वैद्यकीय प्रवेश केवळ सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित NEET नुसार होणार म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, संस्थाचालक सैरभैर होऊन राज्यातील मुले त्यात यश मिळवण्यात कमी पडतील अशी भीती व्यक्त करतात.
ही भीती निराधार आहे. NEET संबंधित विषयांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमात जे घटक ( topics ) आहेत ते सर्व महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात आहेतच, शिवाय सीबीएसईकडे नसलेले ज्यादा घटकही महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांत असल्याने महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांचा नीट अभ्यास केलेल्यांनी NEET ची धास्ती बाळगू नये. सीबीएसईची आणि महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके प्रथम पाहताना वेगळी वाटतात पण त्यांच्या आशयात (content) वेगळेपण नसून केवळ मांडणीत वेगळेपण आहे. सीबीएसईत प्रत्येक घटक एकतर पूर्णपणे ११ वीत, नाहीतर पूर्णपणे १२ वीत आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांत प्रत्येक घटक ११ वी, १२ वीला विभागून आहे. उदा. ध्वनी तरंग ( sound waves ), चुंबकीय ( magnetic ) हे घटक सीबीएसईला एकतर पूर्णपणे ११ वीत किंवा पूर्णपणे १२ वीत आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांत प्रत्येक घटकाचा सहजसोपा भाग ११ वीत आणि त्यावर आधारित सखोल भाग १२ वीत आहे.
सीबीएसईत जो मोठा घास एकदम खावा लागतो तो राज्य बोर्ड टप्प्याटप्प्याने, विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा पद्धतीने खाऊ घालते. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्र बोर्डाची पद्धत विषयाचे ज्ञान अधिक चांगले होण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. NEET देऊ इच्छिणारे जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाशी जोडले आहेत त्यांनी स्वत:ला भाग्यवान मानावे. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी खरेतर स्वत:च्या नकळत सीबीएसई अभ्यासक्रमाचा दोन टप्प्यात विभागून अधिक चांगला अभ्यास केला शिवाय बराच जास्तीचा अभ्यासही केला आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके खरेतर NEET परीक्षा नीटपणे देण्यासाठी अधिक उपयुक्त असल्याने त्यांचा अभ्यास केलेल्यानी उगाच बावचळून न जाता आत्मविश्वासाने NEET परीक्षा नीट द्यावी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ( PCB ) विषयांची NEET साठी तयारी करताना या विषयांमधील बारकावे समजण्यासाठी या तीनही विषयांची पुस्तके महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार असलेली जी पुस्तके मराठीतूनही मिळतात त्यांचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतील.
महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना वरील तीन विषयांसाठी ११ वी आणि १२ वीच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल, तरी त्याला संकट न मानता संधीच मानावी. दोन्ही पुस्तकातील एकाच प्रकारचा भाग निवडून त्यांची एकापुढे एक जोडणी झालेल्या धड्यांचा एकामागोमाग अभ्यास केल्याने त्या विशिष्ट भागाचे बारकावे अधिक चांगले समजतील हा विचार करून NEET ची तयारी आजपासून, नव्हे आत्तापासून सुरु करावी असे मी संबंधित विद्यार्थ्यांना आवाहन करतो. यश तुमची वाट पाहत आहे.
प्रा. अनिल गोरे ( मराठीकाका )
४७१, शनिवार पेठ, पुणे ४११०३०.
भ्रमणध्वनी ९४२२००१६७१
No comments:
Post a Comment