ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Sunday, January 15, 2017

वाक्यावरून गोष्ट

काकांची अवस्था भेदरल्यासारखी झाली होती. घरात येताना  अचानक काकू त्यांच्यासमोर कोसळल्या आणि जाग्यालाचं बेशुद्ध झाल्या. हातातील चपात्या आणि कोरड्यासचं भांडं तिथंच ठेऊन ते दरवाज्याकडे सरसावले. दाराच्या कडीला डोकं आपटल्याने डोक्याला खोच पडली होती. त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. ते लालेलाल रक्त पाहून त्यांचं हातपाय लटपटायला लागले. कसंतरी स्वतःला सावरून लाकडी स्टुलावर ठेवलेल्या तांब्यातील पाणी काकूंच्या चेह-यावर मारत भितारल्या आवाजात ते तिला हाका मारू लागले. पण  काहीच प्रतिक्रिया मिळत नव्हती. सारं अंग गार पडल्यावाणी वाटत होतं. कोणालातरी बोलवावं म्हंटल तर अशा अवस्थेत काकूंना सोडून जाणं बरंही वाटत नव्हतं. या उतारत्या वयात दोघांनाही एकमेकांची साथ महत्वाची वाटत होती. काकूंना शुद्धीवर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. हाताचे तळवे चोळावे म्हणून त्यांनी काकूंचे हात हातात घेतले. आणि मुठीतला जाहिरातीचा तुकडा पाहून आणखीनच भेदरून गेले.

नोकरीतून रिटायर झाल्यावर त्यांनी काकूंच्या आग्रहाखातर पोराला डोनेशन देऊन  प्राध्यापकाची नोकरी मिळवून दिली. लगेच त्याचं  लग्न करून टाकलं . यासाठी त्यांनी आपली फंडाची सारी रक्कम खर्ची घातली होती. थोड्या दिवसांनी पोरानं शहरात एक भुखंड घेतला . त्यासाठीही त्यांनी पेन्शनवर कर्ज काढून पैसे चुकते केले. एका वर्षात पोराचा पगार चालू झाला की सगळं ठीक होईल या भाबड्या समजूतीनं त्यांनी आयुष्याची सारी पुंजी खर्च केली होती. म्हातारपणी पोरगा आपल्याला फसवेल याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी त्यांना आली नव्हती. थोड्या दिवसांनी पोराला जसा पगार सुरू झाला तसा तो आईबापासून वेगळं रहायला लागला . लाख प्रयत्न करूनही पोराशी जवळीक साधण्यात काका अयशस्वी झाले . सगळ्याच बाबतीत पोरांनं त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. ज्या वयात गरज होती त्या वयात दोघांचा आधार नाहीसा झाला. आपल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये कसं चालवायचं हा प्रश्न दोघांसमोर होता. त्यामुळे दोघेही प्रचंड तणावाखाली जीवन जगत होते. कुणाम्होरं हात पसरायलासुद्धा जागा राहीली नव्हती.

घडला प्रकार काकूंनाही अनपेक्षित होता. पोटच्या गोळ्यापायी आपणचं आपल्या धन्याला फसवलं या विचारानं काकू खंगत चालल्या होत्या. हळुहळू त्यांचं वागणं विक्षिप्त होत होतं. उतारत्या वयानं दोघांची शरीरे अनेक आजारांची कोठारेच बनली होती. दवापाण्याला पैसा कुठून आणायचा या काळजीनं काकूंनी दोनतीन वेळा जीवन संपवायचा प्रयत्नही केला होता . पण काकांच्या  समजुतदारपणाच्या आणि लाडीगोडीच्या विचारांमुळं त्यांनी तसा प्रकार पुन्हा केला नाही आणि काकांनीही होऊ दिला नाही. काहीवेळा ते बिना औषधपाण्याचे रहायचे पण काकूंच्या तब्येतीची  फार काळजी घेत होते. काकुच्या माघारी अनेक ठिकाणी ते बैठी  नोकरी मिळवण्यासाठी जाऊन येत होते . पण नोकरी मिळवण्यात वाढलेलं वय आडवं येत होतं. शेवटी त्यांनी  वैतागून सोसल तेवढं सोसायचं नाहीतर कुठंतरी किड्यामुंगीसारखं मरायचं असा मनात निश्चय केला होता . मात्र एवढं सोसत असतानाही दोघा नवराबायकोनं पोराला कधीही शिव्याशाप दिला नाही.

आज सकाळी बंड्यांच्या घरातून आणलेला पेपर वाचताना नेहमीप्रमाणे काका जाहीराती पाहत होते. त्यांनी काकूंकडून पेन मागून एक जाहिरात अधोरेखित केली . इतक्यात शेजारचा बंड्या, आजोबांनी बोलावलंय म्हणून त्यांना घेऊन गेला. का कुणास ठावं, उठल्यापासून काकूंच्या मनाची घालमेल वाढली होती. काका शेजा-यांच्यात गेले तोच त्यांनी दाराला कडी लावली. आणि शंका आल्याने पेपरमध्ये कशाला खूण केली ते पाहत बसल्या .ज्यावेळी  काकांनी खूण केलेली जाहीरात वाचली त्यावेळी त्यांच्या काळजात धस्स झालं. किडनी हवी आहे अशी अधोरेखित केलेली जाहीरात होती. अनेक विचारांचे वावटळ त्यांच्या मेंदूत फिरायला लागलं. नव-याची अशी गत बघण्यापेक्षा आपणचं मेलेलं बरं असा विचार त्यांच्या मनात आला.नव-याला  ती जाहीरात मिळू नये म्हणून फाडून आपल्या हातात घेतली. इतक्यात दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने विचारांच्या गोंधळातच त्या दरवाज्याकडे गेल्या. दरवाजा उघडताच समोर काका दिसले. त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते खाली मान घालून घरात शिरले. त्यांच्या पाठमो-या आकृतीकडं पाहत काकू दाराजवळ कोसळल्या.

*बाजीराव जठार*

No comments:

Post a Comment