ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, July 23, 2017

#संकटसमयीमातृभाषाच

#संकटसमयीमातृभाषाच

 तुम्ही कुठेही असा ... आपली मातृभाषा-मराठी हृदयाला साद घालते, हेच खरं. त्याला वयाचं बंधन नाही.
मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवा! त्यांना शिक्षणाचा आनंद घेउद्या, दडपण नको असं आपण नेहमीच म्हणतो. पण मोठ्या माणसांनादेखील मराठीतून सूचना दिल्या तर त्यांच्यावरील ताण कमी होतो, हे खालील पोस्ट वाचून तुम्हाला समजेल.
_______

विमान प्रवासातील थरारावर मराठीचा उतारा

विमान क्रमांक ६ई८१ इंडिगो एअरलाईन्स मुंबई-मस्कत. काल मुंबईहून निघताना खूप पाऊस पडत होता, हवामान चांगलेच ढगाळ होते. विमान जवळपास ४५ मिनिटे उशीरा निघाले. उडाल्या नंतर २०-२५ मिनीटांनी विमान थरथरू लागले, नंतर हलू लागले. थोडे फार थरथरत असतेच पण बाहेरील वातावरणामुळे जरा जास्तच हलत होते.

प्रवासी थोडे फार चिंताग्रस्त झाले. काही पहिल्यांदा येणारे तर खूपच घाबरले. पण तेवढ्यात विमानाचे कॅप्टन सुभाष पाटील यांनी प्रवाश्यांच्या परीस्थीतीचा अंदाज घेऊन मराठीमधे सुचना द्यायला सुरूवात केली -विमान कीती उंचीवर आहे, कशामुळे थरथरते आहे हे सर्व मराठीत समजावले. विमान वेळेत आणि सुरक्षित पोहचवण्याची खात्री दिली. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेत समजावले. पण त्या आधीच, मराठीत समजावल्याचा प्रभाव इतका छान झाला होता की क्षणात सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाल्या.
विमानात जवळपास ६०% मराठी लोक आहेत हे त्यांना ( कॅप्टन पाटीलांना) माहीत होते, त्यामुळे त्यांनी मातृभाषेमधे संवाद साधल्याने तणाव कमी झाला. अटी-तटीच्या प्रसंगात मातृभाषा का व किती महत्त्वाची आहे ह्यामुळे चांगलेच अधोरेखीत झाले.

आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात मराठीत सुचना ऐकून माझ्या अंगावर तर शहारे आले. नंतर त्यांना भेटून मला कॅप्टन पाटीलांचे आभार मानायचे होते, पण सुरक्षेच्या कारणास्तव केबीन मधे जाता आले नाही. इथूनच त्यांचे आभार.

कॅप्टन पाटीलांच्या उद्घोषणेची क्लीप इथे ऐका https://goo.gl/4xy2LJ

अभय कुलकर्णी, मस्कत
गट - कोल्हापूर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment