ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Tuesday, July 4, 2017

पितामह!

भारतीय राजकारणाचे पितामह दादाभाई नवरोजी ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले, त्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आहे. संसदीय मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच भारतात सामाजिक व आर्थिक सुधारणाही झाल्या पाहिजेत यासाठी झटणाऱ्या पहिल्या पिढीच्या या बिनीच्या शिलेदाराच्या स्मृतींस वंदन!

ब्रिटनमधील फिन्सबरी (मध्य) या मतदारसंघातून 1892 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लिबरल पार्टीतर्फे निवडून गेले. या संसदेत निवडून जाणारे ते पहिलेच आशियाई नागरिक. फिन्सबरीला झालेल्या एका पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने त्यांना ब्रिटिश संसदेत केवळ तीन वर्षांचाच कालावधी मिळाला, पण या काळात त्यांनी आपली बुद्धिमत्ता व प्रखर भारतभक्ती यांची छाप पाडली.

ब्रिटिश संसदेत निवडून आल्यानंतर हातात बायबल घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्यास त्यांनी ठाम नकार दिल्याने खळबळ उडाली. `मी ख्रिश्चन  नाही, त्यामुळे मी बायबलची शपथ घेणार नाही,' असा त्यांचा निर्धार होता. अखेर ब्रिटिश संसद नमली व अवेस्थाची प्रत हाती घेऊन ईश्वराची शपथ घेण्याची परवानगी त्यांना मिळाली. ब्रिटिश संसदीय इतिहासात हा नवा पायंडा दादाभाई च पाडला.

संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात दादाभाईंनी ब्रिटिश सरकारच्या भारतातील भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. भारतीय एक तर ब्रिटनचे `नागरिक' आहेत किंवा `गुलाम' आहेत, असे ते स्पष्टपणे म्हणाले. भारतात निर्माण होणारी संपत्ती ब्रिटनमध्ये न जाता ती भारतातच राहून भारतीयांच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे, असे मत त्यांनी संसदेत मांडले. हे क्रांतिकारक विचार ऐकून ब्रिटिश विचारवंत व अर्थतज्ज्ञही चक्रावून गेले.

याच सिद्धांताचे अधिक स्पष्टिकरण करण्यासाठी त्यांनी Poverty and Un-British Rule in India हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व नंतर ब्रिटिश सरकार यांनी भारताची कशी लूट चालवली आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. पुढे स्वदेशीच्या चळवळी सुरू झाल्या, त्याचे मूळ सूत्र या ग्रंथातच विशद केलेले आहे.

ब्रिटिश संसदेत दादाभाईंनी आयरिश होमरुल चळवळीवर भाष्य केलेच, शिवाय भारतीयांच्या परिस्थितीवरही प्रखर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे अनेक ब्रिटिश संसदपटूंना सरकारच्या अंतस्थ कारवाया समजू लागल्या. ब्रिटिश संसदेत काम करताना दादाभाईंना महम्मद अली जिना मदत करत असत, हे विशेष. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी या स्वातंत्र चळवळीतील नेत्यांवरही दादाभाईंचे विचार व कार्य यांचा प्रभाव होता.

नवरोजींचा जन्म मुंबईचा. पण या तरुण व तडफदार पारसी तरुणाला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात बोलावून घेतले व `दिवाण' केले. तिथेच त्यांनी `रास्त गुफ्तर' हा ग्रंथ गुजरातीत लिहून पारसी धर्मांच्या रुढींबाबतचे स्पष्टिकरण केले.

1855मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणित व नैसर्गिक तत्त्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले. असे पद मिळवणारे ते पहिलेच भारतीय.

व्यापारासाठी ते लंडनला गेले खरे, पण तिथे ते लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक बनले. विशेष म्हणजे मराठीतील आद्य पत्रकार व प्रकाण्ड पंडित-समाजसेवक बाळशास्त्री जांभेकर यांनी दादाभाईना काही काळ अध्यापन केले होते, असे दादाभाइंर्नीच कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.

त्यापूर्वी त्यांनी लंडनमध्ये स्वत:ची `दादाभाई नवरोजी अँड कंपनी' ही कापसाचा व्यापार करणारी कंपनी स्थापन केली होती. इंग्लंडमधले अशी कंपनी उभारणारे ते पहिले भारतीय उद्योजक ठरले.

`ईस्ट इंडिया असोसिएशन' या संस्थेची 1867मध्ये स्थापना करण्यात दादाभाईंचा मोठा हातभार होता. या संघटनेचेच रुपांतर पुढे 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात झाले. सर अलेक डग्लस ह्युम, सर सुरेंद्र नाथ बॅनर्जी प्रभृतींच्या साथीने भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस काम करू लागली. दादाभाई काँग्रेसचे 1886मध्ये अध्यक्ष झाले. हे पद त्यांनी पुढे तीन वेळा भुषवले.

असे दादाभाई. वयाच्या 90व्या वर्षी 30 जून 1917 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांची अनेक स्मारके मुंबईत व बडोद्यात तर आहेतच, शिवाय पाकिस्तानमध्येही कराची शहरात त्यांच्या नावाचा रस्ता आहे व इंग्लंडमध्ये फिन्सबरीला ज्येष्ठ सरकारी वसाहती ज्या भागात आहेत, तिथल्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.

*लेखक - भारतकुमार राऊत*
*फेसबुक पोस्ट* - https://goo.gl/5dtQJ3
*टीप* - पोस्ट *दादाभाई नवरोजी* यांच्या फोटोसकट फिरवा

---------------------------------
*ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान*
*माझीशाळामाझीभाषा*
---------------------------------

*>>पुढच्या १० whatsapp गटात टाका>>*

No comments:

Post a Comment