Tuesday, August 15, 2017

इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळांची गरजच काय?

दैनिक सकाळमध्ये आलेला लेख - https://goo.gl/TFf9BL

इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळांची गरजच काय?
- सुचिकांत वनारसे(ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान)

----------------

सर्वप्रथम मराठी माध्यमात आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेतलेल्या पालकांचे अभिनंदन!!

नेहमीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या पाल्यासाठी महाराष्ट्रातील लाखो पालकांनी पुन्हा एकदा मराठी माध्यमातून शिक्षणालाच पसंती दिली आणि मराठी शाळांच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. मराठी शाळा संपल्या.. कुठे मराठी शाळेत प्रवेश घेता? असे म्हणून आपल्यासोबत इतरांचंही मत मराठी शाळांच्याबाबत कलुषित करणाऱ्या मराठी शाळा द्वेष्ट्यांना मराठी जनतेने सणसणीत चपराक दिली. एवढेच नाही तर दरवर्षीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे माध्यमांतरदेखील केले. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या या पालकांचे दुप्पट कौतुक आणि आभार!!!

दरवर्षी हजारोंच्या संख्येने इंग्रजी शाळांकडून मराठी शाळांकडे अशी माध्यमांतरे का बरे होत असतील? काय कारणे असतील ? हा आकडा कमी आहे का? अजूनही हा आकडा वाढू शकतो का? इंग्रजी माध्यम बदलून पाल्यासाठी मराठी माध्यमाची शाळा निवडल्यास, लोक काय म्हणतील? म्हणून शहरी पालक गप्प बसत आहेत का? असे हजारो प्रश्न आज शिक्षण क्षेत्रात विचारले जात आहेत. हा आकडा वाढत राहिला तर अजून काही वर्षांनी मराठी नाही पण इंग्रजी शाळांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होईल, हे कोणत्याही शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात येत नाही. किंबहुना या मुद्द्यावर कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा ही घडत नाहीत. एका दृष्टीने हे सर्व चांगलंच आहे.

मराठी शाळांच्या जुन्नर पॅटर्न, हिवरे बाजार पॅटर्न, केंजळ पॅटर्नमुळे, गल्लाभरू आणि दर्जाहीन इंग्रजी शाळांची येत्या काही वर्षांत पळता भुई थोडी होणार हे मात्र नक्की आहे आणि लवकरच इंग्रजी शाळा प्रेमींना 'इंग्रजी शाळा वाचवा' म्हणून मोहीम राबवावी लागली नाही तरंच नवल!

इंग्रजी शाळांकडे मुख्यत्त्वे इंग्रजी बोलण्याच्या आकर्षणातून, प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून आणि इंग्रजी शाळांच्या झगमगाटाला भुलून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बहुतेक घरात मराठी बोलले जाते, पण यातील काही घरांमध्ये मुलांसाठी मात्र इंग्रजी शाळा निवडली जाते, आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच

प्रथम मराठी माध्यमाचे फायदे पाहूया :

शिक्षणशास्त्र सांगते, आपण घरात ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत मुलांना शिकवावे, असे केल्यास मुलांना शिकवलेले लवकर समजते, पाठांतर कमी करावे लागते, दुसरी भाषा अवगत करण्यास सुलभता येते, अभ्यास कमी वेळेत होतो आणि राहिलेला वेळ इतर छंदांकरता देता येतो. हे सर्व फायदे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मिळतातच, शिवाय बहुसंख्य मराठी शाळा अनुदानित असतात आणि त्यामुळे तिथे शिकवणारा शिक्षकवर्ग नियमाप्रमाणे पूर्ण शिक्षित असतो, इतर ठिकाणी अशी सुविधा मिळेलच याची खात्री आपल्याला देता येत नाही. इंग्रजी शाळांच्या दर्जाबाबत अनेक भयानक बाबी रोज वर्तमानपत्रात छापून येत असतात, ते वाचून सुज्ञ पालकांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही.

काही दिवसांपूर्वी ३ वर्षांच्या चिमुरडीचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. एवढीशा मुलीशी तिच्या शिक्षिका इंग्रजीतून संवाद साधत होत्या. त्या मुलीला समजत नव्हते म्हणून ती रडत होती, आणि त्या शिक्षिका फिदीफिदी हसत होत्या. शेवटी त्या शिक्षिका ज्यावेळी त्या मुलीशी मराठीतून बोलल्या तेव्हा ती मुलगी चटकन मराठीतून बोलायला लागली आणि तिने रडण्याचे कारणदेखील सांगितले, तिला भूक लागली होती! सुशिक्षित नवपालकांनी यावरून काहीतरी बोध घ्यावा, आणि मातृभाषेचे महत्त्व लक्षात घ्यावे.

एक अभ्यास सांगतो, की एखाद्या भाषेतले ८०० शब्द तुम्हाला समजले की तुम्हाला ती भाषा कळू लागते, बोलता येते. मग इंग्रजीच्या बाबतीत काही पालकांच्या मनात इतकी भीती का आहे? हे समजायला मार्ग नाही!! नक्की इंग्रजी शिकण्याची योग्य पद्धत आहे तरी कशी? इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे का? असे प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या मनात येणे आणि त्यांची द्विधा मनःस्थिती होणे स्वाभाविक आहे.

सर्वप्रथम अशा पालकांनी एक गोष्ट समजून घेणे गरजेची आहे, ती म्हणजे तुमच्या पाल्याला ‘इंग्रजी भाषा’ विषय म्हणून शिकायची आहे! त्यासाठी सर्व इतर विषय उदा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र,इत्यादी इंग्रजीतून शिकणे गरजेचे नाही!!! तुम्ही का तुमच्या पाल्याला इंग्रजी विषय शिकण्याकरता, इतर विषयदेखील इंग्रजीतून शिकवताय? कुठेतरी चुकताय, हे लक्षात येतंय का तुमच्या?

मातृभाषा पक्की असेल तर दुसरी भाषा शिकणे सोपे : इंग्रजी शिकण्याकरता प्रथम तुम्हाला मराठी शिकणे गरजेचे आहे कारण, ती तुमची मातृभाषा आहे! ऐकून आश्चर्य वाटलं ना? होय! हेच खरं आहे. शब्द, वाक्यरचना, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अशा अनेक व्याकरणातल्या संकल्पना अगोदरच पक्क्या झालेल्या असतील तर वेगवेगळ्या भाषा शिकणे अवघड जात नाही कारण, सर्व भाषांचा संकल्पनात्मक आधार एकच असतो. म्हणूनच मूलगामी अर्थाने आपण भाषा एकदाच शिकतो असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या मुलांना प्रथम भाषा, मातृभाषा-मराठी चांगली बोलता-लिहिता-वाचता येणे गरजेचे आहे. यावर मराठी माध्यमातून शिकलेले काही लोक म्हणतील, मग आम्हाला इंग्रजी का जमत नाही? तर त्याला सराव, इंग्रजीची भीती, नावड, ई. अनेक कारणे असू शकतात.

आज इंग्रजीला समोर ठेवून मुलांना तयार करण्यासाठी इंग्रजी माध्यमात घातले आणि काही वर्षांनी चिनी भाषेचे प्राबल्य जगाच्या बाजारात वाढले तर काय करणार? तुमच्या पाल्याचे शिक्षण मातृभाषेतून न झाल्याने त्याच्या भाषिक संकल्पना कच्च्या राहिल्या असतील, व्याकरण कच्चे राहिले असेल, तर चिनी भाषा, किंवा इतर कोणतीही भाषा शिकणे त्याला प्रचंड अवघड जाईल! अमेरिकेतील पनामा प्रांतातील सर्व शाळांमध्ये भविष्याचा विचार करून प्राथमिक स्तरापासूनच चिनी भाषा शिकवण्यास प्रारंभ केलेला आहे यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिनी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात येईल...चिनीच नाही तर उद्या जर्मन, जपानी, रशियन कोणतीही भाषा शिकावी लागली तरीही त्याकरता अगोदर मातृभाषा पक्की असावी लागेल.

ब्रिटिश कौन्सिल आणि युनेस्कोचा मातृभाषेचा आग्रह :

ब्रिटीश कौन्सिल आणि युनेस्को या दोन्हीही आंतरराष्ट्रीय संस्था मातृभाषेतूनच शिक्षणाचे समर्थन करतात. अनेक भाषा कशा शिकाव्यात यासाठी ब्रिटीश कौन्सिलने टेक २०१३ च्या संमेलनात उत्कृष्ट तक्ता सादर केला होता. तुम्ही गुगलवर Tec 13 british council एवढंच जरी शोधलं तरीही, तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल त्यात १९८ क्रमांकाच्या पानावर हा तक्ता दिलेला आहे.

त्याचं मराठी रुपांतर खालीलप्रमाणे....

१. मराठी श्रवण, वाचन, वक्तृत्त्व यावरील प्रभुत्त्व आणि आत्मविश्वास वाढवा.
२. अध्यापनासाठी मराठी भाषेचा वापर करा. मराठी वाचन, वक्तृत्त्वासोबतच लेखनकौशल्यांचा विकास करा.
३. मराठीतून अध्यापन आणि मुलांचा भाषिक विकास साधताना इंग्रजीची ओळख करून द्या.
४. मराठीतून अध्यापन आणि मुलांचा भाषिक विकास साधताना, इंग्रजीचे वाचन, लेखन, आणि वक्तृत्त्व कौशल्य वाढवा.
५. मराठी व इंग्रजीतून अध्यापन करा, तसेच भाषिक कौशल्ये, संकल्पना पक्क्या करून घ्या आणि तृतीय भाषेची ओळख करून द्या.
६. मराठी व इंग्रजीतून अध्यापन करताना व मुलांना दोन्ही भाषांमध्ये पारंगत करताना, तृतीय भाषेची भाषिक कौशल्ये विकसित करा.
७. सर्व भाषांचा आयुष्यभर ज्ञानार्जनासाठी उपयोग करा.

याला भाषा शिक्षणाची सप्तपदी असे म्हटले जाते. शिक्षणशास्त्राची पदवी घेतलेले मराठी शाळांमधले शिक्षक साधारण याचप्रकारे मुलांना शिकवतात, परंतु मातृभाषेतून शिक्षणालाच फाट्यावर मारून गल्लीबोळात तयार झालेल्या इंग्रजी शाळांमध्ये अशा प्रकारे शिकवले जाते का? यावर पालकांनी विचार करावा.

आज अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये SIEM सारख्या शासकीय संस्थांच्याद्वारे शिक्षकांचे पण इंग्रजी उत्कृष्ट व्हावे याकरता 'तेजस' सारखे उपक्रम सुरु आहेत. तेजस उपक्रमामध्ये टाटांचे सहकार्य देखील मिळालेले आहे. याचा लाभ केवळ मराठी माध्यमाच्या शिक्षकांनाच मिळत आहे, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या!

इंग्रजी शिक्षण असे सोपे होईल :

वर दिलेल्या भाषेच्या सप्तपदीमुळे भाषा कशी शिकवावी याचा आपल्याला साधारण अंदाज येतो. आता द्वितीय भाषा, उदा. इंग्रजी शिकवताना काय कृती आराखडा आखावा लागेल याकरता शिक्षक किंवा खासकरून पालकांसाठी काही टिप्स खालीलप्रमाणे :

> अगोदर मुलांना मातृभाषा-मराठी नीट बोलता- लिहिता-वाचता येऊद्या. तोपर्यंत इंग्रजी केवळ कानावर पडूद्या.

> दर्जेदार 'इंग्रजी-मराठी शब्दकोश' घरात नेहमी असावा. "माझा पहिला इंग्रजी-मराठी शब्दकोश" हा अतिशय सुंदर चित्रकोश सुद्धा खूप उपयोगी होईल. तो केवळ शब्दकोशच नाही तर एक संपूर्ण असे कोर्स बुकच आहे.

> Look and say चा सराव नियमित असावा. त्यासाठी आपण फ्लॅश कार्ड वापरू शकतो. योग्य इंग्रजी उच्चाराचे नमुने नेहमी मुलांना ऐकवावेत.

> मुलांना रोजच्या वापरातले शब्द अगदी शाळेत जाण्याच्या आधीपासून खेळत खेळत शिकवावेत.

उदा: स्वयंपाक घर=किचन, आणि मग त्यातील एक एक विषय - जसे आठ दिवस सगळी भांडी, मग फ्रीज आणि त्यातील वस्तू, मग धान्य/ स्वयंपाकाचे पदार्थ, असं करत वर्षभरात सगळं घर अगदी मजेत शिकून होतं!

> घरात मराठीसोबत इंग्रजी वर्तमानपत्रं चालू करा. एकच बातमी मराठी आणि इंग्रजीतून वाचायची लहानपणापासून सवय लावा. इंग्रजी वृत्तवाहिन्या पहायची सवय लावा.

> घरात गोष्टीची इंग्रजी पुस्तके, मासिके चालू करावीत. मुलांना आवडणाऱ्या विषयावरील मासिके असावीत म्हणजे मुले त्यात रस घेऊन वाचतात. अशा मासिकांतील तसेच पुस्तकांमधली अक्षरे ठळक, मोठी आणि आकर्षक चित्रांनी युक्त असावीत. उदा. रामायण, महाभारत, Tell me why, Tel me what, Tell me when, 500 Questions and answers इ.

> नेहमीच अभ्यास म्हटल्यावर मुलांना रटाळ वाटू शकते, सबटायटल्स सहीत लागणारे इंग्रजी चित्रपट मुलांना पाहू द्यावे. इंग्रजी कार्टून फिल्म्स पाहून द्याव्यात म्हणजे इंग्रजी उच्चार कानावर पडून सवय होते आणि पुढे समजायला सोपे जाते.

> इंग्रजी बोलण्याच्या सरावाकरता, हौशी पालक आपल्या पाल्यासोबत त्याच्या मित्रवर्गाला घेऊन एखादे लहानसे मंडळ सुरु करू शकतात.

- तिथे इंग्रजी लघुपट दाखवावेत,
- चित्रे देऊन त्याचे इंग्रजीतून वर्णन करण्यास सांगावे/इंग्रजीतून चित्रावरून गोष्ट लिहायला सांगावी.
- लहान लहान इंग्रजी नाटिका बसवाव्यात, इंग्रजी नाट्यवाचनाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा,
- इंग्रजी वाचनकट्टे राबवावेत, इंग्रजीतून गप्पागोष्टी कराव्यात,
- कविता चालीवर, हावभावांसह म्हणून घ्याव्यात..उच्चार स्पष्ट असतील हे बघावे.
- इयत्तेप्रमाणे उपलब्ध असलेल्या कृतीपत्रिका सोडवून घ्याव्यात.
- इयत्ता पहिली ते आठवीची बालभारतीची My English Book ही माला पहा. खूपच सुंदर उपक्रम दिले आहेत.
- आज आंतरजालाच्या जमान्यात आपण फेसबुक, ट्वीटर मार्फत अनेक आंतरराष्ट्रीय समूहांचा भाग होऊ शकतो. अशा समूहांत प्रवेश घेऊन, स्काईप, व्हिडीओ कॉल मार्फत परदेशातील शाळांमधल्या मुलांसोबत गप्पा मारण्याची सोय आपल्या मुलांना उपलब्ध करून देता येऊ शकते. हा उपक्रम श्री. बालाजी जाधव या जि. प. शिक्षकाने प्रत्यक्ष अंमलात आणला आहे. अशक्य काहीच नाही.

अशा मंडळांमध्ये शाळेतील इंग्रजीच्या शिक्षकांना विनंती करून वेळोवेळी मार्गदर्शनाकरता आमंत्रित करावे.मराठी शाळांमधले शिक्षक नेहमीच सहाय्य करतात, चांगल्या उपक्रमांना कधीही नाही म्हणत नाहीत.

> ८ वी, ९ वी, १० वी या वयोगटासाठी भाषिक उपयोजन करण्यावर भर द्यावा. अर्थात व्यवहारात इंग्रजी बोलण्याचा सराव करून घ्यावा.

> पहिली ते दहावीच्या एस.एस.सी. तसेच इतर अभ्यास मंडळांच्या इंग्रजी अभ्यासक्रमाच्या सीडीज उपलब्ध असतात. एक सीडी साधारण ३००-४०० रुपयांना असते. महाग वाटत असेल तर काही पालक एकत्रितपणे वर्गणी काढून अशा सीडीज विकत घेऊ शकतात. शिवाय युट्युबला असंख्य शैक्षणिक व्हिडीओज मोफत उपलब्ध असतात त्यांचादेखील लाभ मिळू शकतो.

> इंग्रजी,गणित,विज्ञान यांचा एकत्रित शब्दकोश इयत्तेप्रमाणे बाजारात उपलब्ध असतो. मराठी माध्यमात शिकत असला तरीही, असे शब्दकोश घरात ठेवून, अभ्यास करताना मराठीसाठी कोणत्या इंग्रजी संज्ञा आहेत हे पहायची मुलांना सवय लावावी.

मुंबईतील इंग्रजी शाळांमध्ये देखील स्पोकन इंग्लिशचे पैसे भरून वेगळे वर्ग घेतले जातात (धक्कादायक असले तरीही सत्य आहे), याचाच अर्थ तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकला तरीही इंग्रजीचा जोपर्यंत सराव करणार नाही तोपर्यंत ती भाषा तुम्हाला आत्मसात होणार नाही.

असो! ज्यांनी अजूनदेखील मराठी माध्यमातून शिक्षणाचा विचार केला नाही त्यांनी आपल्या पाल्याकरता मराठी माध्यमाची शाळा आवर्जून निवडावी असे आवाहन!!  कमी पैशात दर्जेदार इंग्रजी आणि इतर विषय शिकायचे असतील तर मराठी शाळांना पर्याय नाही. इंग्रजी शाळांच्या झगमगाटाला बळी न पडता आपल्या परिसरातील मराठी शाळेत प्रवेश घ्या. इंग्रजी माध्यमात शिकवताना पुढच्या १० वर्षांत खर्च होणाऱ्या पैशापेक्षा थोडे सतर्क आणि जागरूक राहून आपल्या पाल्यासाठी मराठी माध्यमातून शिक्षणाचा योग्य निर्णय घेतला तर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात आणि मातृभाषेच्या भक्कम पायावर इंग्रजीची इमारत डौलात उभी राहू शकते.

No comments:

Post a Comment