Monday, July 4, 2016

राजा भोज आणि कालिदास

धारचा राजा भोज आणि कालिदास यांच्या कथा प्रसिद्ध होत्या. परंतु अकबर-बिरबल यांच्या कथांप्रमाणे त्या आता फारशा वाचल्या जात नाहीत.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे एक पुस्तक मी लहानपणी वाचले होते. भोजराजाने कवितेची एक ओळ सांगायची, आणि कालिदासाने त्या ओळीशी सुसंगत अशा उरलेल्या तीन ओळी रचून कडवे पूर्ण करायचे. असा काव्यपूर्तीचा खेळ त्यांच्यात चालायचा. आता त्यातल्या गोष्टी फारशा आठवत नाहीत, पण आठवणारी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते.

भोजाने सांगितलेली पहिली ओळ अशी:-
"चंद्रानना फुंकीत पावकाला"
म्हणजे, "जिचे मुख चंद्रासारखे आहे अशी स्त्री पावक(अग्नी) फुंकत होती."

कालिदासाने लगेच उरलेल्या तीन ओळी रचून पुढीलप्रमाणे कडवे पूर्ण केले:-

"चंद्रानना फुंकीत पावकाला,
आश्चर्य वाटे कवीच्या मनाला।
अहो, चमत्कार विचित्र झाला,
आकाशीचा चंद्र चुलीत गेला।।"

एक चंद्रानना स्त्री (चुलीसमोर नळीने) विस्तव फुंकत असताना जो विचित्र चमत्कार घडला पाहून कवीला आश्चर्य वाटले. (हा चमत्कार काय तर) आकाशातला चंद्र (चंद्रासारखी  वाटोळी भाकरी) (भाजण्यासाठी चक्क) चुलीत गेला.

- डॉ. वसंत काळपांडे सर

No comments:

Post a Comment