या शरीरातील मेदापासून  सात साबण बनवता येतात.

४) दिवसातील कोणत्याही वेळेपेक्षा सकाळी केसांची वाढ जलद होते.

५) जर तुम्ही दाढी कधीच केली नाही तर ती साधारणत: २७.५ फूट लांबीची होऊ शकते.


         || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा 📚माझी भाषा ||

Tuesday, June 21, 2016

सहज सोपे गणित - भाग १

📕📗📘📙📔📒📕
         
     ➕ सहज सोपे गणित ➕
          ✖✖➗✖✖
                     ➖
   📕📗📘📙📔📒📕

नमस्कार,
बऱ्याचदा अंकगणितीय क्रिया करताना बहुतेक विद्यार्थ्यांच्या चिन्हांच्या तसेच गणन चूका होतात

        ⭕ उदाहरण ⭕

१)  -३ + ५ यामध्ये बेरीज करायची की वजाबाकी हा गोंधळ होणे.

२) उत्तराचे चिन्ह निश्चित न करता येणे.

*यासाठी विद्यार्थ्यांकडून खालील तीन पायऱ्यांचा कसून सराव घ्यावा* .

*पायरी* *१):-*  *गुणाकार , भागाकार* *असेल तर तो करून घ्यावा ( नसेल तर दुसऱ्या पायरीपासून सुरुवात करा )*

*पायरी* *२)* *:-* *दोन्ही* *संख्यांची  समान चिन्ह असतील तर*  ➕
*दोन्ही संख्यांची  चिन्ह विरुद्ध  असतील तर* ➖

*पायरी* *३)* *:-* *बेरीज किंवा वजाबाकी केल्यानंतर येणाऱ्या उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे*.

       ⭕  उदाहरण  ⭕

१)   ३ (-५)

पायरी १):-  या उदाहरणात गुणाकार दिसतो तो करून घ्या ( १५)
पायरी २) संख्यांची चिन्हे विरुद्ध म्हणून -
म्हणून ३ (-५) = -१५

उदा २)  (-४) / (-२)

पायरी १) :-  या उदाहरणात भागाकार दिसतो तो करून घ्या ( २ )
पायरी २) :-  संख्यांची चिन्हे समान म्हणून +
म्हणून (-४) /(-२) = २

        ⭕ उदाहरण ⭕

३)  -३ + ५

पायरी १) :-  या उदाहरणात गुणाकार किंवा भागाकार नाही म्हणून दुसऱ्या पायरीपासून सुरुवात करा.
पायरी २) :- संख्यांची चिन्हे विरुद्ध म्हणून *-*
म्हणून -३+५ = २
पायरी ३) वजाबाकीत मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला देतात
म्हणून  -३ + ५ = २

         ⭕  उदाहरण  ⭕

४) -३-५

पायरी १) :-  या उदाहरणात गुणाकार किंवा भागाकार नाही म्हणून दुसऱ्या पायरीपासून सुरुवात करा.
पायरी २) :- संख्यांची चिन्हे समान म्हणून *+*
म्हणून -३-५ = ८
पायरी ३) बेरजेत मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला देतात
म्हणून  -३ - ५ = -८

या पद्धतीने सराव केल्यास मुले अंकगणितीय क्रिया बिनचूक करतात असा आमचा अनुभव आहे .
आपण यापेक्षा वेगळी अथवा सोपी पद्धत वापरत असाल तर आम्हांला कळवा आपले स्वागत आहे. ती पद्धती आपल्या नावासहित सर्व समूहात प्रसारित केली जाईल .

         || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा 📚माझी भाषा ||

Monday, June 20, 2016

योगदिनानिमित्त || ज्ञानभाषा मराठी || वर झालेली चर्चा.


श्री. प्रभू खाडिलकर : योग मान्य करताना त्याचे दैवताची माहिती पातंजलीनी दिली आहे. ती मानली नाही तरी पतंजलीना पहिले योगगुरू मानायला हरकत नसावी.

डॉ. प्रज्ञा देशपांडे : पतत्+अञ्जलि=पतन्+अञ्जलि=पतञ्जलि = व्याकरण महाभाष्यकार व योगशास्त्रकार (आदि शेष भगवान)   *पतंजलि* यांच्या जन्मकथेवरून  हे नाव आहे.

श्री. दिलीप फडके : पतंजली हे ऋषी होते ना, ते भगवान कधी झाले?

डॉ. प्रज्ञा देशपांडे : भगवान आदि शेष म्हटले ,पतंजलि नव्हे . तसेही *भगवान्* म्हणजे काय??

श्री. दिलीप फडके : Bhagvan  म्हणजे god समजतो आम्ही

डॉ. प्रज्ञा देशपांडे : भग>ऐश्वर्य वत्>असलेला/ असलेली / असलेलं। भगवत्>भगवान्> ऐश्वर्ययुक्त, असा मूळ अर्थ आहे म्हणून देव/राजा/गुरु/उपकारकर्ता /तारणहार इ इ ला भगवान म्हणण्याचा प्रघात आहे.

श्री. दिलीप फडके : माझ म्हणणं इतकच कीं योगा जगभर पसरावा अस वाटत असेल तर त्याला देव देवतांच्या जोखडातून मुक्त केला पाहिजे

डॉ. प्रज्ञा देशपांडे : त्यात माझे दुमत नाही. *योगशास्त्र/योगदर्शन* याचा प्रचलित धर्मांशी संबंध नाहीच ,ते अतिशय नैसर्गिक विज्ञान आहे.

श्री. दिलीप फडके : पण तो जोडण्याचा अट्टाहास केला जातो ना

डॉ. प्रज्ञा देशपांडे
: जे करतात ते अज्ञच पण जे तोडतात तेही सुज्ञ नव्हे . *योगदर्शन* मूळ भारतभूमीतील असल्यामुळे त्याचे भारतीयीकरण असणे स्वाभाविक आहे . पण भारतीय>हिन्दू >धार्मिक >संकुचित    असा तर्क सुद्धा अतिकाळजीवाहक नाही का?

श्री. दिलीप फडके : मूळ भारतीय आहे हे सत्यच आहे पण मुळापेक्षा विस्ताराकडे अधिक पाहूया नाआता कुणी मुळा शिवाय विस्तार वगरे काढू नये कृपया अर्थ घ्यावा

डॉ. प्रज्ञा देशपांडे : मन+बुद्धी +शरीर, कोणत्याही धर्माचे असो ते निरोगी राहून विकसित व्हावे हाच खरा योग होय


Thursday, June 16, 2016

ये रे घना - रसग्रहण

आरती प्रभुंची एक अम्लान कविता आहे,

     ये रे घना
     ये रे घना
     न्हावूं घाल
     माझ्या मना

कुणाला घातलेली साद आहे ही ? प्रखर उन्हानं पोळलेल्या, तडफडणार्‍या शरीराला तुडुंब भरून आलेला पावसाळी ढग न्हाऊ घालतो खरा; पण मनाला न्हाऊ घालणाराही फक्‍त तोच आहे ! की हा कोरड्या आयुष्याला ओला दिलासा देणारा स्‍नेहाचा मेघ आहे ? की सर्जनाचा सजल संभार आहे.. मनाला नवे फुटवे आणणारा ? माहीत नाही. कदाचित हे सगळं असेल एकत्रपणे.
     फुलें माझी
     अळुमाळू
     वारा बघे
     चुरगळूं

     नको नको
     म्हणतांना
     गंध गेला
     रानावना

मूळ कविता ही अशी. एवढीच. वार्‍यानं नाजूक फुलं चुरगळली आणि गंध सर्वभर नेला, त्याची कहाणी सांगणारी. पहिल्या ओळी आल्या त्या १९५७-५८ साली कधीतरी. कविता म्हणून त्या आल्याच नाहीत. समोर होते तेही ‘सजल श्याम घन’ नव्हते. शुभ्र पांढरा रंग होता त्यांचा. पण न्हाऊ घालणारा मेघ पांढरा थोडाच असतो ? ओळी तर आल्या त्या तशाच. समोरचे शुभ्र ढग हे निमित्त. पण त्या ओळींमध्ये कवितेचा श्वास हलला नव्हता. कितीतरी दिवस ! नव्हे, कितीतरी वर्षं !

मग आरती प्रभु कोकणातलं आपलं लहानसं कुडाळ गाव सोडून मुंबईला आले. कुडाळला त्यांची खाणावळ होती. ती बंद करून बायको-मुलांना मामाकडे ठेवून नोकरीसाठी ते मुंबईसारख्या महानगरात आले. पण इथेही त्यांचा जीव रमत नव्हता. हे जग आपलं नव्हे, असं पुन्हा पुन्हा जाणवत होतं. गावाकडे परत जावंसं वाटत होतं. पण तिथे परतण्याची वाट आता बंद झाली आहे, हेही कळत होतं.

१९६९ साली ‘दिवेलागण’ या संग्रहात प्रसिद्ध झालेली ती कविता एवढीच होती. आरती प्रभुंनी स्वत:च या कवितेमागची कथा लिहून ठेवली आहे. तेव्हा ते मुंबई नभोवाणीवर नोकरी करत होते. मंगेश पाडगावकर तिथेच कार्यक्रम अधिकारी होते. त्यांच्यामुळेच तर ती नोकरी मिळाली होती. एक दिवस आकाशवाणीवर बिस्मिल्ला खाँच्या सनईवादनाचं ध्वनिमुद्रण होतं. पाडगावकरांच्या आग्रहामुळे स्टुडिओत बसून आरती प्रभु ते वादन ऐकत होते. ऐकता ऐकता कोकणातलं आपलं गाव आठवलं त्यांना. तिथले चौघडड्याबरोबर वाजणारे सनईचे सूर आठवले आणि ‘ये रे घना, ये रे घना’ या निव्वळ शब्दांमधून कवितेचा श्वास हलू लागला आणि आणखी आठ ओळींची त्यात भर पडून कविता पूर्ण झाली.

मग एक दिवस पं. हृदयनाथ मंगेशकरांनी तिला चाल दिली आणि आरती प्रभुंच्या लक्षात आलं की, हृदयनाथांनी अगदी उत्स्फूर्तपणे तिला पुन्हा जन्माला घातलं आहे. आज आपण ही कविता गाणं म्हणून ऐकतो तेव्हा आपल्यालाही ते जाणवतं. वाटतं की, ही कविता नुसती कागदावर छापलेली होती तेव्हा पूर्ण नव्हती झालेली. ऐकल्यानंतरच ती पूर्ण झालेली हे कळते आहे. जणू या कवितेचे कवी एकटे आरती प्रभू नाहीतच. हृदयनाथही आहेत. त्या कवितेतला अनुभव तिचं गाणं झाल्यानं पुरा झाला आहे.

अर्थात त्यासाठी तिचा विस्तारही आरती प्रभूंनी नंतर केला आहे. जणू एक विश्राम घेऊन, एका टप्प्यावर मुक्काम करून नंतर ती पुढे निघाली आहे-
     टाकुनिया घरदार
     नाचणार नाचणार
     नको नको म्हणताना
     मनमोर भर राना

     नको नको किती म्हणू
     वाजणार दूर वेणू
     बोलावतो सोसाटय़ाचा
     वारा मला रसपाना

कशी स्वत:मधून सारखी नव्या-नव्याने स्फुरत राहणारी आहे ही कविता ! फुलं आहेत, वारा आहे, नाचणारा मोर आणि वाजणारी बासरी आहे. तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींची सांकेतिकता सहज दूर सारून येते ही. एक सुखावणारी आर्तता हिच्यात हेलावत राहिली आहे.
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना.. कोण म्हणतं आहे हे ? ही कुणाची आळवणी आहे ? आरती प्रभुंनी स्वत:च हे प्रश्न विचारले आहेत. ही आळवणी का सुरू आहे ? कशासाठी ? कुणासाठी ? आणि ही आळवणी करतंय तरी कोण ? खरंच, ही आळवणी त्यांची आहे ? आरती प्रभु नावाच्या कवीची? की त्यांच्या कवितेचा अंत:स्वर जागा करणार्‍या संगीतकाराची ? की कवितेची स्वत:चीच ?

वाटतं की, ही प्रत्येक माणसाची सदाचीच आळवणी आहे. आपली तगमग शमावी, दाह शांत व्हावा, जगण्याचा ओला गारवा आतपर्यंत झिरपत जावा, भिजावं मन यासाठी तान्हेल्या प्रत्येकाची आळवणी. तुमच्या-माझ्या मनात खोलवर सारखीच उमटत असलेली साद जणू आरती प्रभुंनी कविता होऊन प्रत्यक्ष घातली गेली आहे.

©अमृता इंदुरकर

Wednesday, June 15, 2016

जास्तीत जास्त चित्रपट भारतात शुक्रवारी रिलीज़ करायच कारण ?


____________________

ही अमेरिकेतली प्रथा आपणही उचलली. अमेरिकेत शुक्रवारी साप्ताहिक पगार व्हायचे आणि खर्च करण्यासाठी लोकांच्या खिशात पैसा येत असे तेव्हाच नवा चित्रपट बघायला मिळाला तर लोक बघायची  आणि गल्ला जास्त जमणार. तीच प्रथा भारतात सुरु झाली. एवढेच नाही.  आठवत की दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक नव्या गोष्टी बाजारात आणल्या जात कारण लोक नवे  काय घ्यायचे ते दिवाळीत घेत असत. दिवाळी सणही अगदी योग्य येतो. जेव्हा शेतकऱ्याच्या खिशात पैसा येतो त्या  काळातच. (पूर्वीच्या काळी शेतकऱ्याच्या खिशात थोडाफार पैसा येत असे आणि तो दिवाळीच्या आधिच.)

- मिलिंद रानडे

__________________

"विचारा काहीही, काहीही विचारा" फेसबुक समूह

Tuesday, June 14, 2016

नीट विचार

वैद्यकीय प्रवेश केवळ सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित NEET नुसार होणार म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, संस्थाचालक सैरभैर होऊन राज्यातील मुले त्यात यश मिळवण्यात कमी पडतील अशी भीती व्यक्त करतात.

ही भीती निराधार आहे. NEET संबंधित विषयांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमात जे घटक ( topics ) आहेत ते सर्व महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात आहेतच, शिवाय सीबीएसईकडे नसलेले ज्यादा घटकही महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांत असल्याने महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांचा नीट अभ्यास केलेल्यांनी NEET ची धास्ती बाळगू नये.  सीबीएसईची आणि महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके प्रथम पाहताना वेगळी वाटतात पण त्यांच्या आशयात (content) वेगळेपण नसून केवळ मांडणीत वेगळेपण आहे. सीबीएसईत प्रत्येक घटक एकतर पूर्णपणे ११ वीत, नाहीतर पूर्णपणे १२ वीत आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांत प्रत्येक घटक ११ वी, १२ वीला विभागून आहे. उदा. ध्वनी तरंग ( sound waves ), चुंबकीय ( magnetic ) हे घटक सीबीएसईला एकतर पूर्णपणे ११ वीत किंवा पूर्णपणे १२ वीत आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांत प्रत्येक घटकाचा सहजसोपा भाग ११ वीत आणि त्यावर आधारित सखोल भाग १२ वीत आहे.  

सीबीएसईत जो मोठा घास एकदम खावा लागतो तो राज्य बोर्ड टप्प्याटप्प्याने, विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा पद्धतीने खाऊ घालते. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्र बोर्डाची पद्धत विषयाचे ज्ञान अधिक चांगले होण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. NEET देऊ  इच्छिणारे जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाशी जोडले आहेत त्यांनी स्वत:ला भाग्यवान मानावे. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी खरेतर स्वत:च्या नकळत सीबीएसई अभ्यासक्रमाचा दोन टप्प्यात विभागून अधिक चांगला अभ्यास केला शिवाय बराच जास्तीचा अभ्यासही केला आहे.

अशा प्रकारे महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके खरेतर NEET परीक्षा नीटपणे देण्यासाठी अधिक उपयुक्त असल्याने त्यांचा अभ्यास केलेल्यानी उगाच बावचळून न जाता आत्मविश्वासाने NEET परीक्षा नीट द्यावी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ( PCB ) विषयांची NEET  साठी तयारी करताना या विषयांमधील बारकावे समजण्यासाठी या तीनही विषयांची पुस्तके महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार असलेली जी पुस्तके मराठीतूनही  मिळतात त्यांचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतील.

महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना वरील तीन विषयांसाठी ११ वी आणि १२ वीच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल,  तरी त्याला संकट न मानता संधीच मानावी. दोन्ही पुस्तकातील एकाच प्रकारचा भाग निवडून त्यांची एकापुढे एक जोडणी झालेल्या धड्यांचा एकामागोमाग अभ्यास केल्याने त्या  विशिष्ट भागाचे बारकावे अधिक चांगले समजतील हा विचार करून NEET ची तयारी आजपासून, नव्हे आत्तापासून सुरु करावी असे मी संबंधित विद्यार्थ्यांना आवाहन करतो. यश तुमची वाट पाहत आहे.  
 
प्रा.  अनिल  गोरे ( मराठीकाका )  
४७१, शनिवार पेठ, पुणे ४११०३०.
भ्रमणध्वनी ९४२२००१६७१